आशुतोष गोवारीकर यांच्या सुरक्षेसाठी 200 पोलिसांची फौज तैनात

    दिनांक :24-Nov-2019
|
दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा 'पानिपत- द ग्रेट बेट्रेयल' हा ऐतिहासिक चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आपल्याला मराठा साम्राज्याचा इतिहास आणि पानिपतच्या युद्धाची कथा पाहायला मिळणार आहे. परंतु, सध्या हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी 200 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
 

 
गेल्या आठवड्यात या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. मात्र, त्यानंतर लगेच गोवारीकरांना अज्ञात व्यक्तींच्या तसेच इतर काही संघटनाच्या धमक्या येऊ लागल्या. यातील काहींनी या चित्रपटात ऐतिहासिक पात्र आणि घटनांशी छेडछाड केल्याचा आरोप केला. तर काहींनी चित्रपटातील काही सीन्सवर आक्षेप घेतला. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण धमक्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन गोवारीकर यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
मराठ्याच्या इतिहासात पानिपत युद्धाच्या खुणा आजही ताज्या आहेत. या युद्धात मोठी जीवितहानी झाली होती. यात जवळपास चाळीस हजार मराठी योद्धे, स्त्रिया व पुरुष मरण पावले होते. तर अहमदशहा अब्दालीने आपल्याबरोबर सुमारे 22 हजार मराठी युद्धकैदी गुलाम म्हणून अफगाणिस्तानात नेले होते. पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव का झाला? याचही उत्तर मिळणार आहे. या चित्रपटात संजय दत्त अहमद शाह अब्दाली तर अर्जुन कपूर सदाशिवरावांच्या भूमिकेत दिसणार आहे. क्रिती सॅनन पार्वतीबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. तर पद्मिनी कोल्हापुरे, झीनत अमान, मोहनीश बहल आदी कलाकरा या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडणार आहेत.