आम्ही मतदान कशासाठी करायचं?

    दिनांक :23-Nov-2019
|
ज मला माझ्या मतदानाचा पहिला अधिकार बजावायचा म्हणून मी निवडणुका जाहीर झाल्यापासूनच आनंदात होते. आणि ज्या दिवशी मतदान होते त्या दिवशी तर माझ्या उत्साहाला पारावर नव्हता. अगदी सकाळी उठून पहिले मत सातच्या ठोक्याला माझंच झालं पाहिजे म्हणून मी आनंदात मतदान करून आले. त्यानंतर आमच्या शेजारच्या आजी-आजोबांना, काका-काकूंना... सर्वांना मतदानासाठी हट्‌ट करायला लागली. आमच्या घरी काम करणार्‍या ताईंनाही मतदान करण्यासाठी पुन:पुन्हा सांगू लागली. पण, कुणाचाही पाहिजे तसा उत्साह दिसत नव्हता. प्रत्येक जण म्हणत होता, लवकरच समजेल तुला. आमच्या घरची कामवाली ताई तर म्हणाली, भक्ती, तुला माहीत नाही. आता मत पाहिजे असते म्हणून आपल्या मागेपुढे करतात आणि मग आपण कधी आपली समस्या मांडतो म्हटलं, तर दारातही उभं करत नाहीत. पण, या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करीत मी सर्वांना आग्रहाने मतदान करायला घेऊनच गेले आणि मतदान झाल्यानंतर पुढच्या सगळ्या प्रक्रियांची आतुरतेने वाट बघत होते. माझं मत किती मूल्यवान आहे, याची वाट बघत होते. आज आम्हा तरुणांची या महाराष्ट्राला किती गरज आहे, यासाठी स्वतःच गर्व करत होते आणि या मोठ्या लोकांकडून काहीतरी शिकायला मिळेल आणि त्यांच्या वाटेवरच आपल्याला पुढे जायचे आहे, या उद्देशाने प्रेरित होऊन वाट बघत होते.
 
 
 
पण, इतके दिवस उलटून गेले, तरी दूरदर्शनवरील तेच तेच भांडण करणारे चेहरे, तेच कुरापती करणारे, भांडण लावून देणारे, सत्तेसाठी लालसा बाळगणारे आणि स्वतःच्या स्वार्थासाठी- स्वतःचं तर भागलं, पण स्वतःच्या पुढच्या पिढीसाठी त्यांच्या पोटापाण्यासाठी सोय व्हावी म्हणून लढणारे, यांची धडपड बघून मन अस्वस्थ होऊन जाते. हे भांडणारे लोक बघितल्यावर, सत्ता पालटवून टाकणारे आणि गेम खेळणारे लोक बघितल्यावर, या सत्ताधार्‍यांना ओरडून विचारावेसे वाटते की, बाबारे, तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी लढले की लोकांच्या कल्याणासाठी? इतक्या उघडपणे आणि समाजाची पर्वा न करता जर तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी भांडू शकता, तर तुमचे आतले कार्य काय असेल, याचा विचार न केलेलाच बरा!
 
आज तुम्ही वारंवार शेतकर्‍यांचा मुद्दा घेऊन भांडत आहात. त्यांची ढाल समोर करून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहात आणि आम्हीच शेतकर्‍यांचे कैवारी म्हणून पुढे पुढे करीत आहात. पण, तुमचं हे भांडण बघून तुम्हाला पुन:पुन्हा विचारावंसं वाटतं की, सत्तेच्या लालसेपोटी की जनकल्याणासाठी? आज एका पावसात तुम्ही भिजले काय, तर त्याचे इतके कौतुक की दोन-चार जागा जास्तीच्या मिळवून घेतल्या आणि तुमच्याच वयाचा आमचा शेतकरी काका, आजोबा बाराही महिने ऊन-पावसाची तमा न बाळगता शेतात राबतो आहे, तर त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नाही. अहो, फक्त कर्जमाफी करून, शेतकर्‍यांबद्दल खोटा कळवळा दाखवून, कोटीची भाषा बोलून आणि जो खरा शेतकरीच नाही अशा खोट्या शेतकर्‍याला माध्यमांसमोर उभे करून सरकारची बदनामी करण्याची जी खेळी चालवलेली आहे, हे बघून खरोखर असे वाटते, उगाच केले मतदान! खरी हिंमत असेल तर महालामधून झोपडीपर्यंत येऊन दाखवा आणि झोपडीवाल्यांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी तुमच्या महालापर्यंत मार्ग मोकळा करून द्या. ज्यांच्या मतांच्या भरवशावर आपण निवडून आलो, ज्यांचे काही देणे लागतो हे सर्व विसरून फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी जगणे हे खरं लज्जास्पद वाटते.
 
या पाच वर्षांत जरा आम्हाला चांगल्या सवयी लागल्या होत्या, भ्रष्टाचारावर आळा बसला होता, भ्रष्टाचार करणार्‍यांची नावे बाहेर यायला लागली होती. जो टेबलाखालून पैसे मागत होता त्याला, ‘नाही देत’ म्हणायची िंहमत आमच्या तरुणांमध्ये आली होती. आधारकार्डची सुरुवात करत बनवाबनवी थांबली होती. जीएसटीमुळे व्यापारी लोक सुखावले होते, स्वच्छतेचे महत्त्व लहानांपासून मोठ्यांपर्यंत समजले होते. महाराष्ट्राबद्दलचा अभिमान वाढला होता, ‘मी मराठी’ म्हणण्यात बाणेदारपणा वाटत होता. वाटत होतं की, आम्हा तरुणांची दखल घेणारे सरकार पुढे चालत राहील, शेतकर्‍यांची काळजी घेणारे सरकार पुढेही चालत राहील. पण, चांगल्या सवयी आम्हाला लागूच द्यायच्या नाहीत. भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र होऊच द्यायचा नाही. कुणी चांगलं काम करत आहे, तर त्याला खुर्चीवरून खाली कसे ओढायचे आणि त्याला कसे बदनाम करायचे, हाच धंदा जर हे सत्ताधारी लोक करत असतील, तर नको आम्हाला तुमचा आदर्श, नको तुमचा आधार. तुम्ही सत्ताधारी फक्त भांडत राहा, स्वतःचा स्वार्थ बघत राहा. तुमच्या खोट्या आश्वासनाला बळी न पडता आता निर्णय घेण्याची वेळ आली की, मतदान कशासाठी आणि कुणासाठी करायचं?
भक्ती जोशी
9422963027