द लॉस्ट वर्ल्ड

    दिनांक :24-Nov-2019
|
‘थोडं वेगळं’ या सदरासाठी ‘पावलं शाश्वत विकासाची’ ही सेंट्रल थीम घेऊन अनुभवनिष्ठ लेखन करताना अनेकदा अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण करण्यात आलं आणि या सदराला ‘थोडं वेगळं’ हे शीर्षक देण्यात आल्यामुळे तात्त्विक वैविध्याकडे बघण्याचा कॅलिडिओस्कोपिक दृष्टिकोनही ठेवण्यात आला आणि व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलूदेखील तटस्थ दृष्टिकोनातून बघण्यात आले. वाचकांशी झालेल्या संवादातून त्यांची विज्ञानाविषयक आणि तंत्रज्ञानाविषयक असलेल्या आस्थेतून त्यातील वैज्ञानिक सिद्धांत ललित साहित्याच्या रूपाने त्यांच्यासमोर आणखी जास्त प्रमाणावर आणण्याची निकड असल्याचं जाणवलं. सामान्यतः सर्वांना विज्ञानातील असंख्य बाबी अत्यंत कुतूहलनीय वाटतात आणि त्यांना त्याच कथेच्या स्वरूपात सोप्या पद्धतीने सांगण्यात आल्या तर योग्य रीतीने आकलनीय होऊ शकतात, हे प्रमाणित झाल्याचे जाणवल्यामुळे ‘द लॉस्ट वर्ल्ड’ हा विज्ञान गूढकथासंग्रह पुन्हा नव्याने कॅलिडिओस्कोपिक व्ह्यूमधून बघण्याचा प्रयत्न केला.
 
 
 
‘द लॉस्ट वर्ल्ड’ हा विज्ञान गूढकथासंग्रह दखलपात्र ठरावा, याचे विशेष समाधान आहे. काही वर्षांपूर्वी दैनिक तरुण भारतच्या ‘आसमंत’ पुरवणीत याचे काही भाग प्रसिद्ध झाल्यामुळे त्यातील तात्त्विक मर्म जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून काही वाचकांच्या संग्रही वैज्ञानिक डिक्शनरीजचा समावेश झाला होता आणि त्यातील सर्व कथा ओत्सुक्यपूर्ण असल्याने लवकरच त्याच्या पुढील भाग प्रकाशित करण्याची मागणी करण्यात आली.
 
कथासंग्रहावर भरपूर भाष्य, कौतुक, एका अर्थाने परीक्षण, समीक्षेच्या अंगाने विवेचन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामागचं कारण म्हणजे या संग्रहाला प्राप्त झालेले महत्त्वपूर्ण पुरस्कार आणि मोजक्या विज्ञानकथा लेखिकांच्या यादीत एक नाव अधिकाधीन झालेलं! ‘कथेमागची कथा’ जाणून घेण्याचा प्रयत्न कित्येक साहित्यसंस्थांच्या विचारपीठावर करण्यात आला आणि त्यानंतरच्या अतिव्यग्र दिनक्रमात या वैशिष्ट्यपूर्ण साहित्यकृतीपासून काहीसं अलिप्त व्हावं लागलं. अमरावतीच्या एका वाचकाने पुन्हा विज्ञान कथाप्रवास सुरू करण्याची विनंती केली आणि ‘द लॉस्ट वर्ल्ड’चे अंतर्दालन आपोआप उघडले गेले.
कुठलीही कथा लिहिताना तिचं कथामूल्य कशा रीतीने जोखल्या जाईल, तिचा वाचकवर्ग कुठला असेल आणि वाचकांच्या पसंतीस ती उतरेल की नाही, याचा विचार कथालेखक करत नसतो. कथा आणि लेखकाची पार्श्वभूमी, याचा कितपत संबंध असतो, हादेखील संशोधनाचा विषय असावा. मात्र, साहित्यकृती ही आपोआप, स्वाभाविकतेने होणारी ‘घटना’ असते, हे मात्र सत्य आहे. साहित्य अनुभवनिष्ठ असेल तर सखोल आणि व्याप्त असतं.
 
विज्ञानकथा लिहितेवेळी अनुभव गाठीशी होताच, मात्र त्याच्या भविष्यकालीन अॅक्सेप्टन्सचा विचार केला नव्हता. केवळ विज्ञानाची माहिती सांगायची असेल तर ती रंजक बनेल का? त्यामध्ये फिक्शन टाकायचे, तर त्याचे प्रमाण नेमके काय असायला हवे? तिला विज्ञानाचे अधिष्ठान किती प्रमाणावर गुंफायचे? विज्ञानकथा ही रंजनात्मक असावी की उद्बोधक? तिच्यात शास्त्रीय विवेचनाचा भाग किती असावा? वैज्ञानिक विषयांचे विवेचन करणे हा तिचा हेतू मानल्यास तिच्या साहित्यिक स्वरूपाला बाधा येऊ शकते का? वैज्ञानिक शोध आणि त्यांचे तंत्रज्ञानात झालेले रूपांतर यांना सद्य:कालाशी जुळवून उत्कंठावर्धक कथा बनवायची असेल, तर त्यातून काही प्राचीन रहस्य साकारावे लागेल का? थक्क करणार्‍या कल्पना आणि वर्तमानकाळ यांना एकत्र गुंफून कल्पनातीत थरार या प्राथमिक बाबी विज्ञान गूढकथेत अपेक्षित असतात आणि सामान्यतः पात्रांचे, विशेषतः संशोधक, प्राध्यापक पात्रांच्या रूपाने वाचकांसमोर आणते वेळी संकटकाळी त्याची विचारक्षमता, निर्णयक्षमता अडचणीतून बाहेर पडण्यासाठी त्याने त्वरित घेतलेले विज्ञाननिष्ठ निर्णय, त्यातून साकारलेल्या तात्त्विक आणि झटपट कृती विविध अडथळे पार करून रहस्याच्या गाभ्यापाशी पोहोचणे, उंच घाटावरील रोलर कोस्टरमधील वा धूमकेतूवर आरूढ होऊन झालेला प्रवास नेमक्या शब्दांत व्यक्त होणं आवश्यक! या सर्वांचा विचार मनात नसतानाही ‘द लॉस्ट वर्ल्ड’मधील कथा साकारत गेल्या.
 
इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग क्षेत्रातील प्राध्यापकी आणि संशोधक या दोन्ही भूमिकांमधून मेंदूमध्ये जमा झालेल्या माहितीतून ‘द लॉस्ट वर्ल्ड इन न्यूरल नेट्स’ ही कथा सुमारे वीस वर्षांपूर्वी साकारली गेली. आपला मेंदू तसा चोवीस तासही कार्यरत! मात्र, एखाद्या महत्त्वपूर्ण व्यक्तीचा अपघातात ब्रेन डेड झाल्यानंतर त्यातून माहिती रिकव्हर होऊ शकते का? मेंदूत चित्रित होणार्‍या घटना बाहेरच्या स्क्रीनवर दाखवता येतात का? न्यूरल चिप इन्सर्ट केल्यानंतर डेड झालेले न्यूरॉन्स अॅक्टिव्हेट होतात का? ब्रेनच्या ओव्हर ऑल स्ट्रक्चरशी ती कॉम्पॅटिबल असते का? एखाद्या व्यक्तीची फॅमिली हिस्ट्री माहिती करवून न्यूरल चिपमध्ये डेटा फीड करणं, न्यूरॉन्सला ट्रेिंनग देणं, डिसिजन सेंटर्स अॅक्टिव्हेट करणं, ती मायक्रो चिप बाहेरून नियंत्रित करणं, कृत्रिम रीत्या ब्रेन ऑपरेट करणं या सर्व बाबी तांत्रिक ज्ञानावर आधारलेल्या असल्या, तरी अमेरिकेसारख्या अतिप्रगत देशात आणि अत्याधुनिक न्यूरो रिसर्च सेंटरमध्येदेखील वर्णभेद, वंशवाद आणि यासोबतच रिसर्च कॅलिबर असणार्‍या स्त्रियांनादेखील पुरुषांच्या अधिपत्यानंतर पत्करावी लागणारी दुय्यम वागणूक आदींचा उल्लेख या कथेत झाला आहे.
 
त्यानंतर ‘द लॉस्ट वर्ल्ड इन स्पेस’ या कथेत एका स्पेस रिसर्च सेंटरमध्ये दुसर्‍या सोलर सिस्टीममधील ग्रहावर मानवाचे अस्तित्व शोधण्यासाठी एक क्राफ्ट मिशन बनतं. पृथ्वीसमान वातावरणाचा शोध घ्यायचा, त्याचा अभ्यास करायचा आणि माहिती पोहचवण्यासाठी दुसर्‍या सूर्यकुलापासून आपल्या पृथ्वीपर्यंत इफिशियंट िंलक अॅस्टॅब्लिश करणे, हे त्यांचं उद्दिष्ट असतं. एका आयुष्यात ते तिथे जाऊन वापस येतील का? त्यांचे वय पृथ्वीच्या रेफरन्स रिजनमधून बाहेर पडल्यावर वाढेल की गठित होईल, यानात वजनरहित अवस्थेत अनेक दशक वर्षे राहून, घरी वापस आल्यानंतर काय घडेल? यानाचा स्पीड मल्टिप्लिकेटिव्ह फॉर्म्युला अॅक्टिव्हेट झाला तर? आपली सूर्यमाला सोडून दूर गेल्यानंतर कुठला दिवस आणि कुठली रात्र? काळ्याकभिन्न स्पेसयात्रेत मानसिकता कशी असेल? सॉलिपसीझन िंसड्रोमचे पेशंट्स बनून तर राहावं लागणार नाही ना? यानाचं इंधन स्पेसमध्येच संपलं तर? स्पेस जंकमुळे अपघात झाला तर? या प्रवासात ब्लॅक होलमध्ये चुकून प्रवेश झाला तर काय? ही कथा लिहिताना कल्पनाविलासामुळे अनेकदा श्वास कोंडला गेला. मला वाटतं, काही संवेदनशील कथालेखकांना हा अनुभव येत असेल.
 
आकाशाची सुरुवात कुठून होते? ते कुठे संपतं? ब्रह्मांडात किती तारे, ग्रह आणि किती सूर्यमाला असतील? दिशा दहा आहेत की इंफायनेट? कारण एखाद्या बाणाप्रमाणे ब्रह्मांडाच्या पोकळीचा वेध घ्यायचं म्हटलं तर असंख्य दिशा! आणि सर्व दिशांनी ग्रहतारे व्यापलेले! कुठल्याही दिशेला प्रवास संपणार नाही. तो अव्याहत सुरूच राहणार!
चंद्राजवळील लॅग्रांज पॉइंट्सवर मानवी वसाहत उभारली जाऊ शकते का? पृथ्वीवरील सर्व इंधन येत्या काही वर्षांत संपल्यावर आपल्याला हा पर्यायदेखील असावा, हे विनोदाने नमूद करताना ‘रिन्यूएबल एनर्जी’चा वापर अधिकाधिक व्हावा, हा आग्रह विज्ञानकथेद्वारे करण्यात आला.
 
‘द लॉस्ट वर्ल्ड इन सी’ या कथेचा नायक ‘मॅथ्यू!’ वाईल्ड लाईफ कॅच करण्याचा केवळ स्वतःचा छंद जोपासण्यासाठी हाय कॉन्फिगरेशन कॅमेरा वापरणारा ‘मॅथ्यू’ फ्रीलान्सर अॅक्टिव्हिटीजपासून प्रोफेशनल बनतो आणि त्या लेव्हलवरून अॅनिमल प्लॅनेट, डिस्कव्हरी आदी चॅनेलसाठी डॉक्युमेंटरी फिल्म्स बनवत जातो. टायगर मिशन्स, स्नेक्स, इंसेक्ट्स आदींचं चित्रण करताना, त्यांच्या मायक्रो हालचाली टिपण्यात त्याला आनंद मिळू लागतो. पृथ्वीवरील जियोग्राफिक कंडिशन्स चेक करताना तो अचंबित होतो. त्यावरील समुद्र जलव्याप्ती, अर्थक्वेक्स, ज्यालारसाचा कल्लोळ आदी त्याला साद घालत राहतात. मॅक्सिकोवरून पॅसिफिक ओशनच्या एका मिशनवर तो निघतो आणि डेड सीमध्ये एका तांत्रिक चुकीने घुसतो. तिथे एक नवीन दुनिया वसलेली असते, जिथे असलेल्या प्रोटॉनिक फील्डमुळे त्याचे इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट्स निष्क्रिय होतात आणि जगाशी संपर्क तुटतो.
 
‘द लॉस्ट वर्ल्ड इन फॉरेस्ट’ या कथेत एका गुहेतील अलग जगाशी परिचय होतो.
‘द लॉस्ट वर्ल्ड ऑन सन’ या कथेतून युनिव्हर्स, डार्क मॅटर, फ्युजन रिअॅक्शन्स आदींसोबतच संशोधनाच्या दृष्टिकोनातून सोलार मॉडेल री एक्झामिन करण्याची आवश्यकता, विश्वनिर्मितीच्या उद्देशाने एका प्रोटॉनचे ‘बिग बँग’ सेट अपच्या इनर कोअरमध्ये प्रवेश करून रेडिओक्टिव्ह आणि कन्व्हेक्शन झोनमधील प्रवास, एक सूक्ष्मदेह बनून सूर्यावर प्रवेश, त्याच्या फोटोस्फियर, क्रोमोस्फियर आणि करोनाचा प्रवास मांडण्याचा प्रयत्न केला.
विधात्याने अत्यंत विचारपूर्वक केलेली जगाची निर्मिती आणि त्यातील कल्पकता अनुभवण्यासाठी आम्ही विज्ञाननिष्ठ कथालेखकांनी आपली अनुभूतिकेंद्रं अधिक सचेत करायला हवी. आपल्या साचेबद्ध तत्त्वप्रणालीतून काहीसं बाहेर पडून वाचकांना सायन्स फिक्शन स्टोरीजमधूनही शाश्वत मूल्यांची जाणीव करून देता येऊ शकते. यातून विकासाची काही आणखी पावलं गतीने पडतील, यात शंका नाही
(स्तंभलेखिका ‘इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग’च्या प्राध्यापिका आणि प्रथितयश साहित्यिक आहेत.)
••