स्वच्छ भारत ही सगळ्यांचीच जबाबदारी!

    दिनांक :24-Nov-2019
|
आपले घर, आपला परिसर, आपले राज्य, आपला देश स्वच्छ-सुंदर राहिला पाहिजे, असे प्रत्येकाला ज्या दिवशी मनापासून वाटेल तेव्हाच, फार पूर्वी महात्मा गांधी यांनी सुरू केलेले आणि 2014 साली, आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले स्वच्छ भारत अभियात यशस्वी होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2014 रोजी स्वत: झाडू हाती घेतला आणि स्वच्छ भारत अभियानाचा शुभारंभ केला. देशभर अनेकांनी हाती झाडू घेत मोदींच्या या अभियानाला पािंठबा दिला. ज्यांनी कधीही हाती झाडू घेतला नाही, अशांनीही झाडू धरला अन्‌ साफसफाई केली. पाहता पाहता या अभियानाने बाळसे धरले अन्‌ अभियान जोमाने पुढे सरकले. या अभियानाला 2 ऑक्टोबर 2019 रोजी सहा वर्षे पूर्ण झालीत. परंतु, देशात पाहिजे त्या प्रमाणात स्वच्छता झाल्याचे जाणवले नाही. एकप्रकारे हे अभियान आम्हीच अपयशी ठरवण्याचा निर्धार केला, असे खेदाने नमूद करावे लागेल. स्वच्छ भारत अभियान हे जरी मोदी यांनी सुरू केले असले, तरी ते त्यांचे एकट्याचे नव्हते. संपूर्ण देश स्वच्छ झाला पाहिजे, नागरिकांचे आरोग्य उत्तम राहिले पाहिजे, हे उद्दिष्ट ठेवून मोठ्या कल्पकतेने पंतप्रधानांनी हे अभियान सुरू केले होते. सहा वर्षांत हे अभियान यशस्वी होईल अन्‌ महात्मा गांधी यांना अपेक्षित असलेली स्वच्छता प्रत्यक्षात येईल, अशी त्यांना अपेक्षा होती. परंतु, आपल्यासारख्या करंट्या नागरिकांनी अभियान असफल ठरवण्याचा विडाच उचललेला दिसतो आहे. काहीही झाले तरी आम्ही घाण करणे सोडणार नाही, स्वच्छता आम्हाला अजीबात मान्य नाही, हे आम्ही कृतीतून दाखवून दिले आहे. घाण करणे, कुठेही कचरा फेकणे, मनात येईल तिथे थुंकणे, हा आमचा जन्मसिद्ध अधिकार असल्यासारखे आम्ही वागत आहोत. अगदी गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत सगळीकडचे लोक असेच वागत आहेत. तंबाखू खाऊन भररस्त्यात थुंकणे, सिगारेट ओढून झाल्यानंतर त्याचे जळते थुटूक रस्त्यावर फेकणे, केळ खाल्ल्यानंतर साल कुठेही फेकणे, शेंगा खाऊन टरफलं फेकत चालणे, बिस्किटे खाऊन रॅपर रस्त्यावर फेकणे, घरातील कचरा निर्धारित ठिकाणी न टाकता रस्त्याच्या कडेला नेऊन फेकणे, असे बेजबाबदार वर्तन आम्ही करतो आहोत आणि त्याची कसलीही लाज आम्हाला वाटत नाही, ही सर्वाधिक दु:खाची बाब आहे. सरकार त्याचे काम करतेच आहे. पण, आपण या देशाचे एक नागरिक म्हणून आपली जी कर्तव्ये आहेत, ती प्रामाणिकपणे पार पाडतो आहोत का, याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे.
 
 
 
सगळीच कामं सरकारवर ढकलायची अन्‌ आपण बेजबाबदारपणे वागायचे, हे काही योग्य नाही. आपल्यातील अनेक लोक स्वत:चे घर स्वच्छ ठेवत नाहीत, स्वत: स्वच्छ राहात नाहीत, मग त्यांच्याकडून परिसर स्वच्छ राखला जाण्याची काय अपेक्षा करणार? पण, जे लोक सुबुद्ध आहेत, ज्यांना स्वच्छता मनापासून आवडते, त्यांच्याकडून समाजाला अन्‌ देशाला अपेक्षा आहेत. जबाबदार नागरिकांनी त्यांची जबाबदारी ओळखून काम केले, तर बेजबाबदारांचे डोळे
निश्चितच उघडतील अन्‌ एक दिवस लोकलज्जेस्तव का होईना, तेही स्वच्छ भारत अभियान यशस्वी करतील, अशी आशा करू या. पावसाळा संपला आहे. हिवाळा सुरू झाला आहे. हिवाळ्यातील रोगराई अस्वच्छतेमुळे वाढू नये, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. रोगराईपासून स्वत:चे संरक्षण करणे, ही आपल्या सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे. विशेषत: लहान मुलांना आजाराचा मोठा धोका असतो. साथीचे रोग पसरण्याची भीती असते. असे होऊ नये यासाठी स्वच्छतेवर विशेष भर दिला जाणे आवश्यक ठरते. आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवणे, ही महानगरपालिकेची वा स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी असली, तरी ती आपलीही जबाबदारी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या पातळीवर हे काम करणारच आहेत. पण, आपणही त्याला हातभार लावणे आवश्यक आहे. आपल्या घराच्या आसपास कुठेही कचरा न फेकता तो कचराकुंडीतच नेऊन टाकला पाहिजे, यावर आपला कटाक्ष असला पाहिजे. इतर कोणी कचरा फेकत असेल, तर त्याला टोकले पाहिजे. थोडा वाईटपणा जरूर येईल, पण नागरिकांना शिस्त लागेल. त्यामुळे पंतप्रधानांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानात प्रत्येकाने सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे. प्रत्येकाचे आरोग्य उत्तम राहावे, असे सरकारला प्रामाणिकपणे वाटते आहे. महात्मा गांधींच्या स्वप्नातील स्वच्छ भारत अस्तित्वात आणायचा असेल, तर प्रत्येकाने स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. योजना पंतप्रधानांची आहे, त्याच्याशी आपल्याला काय करायचे आहे, पंतप्रधान तर भाजपाचे आहेत, आपण तर कॉंग्रेसचे आहोत, असा पक्षीय विचार न करता प्रत्येकाने चांगल्या गोष्टीत योगदान देणे आवश्यक आहे. स्वच्छतेला राजकारणाचे गालबोट लागू न देता काम करणे देशहिताच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. राजकारण आपल्या जागी आहे. निवडणुका आल्या की प्रत्येक पक्षाने, त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जरूर राजकारण करावे. एकमेकांवर आरोप करावेत. पण, निवडणुका झाल्यात की संपूर्ण देश एक आहे, आम्ही सगळे एक आहोत, या भावनेने काम करायला हवे. असे केले तर देश अखंड राहील, स्वच्छ राहील अन्‌ सुरक्षितही राहील...
••
• गजानन निमदेव