चंदा कोचर यांच्या ‘बायोपिक’च्या प्रदर्शनावर बंदी!

    दिनांक :24-Nov-2019
|
आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाच्या प्रदर्शनावर दिल्ली हायकोर्टाने शनिवारी बंदी घातली. चंदा कोचर यांचे वकील विजय अग्रवाल आणि नमन जोशी यांनी संबंधित चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी लादण्याची मागणी केली होती. हा चित्रपट चंदा कोचर यांचा बायोपिक आहे. चित्रपटाची कथा चंदा कोचर यांच्या आयुष्यावर आधारित आहे, असा दावा या वकीलांनी आपल्या याचिकेत केला होता.
 

 
'Chanda : A Signature that Ruined a Career' असे या चित्रपटाचे नाव आहे. अद्याप सीबीआय व ईडी चंदा कोचर यांची चौकशी करत आहेत. चंदा कोचर यांना 20 नोव्हेंबर 2019 रोजी हा चित्रपट त्यांच्या आयुष्यावर आधारित असल्याचे समजले. यासंदर्भात विजय अग्रवाल यांनी संबंधित चित्रपटाविरोधात याचिका दाखल केली. चित्रपटाच्या शीर्षकातही चंदा कोचर यांच्या नावाचा उल्लेख आहे. या चित्रपटासंदर्भात चंदा कोचर यांची कुठलीही पूर्वपरवानगी घेतली गेली नव्हती.
या चित्रपटाची लीड हिरोईन ही सुद्धा प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना चंदा कोचर यांच्या आयुष्यावर उघड-उघड बोलतेय. याप्रकारचे बायोपिक आणि प्रमोशनल इंटरव्ह्यू चुकीचे आहे. यामुळे चौकशी प्रभावित होण्याची शक्यता आहे. वकीलांच्या या युक्तिवादानंतर हायकोर्टाने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी लादली. या चित्रपटात अभिनेत्री गुरलीन चोप्रा हिने चंदा कोचर यांची व्यक्तिरेखा साकारली आहे.