कौन्सििंलगचा नका करू धंदा!

    दिनांक :23-Nov-2019
|
 

 
 
 
आपण असे म्हणतो की, समाजाचा विकास होत आहे. आपण संगणकयुगात राहतो. तंत्रक्रांतीमुळे भौतिक सुखाच्या आपण आहारी गेलो आणि वेगळ्या व्यसनांनी आम्हाला पुरते घेरले. मुळात ही व्यसनं आहेत, आम्ही त्यांच्या पुरते आहारी गेलो आहोत, हेच अद्यापही आम्हाला कळलेले नाही. थोडके कळत आहे तर त्यावर उपाय नाहीत. मोबाईलवरच सगळे आमचे जगणे एकवटले आहे. त्यातून मिळते ती अस्वस्थताच. क्षणाक्षणाला विविध रस उत्पन्न करणारे संदेश येतात. प्रत्येक जण आपली बाजू मांडतो. अत्यंत विरोधी विचार अत्यंत अविचाराने आणि भडक भाषेत मांडले जातात समाजमाध्यमांवर आणि त्यातून नकळत एक अस्वस्थता पेरली जाते. ती साचत जाते आणि त्याचा मग कधीतरी स्फोट होतो. हे असे मानसिक स्फोट आता दिवसातून अनेकदा होऊ लागले आहेत. त्यातून नैराश्यच आमच्या पदरात पडले. व्यसनामुळे डिप्रेशन की डिप्रेशनमुळे व्यसन, हा प्रश्न म्हणजे मुर्गी अगोदर की अंडा, असाच आहे. त्यातून काय मार्ग काढायचा हे कळत नाही. त्यातून अंधश्रद्धा वाढीस लागतात.
श्रीमंत लोक मनोविश्लेषकाकडे जातात. त्यांच्याकडे पैसा असतो. व्यसनांवर जितका ते खर्च करतात तितकाच ते व्यसनमुक्तीसाठी करतात. रणबीर कपूर सिगारेट ओढतो आणि तो दर सहा महिन्यांनी एकदा ऑस्ट्रेलियात सिगारेटच्या दुष्परिणामांच्या मुक्तीसाठी उपचाराला जातो... गरीब लोक सल्ला केंद्रात येतात. त्या बिचार्‍यांना हे माहिती नसते सल्ला केंद्रात फुकटाचा सल्ला देणार्‍या लोकांना समुपदेशक (कौन्सिलर) म्हणतात.
मागील तीस वर्षांपासून हे काम करीत असताना भन्नाट अनुभव आलेत. आतातर कौन्सििंलगकरिता येणारे पुरुष व्यसनी येतात आणि महिला मनोरुग्ण अवस्थेतील येतात. बरेचदा असेही होते, जी व्यक्ती आपल्यासमोर बसली आहे, तीच चूक असते. आम्ही समुपदेशक 25 टक्के केसेस चर्चेतून आणि 25 टक्के केसेस चेहर्‍यावरून सोडवतो. हे काम वाटते तेवढे सोपे नाही.
श्रोत्याच्या भूमिकेत जाऊन मी जेव्हा पीडितांचे मन वाचते, तेव्हा प्रत्येक शब्दाशब्दातून त्याचा स्वभाव टपकत असतो. सल्ला केंद्राचे व्यापारीकरण झालेले आहे. आम्ही कौन्सिलर लोकांनी पीडितांच्या वेदनांचा बाजार केलेला आहे. ब्युटीपार्लर नि भाजी-पोळी केंद्रासारखे सल्ला केंद्र झालेेले आहे. प्रत्येक पोलिस स्टेशनला मोफत सल्ला केंद्र आहे. महिला आयोगाचे सल्ला केंद्र, जिल्हास्तरीय महिला, बाल कल्याणचे सल्ला केंद्र, महानगरपालिकेचे सल्ला केंद्र संघटनांचे सल्ला केंद्र, वस्तीस्तरीय सल्ला केंद्र, जातपंचायतीचे सल्ला केंद्र, या व्यतिरिक्त फुकटचा सल्ला देणार्‍यांची संख्या समाजात काही कमी नाही.
विशेष म्हणजे या धंद्याला मरण नाही. जोपर्यंत समाज आहे, तोवर पती-पत्नीचे नाते आहे. नाते आहे तोवर भांडण आहे. टोकाची भांडणं आहेत तेथे कौन्सििंलग सेंटर आहे. मागच्या आठवड्यात माझीच एक मैत्रीण भेटली. मी म्हणाले, ‘‘सेंटर कसे चालू आहे?’’ त्यावर ती म्हणाली, ‘‘धंदा थंड आहे...’’ तिच्या ‘धंदा’ या शब्दाने मला धक्का बसला; पण तिचा अर्थ मी समजून घेतला. म्हणजे आजकाल केसेस कमी झालेल्या आहेत... किंवा लोक कौन्सिलरकडे येत नाहीत. वृद्धाश्रम ओस पडणे म्हणजे सुदृढ समाजाचे लक्षण मानले पाहिजे, तसेच समुपदेशकांकडे अस्वस्थांची रीघ कमी होणे, हे स्वस्थ समाजाचे लक्षण नाही का? मी तिला म्हणाले, ‘‘हे आपल्याकरिता चांगले आहे. हिंसामुक्त समाज आणि भयमुक्त नारी हेच तर आपले ब्रीद आहे.’’
ज्याप्रमाणे डॉक्टरांना वाटते, लोक आजारी पडले पाहिजेत आणि आपला दवाखाना पेंशटने भरला पाहिजे. तसेच धंदेवाईक कौन्सिलरांना वाटते, नवरा-बायको रोज भांडले पाहिजे आणि आपले कौन्सििंलग सेंटर चालले पाहिजे... हे रोगट मानसिकतेचे लक्षण आहे. बाजारशरण मानसिकता आहे. ही भावना कौन्सिलरच्या मनात येण्याकरिता सरकारची ध्येय-धोरणेदेखील चुकीची आहेत. तुम्ही वर्षभरात किती केसेस केलेल्या आहेत, यावर अनुदान येते. मग कमाईसाठी समुपदेशक चुकीच्या नोंदीदेखील करतात. कारण आकडा महत्त्वाचा असतो. शाळेत पटावर हजेरी दाखविण्यासाठी शिक्षक काय करतात आणि ते कशासाठी? खरं म्हणजे सल्लागार केंद्राला व्यवहार नि व्यापार करण्याचा अधिकारच नाही. त्यांचे काम समन्वयकाचे आहे. तडजोडीचे आहे. सल्ला केंद्राचा शुद्ध हेतू आहे.
दोन्ही पक्षाला पोलिस स्टेशन, कोर्ट करावे लागू नये, दोन्ही पक्षांचा पैसा, वेळ, श्रम वाचावा आणि दोन्ही पक्षाच्या नातेवाईकांना त्रास होऊ नये, या भावनेतून मोफत सल्लागार केंद्र चालवीत असतो. तीस वर्षांपूर्वी मी जेव्हा या क्षेत्रात आले, तेव्हा बीएसडब्लू, एमएसडब्लू असे समाजकर्ता बनवण्याचे अभ्यास केंद्र नव्हते. आपण जे काम करतो, याला कौन्सििंलग म्हणतात, हेदेखील मला कळत नव्हते. त्या वेळी सन 1984 ला कौन्सििंलगची कल्पना समाजाला अपरिचित होती. अजूनही समाजाचा तिच्याशी पाहिजे तसा परिचय खर्‍या अर्थाने झालेला नाही.
मराठीत आपसी वाद मिटवणार्‍यांना समुपदेशक म्हणतात. या शब्दाच्या पलीकडे जाऊन समाजाने या प्रक्रियेचा अर्थच जाणून घेतला नाही.
ज्यांचे आयुष्य सुतासारखे सरळ आहे, नवरा मुठीत आहे, त्यांना या गरजा फालतू वाटतात. आपल्या नसणार्‍या गरजांची खिल्ली उडवणे आणि कानाडोळा करणे, हा मानवी स्वभाव आहे. याचे सभ्य समाजात, भौतिक सुखाचा वेध घेणार्‍या आधुनिक युगात कौन्सििंलग सेंटरला येणार्‍यांची संख्या वाढली आहे. माझ्याकडे रोज तीन, म्हणजे महिन्याला शंभर व्यक्ती सरासरी येतात. वर नमूद केल्याप्रमाणे यापेक्षा जास्त लोक शहरातील दहा-वीस सल्लागार केंद्रात जातात. किमान पाच लोक फोनवर आपली व्यथा, वेदना त्यांच्या भाषेत संसारिक दुःख सांगतात, जी सर्वात जास्त मानवनिर्मित असतात. कारण सल्ला विचारणार्‍यांना स्वतःचे डोके नसते. त्यांच्या अवतीभवती अशी माणसं असतात, जे त्यांना चुकीचा सल्ला देतात.
कौन्सिलिंग सेंटरकडे येणार्‍या लोकांची संख्या जरी वाढत असली, तरी एक वास्तव हेदेखील आहे की, कौन्सििंलग सेंटरकरडे येणार्‍या लोकांची संख्या वाढती असली आणि समाजातील सर्वच स्तरातील लोक सारख्याच तक्रारी घेऊन येतात... म्हणजे अत्यंत उच्चभ्रू कुटुंबातील स्त्रीदेखील, नवरा मारहाण करतो, दारू पितो, अशी तक्रार घेऊन येते आणि मजुरी करणारी, घरकाम करून कुटुंब चालविणारीही हीच तक्रार करते. त्यामुळे समुपदेशन केंद्राकडे जाणार्‍यांइतकीच तिकडे जाऊ की नको, अशा संभ्रमावस्थेत जगणार्‍यांची संख्या जास्त आहे. याची अवस्था, आत्महत्या करण्यापेक्षा तो आत्महत्येचा विचार मनात घेऊन जगणार्‍याची असते. जी समाज, कुटुंब, मुलांना घातक आहे. नात्यामध्ये संवाद नसणे किंवा तो संवाद टोकाचा असणे हे मूळ, प्राथमिक कारण आहे. देवाने आपल्याला तोंड दिले तर आपण बोलले पाहिजे. शेवटी बोलण्यातही जेंडर आहेच.
‘‘तुला काय कळते?’’ आणि ‘‘तुला माझ्यापेक्षा जास्त कळते काय?’’ मुलीला किंवा अपत्यांना बाप म्हणेल तीच दिशा. ती मोठी झाली की नवरा म्हणेल तेच खरे आणि तसेच वागायचे असते. भलेही त्यांनी ठरविलेली ती दिशा खड्‌ड्यात घालणारी असेल, ते कळत असेल तरीही ते आदेश पाळायचे असतात. संसारिक खड्‌ड्यापासून वाचवण्याचे काम आम्ही कौन्सिलर करीत असतो; पण महिलांच्या वेदना इतक्या तीव्र, भिन्न आहेत की डॉक्टर्स म्हणतात, मॅडम दवाखान्यात येऊन भेट द्या. ती बाळाला दूध पाजत नाही. बाळाकडे बघत नाही. तर दुसरीचा फोन येतो, ‘‘आठच दिवस झाले. मी घराबाहेर पडू शकत नाही. मला काही अर्जन्ट बोलायचे आहे. तुम्ही मला प्रत्यक्ष येऊन भेटा...’’ तर तिसरा फोन असा असतो, ‘‘मला कोंडून ठेवलेले आहे. बाहेर काढा. मी असुरक्षित आहे.’’ तिथे गेल्यावर आम्हाला कुठल्या परिस्थितीचा सामना करावा लागेल, आमच्या सुरक्षेचे काय, याची काहीही शाश्वती नसतानाही आम्ही त्यांना ऐकण्याकरिता धाव घेतो. आम्हाला धोका पत्करावा लागतो. पण त्याचे परिणाम चांगले होतात. कालांतराने चांगला निकाल मिळतो. एका व्यक्तीला आपण आत्महत्येपासून रोखू शकलो किंवा एक मनोरुग्ण कमी केला, याचा आनंद वाटतो.
आमच्याकडे येणारी प्रत्येक केस वेगळी असते. वारंवार अनपेक्षित प्रश्नांना सामोरे जायला लावणारी, सतत आव्हान पेलायला लावणारी, मनावर अपार बोज निर्माण करणारी, आशा आणि निराशा या भावनांवर झुलवणारी असते. कारण तो पत्नीला वागवायला तयार असतो, तर ती नाही म्हणते. पत्नी जायला तयार असते, तर तो नाही म्हणतो. दोघेही होकार देतात, तेव्हा आई-वडील हस्तक्षेप करतात. संशयी स्वभाव, दारूचे व्यसन, मोबाईलचे व्यसन ही सर्वसामान्य कारणे... ती म्हणते, ‘‘दारू सोड, मी नांदायला येते.’’ तो म्हणतो- ‘‘तू अगोदर नांदायला ये. मग दारू सोडतो.’’ या दोघांच्या भांडणात मी उडी घेते. थोडे खोटे बोलते. ‘‘येऊन जा. खरंच त्याने दारू सोडली तर चांगलेच आहे.’’ ती म्हणते- ‘‘तुम्ही गॅरंटी घेता काय?’’ मी ‘‘हो’’ म्हणते. ती मला स्टॅम्पपेपर लिहून मागते. मीही लिहून देते. स्टॅम्पवरच्या लेखी संसाराला मी मूक साक्षीदार असते.
त्या दोघांना मुलाबाळासह माझ्या सेंटरवरून घरी जाताना, नवर्‍याच्या खांद्यावर हात ठेवून जेव्हा ते दोघेही स्मितहास्याने बाय करतात, तेव्हा माझ्याच संसारातील वेदनांचा भूतकाळ मला आठवतो. हे सगळेच संसारिक जंगलातील दुःखी प्राणी माझ्याकडे येतात. मी कुणाकडे जाऊ? मी रममाण होते पुस्तकात आणि लिखाणात...
माझ्यासारखीच स्थिती या क्षेत्रात काम करणार्‍या प्रत्येक कौन्सिलरची आहे. आतातर कमाईचे क्षेत्र म्हणून ऊठसूट कुणीही कौन्सििंलग उघडत आहे. या क्षेत्रात येणार्‍यांना काही अनुभव सांगावेसे वाटतात.
आपल्या समोरची व्यक्ती चूक असेल, व्यसनी असेल आणि व्याभिचारीदेखील... बेअक्कल व स्वतःला शहाणे समजणारी आणि माझे कोणीच काही करू शकत नाही, अशा विश्वात वावरणारी असते. आयुष्याला कंटाळलेले लोक आपल्याकडे जास्त येतात. तेव्हा संयमाने तोल न जाऊ देता बोलावे. वैर सोडून वार करावा, नर्म होऊन वर्म भेदावे, दुजाभाव असूनही बंधुभाव दाखवावा. हार न मानता प्रहार करावा, या खुर्चीच्या सत्तेतून सेवा करावी. विरोधातून विनोद करावा.
शक्ती, युक्ती, वाद-संवाद, कर्तृत्व, वक्तृत्व, सवाल-जवाब, मान-इमान, निष्ठा-प्रतिष्ठा यांचा संगम म्हणजे आपले कौन्सििंलग क्षेत्र आहे. आपल्या बेडरूममधली भांडणे आमच्या कौन्सििंलग सेंटरकडे आणणार्‍यांना एवढेच सांगावेसे वाटते-
नवरा-बायको म्हणजे संसाराचा मुख्य पार्ट आहे. जोडीदाराच्या कलाने घेणे, हीसुद्धा एक आर्ट आहे.
जेव्हा नवरा-बायकोला वाटते
जोडीदार म्हणजे बला आहे,
तेव्हाच कळते, संसार म्हणजे
जीवन जगण्याची कला आहे.