नवी समीकरणे...

    दिनांक :24-Nov-2019
|
मंथन
भाऊ तोरसेकर
 
पत्रकारितेत किंवा राजकीय विश्लेषणात नवनवी समीकरणे मांडली जात असतात. विधानसभा निवडणुकीनंतर महायुती शिवसेनेने मोडून मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी नवे राजकीय समीकरण उभे केले आहे. त्याचे अर्थातच पत्रकारांना कौतुक असल्यास नवल नाही. आजवर ज्या पक्षांनी परस्परांचे शत्रुत्वच केले, त्या पक्षांनी एकत्र येऊन सत्तास्थापना करणे, हे नवेच अतर्क्य समीकरण असते. पण, राजकीय घडामोडीमध्ये वा प्रक्रियेमध्ये एका बाजूचे नवे समीकरण उभे राहात असताना; पलीकडे दुसरेही समीकरण आकार घेत असते. सहसा असे समीकरण तत्काळ नजरेत भरणारे नसते, पण आकार घेत असू शकते.
 
1984 सालात मुंबई-ठाण्यापुरती मर्यादित असलेल्या शिवसेनेला सोबत घेऊन लोकसभेच्या निवडणुका लढवण्याचे नवे समीकरण प्रमोद महाजन यांनी जुळवले. तेव्हा, त्याचे भवितव्य कुणाला माहिती होते? त्यावेळी वामनराव महाडिक व मनोहर जोशी असे दोन शिवसेना उमेदवार लोकसभेला उभे राहिले, ते भाजपाच्या कमळ निशाणीवरच लढले होते. अर्थात, राजीव लाटेमध्ये सर्व पक्षांचा बोजवारा उडाला आणि भाजपालाही मोठा दणका बसला होता. त्यात सेनेचे दोन्ही शिलेदार कमळ निशाणी घेऊनही पराभूत झाल्याचा इतिहास वेगळा सांगायला नको. ते समीकरण फार काळ टिकले नाही आणि काही महिन्यातच आलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने सेनेची साथ सोडून शरद पवारांनी जुळवलेल्या पुलोद आघाडीशी संगनमत केलेले होते. पण, 1984 च्या त्या पहिल्या युतीमध्ये जे बीज पेरले गेले, त्याचे भरभरून पीक 1988 नंतरच्या राजकारणात आले. 1990 सालात तर त्याच युतीला घाबरून शरद पवार यांनी काँग्रेसला रिपब्लिकन आठवले गटाशी आघाडी करायला भाग पाडलेले होते. पण, हे 1984 सालात नगण्य वाटणारे सेना-भाजपा समीकरण इतके फलदायी ठरू शकेल, असे महाजन वा बाळासाहेबांना तरी कुठे ठाऊक होते? आजची कहाणी थोडीफार तशीच आहे. 
 
 
आज महायुती मोडून शिवसेना मुख्यमंत्रिपद मिळवायला दोन्ही काँग्रेसच्या गोटात दाखल झालेली आहे आणि शरद पवार त्या नव्या आघाडीचे प्रेरणास्थान झालेले आहेत. या हालचाली सुरू असताना एका किरकोळ मराठी पक्षाशी एका लहान महापालिकेसाठी भाजपाने महापौर निवडणूक जिंकण्यासाठी हातमिळवणी केलेली आहे. नाशिक महापालिकेत भाजपाची संख्या चांगली असली, तरी त्यांचेच काही नगरसेवक विधानसभेच्या वेळी बंडाचा झेंडा घेऊन उभे राहिले होते. म्हणून आता आलेल्या महापौर निवडणुकीत भाजपा साशंक होती. कारण मुख्यमंत्रिपद मिळवायला शत्रुत्व घेणार्‍या शिवसेनेने महापालिकेतही भाजपाला धडा शिकवण्यासाठी कंबर कसलेली होती. त्यासाठी नाशिकमध्येही दोन्ही काँग्रेसला सोबत घेऊन भाजपाला घाबरवले होते. अशावेळी अचानक तिथे नगण्य वाटणारा मनसे हा पक्ष भाजपाच्या मदतीला धावून आला आणि तिथे भाजपाचा महापौर बिनविरोध निवडून येण्यापर्यंत मजल गेली. मुद्दा त्या एका महापौरपदाचा नसून, गेल्या पाच-सहा वर्षांत नामोहरम होऊन गेलेल्या मनसे या प्रादेशिक पक्षाचा आहे. त्याच्या नव्याने आपली जमीन शोधण्याचा आहे. 2009 सालात लागोपाठ मोठी मजल मारत निघालेल्या राज ठाकरे यांचा मनसे हा पक्ष मोदीलाटेनंतर भरकटत गेला होता. त्यातून सावरण्यासाठी त्यांना नवनवे प्रयोग व कसरती कराव्या लागलेल्या आहेत. 
 
शिवसेनेशी वाद नको म्हणूनही भाजपाला मनसेशी अनेकदा हातमिळवणी करणे शक्य झालेले नव्हते. आता तो रस्ता नाशिकच्या महापौर निवडणुकीने खुला केला आहे. यात आज मनसेची असलेली ताकद दुय्यम असून त्याची विस्ताराची क्षमता मोलाची आहे. मनसे हा शिवसेनेतून बाजूला झालेला गट असून, शिवसेनेला पर्यायी असा नवा प्रादेशिक पक्ष होऊ शकतो. जिथे शिवसेना आपली भूमी सोडत जाईल, ती व्यापण्याची भाजपाला शक्यता नसेल, तर मनसेने तिथे आपले बस्तान बसवण्याला भाजपाही रणनीती म्हणून प्रोत्साहन देऊ शकते. उदाहरणार्थ, आयुष्यभर काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्याशीच दोन हात करून शिवसेना विस्तारलेली आहे. नेत्यांचे आग्रह व अट्टहास भागवण्यासाठी त्या स्थानिक पातळीवर शिवसैनिकांनी पत्करलेली भांडणे संपत नाहीत. मुंबईत नेत्यांची युती, आघाडी झाल्याने त्या गल्लीबोळातील कार्यकर्ते स्थानिक नेत्यांमधली वैरभावना संपुष्टात येत नाही. साहजिकच अशा वरवरच्या आघाड्या जमवल्या जातात, तेव्हा त्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांची पुरती तारांबळ उडत असते. त्यांना हाती काहीही न लागता नुसती शरणागती पत्करणे रास्त वाटत नाही. म्हणूनच असे कार्यकर्ते अन्य मार्ग शोधू लागतात. जर नेते आपल्या मतलबासाठी पक्षाच्या भूमिका सोडून वाटेल ते करणार असतील, तर कार्यकर्तेही तसेच आपल्या सोयीचे पर्याय शोधू लागतात. 
 
म्हणूनच या नव्या आघाडीतील शिवसेनेतील चलबिचल महत्त्वाचा टप्पा आहे. त्या शिवसैनिकांची घुसमट वाढत जाणार आहे आणि त्यांची तगमग नव्या मार्गांचा शोध घेऊ लागणार आहे. असा वेगळा मार्ग थोडाफार परिचित असण्याला प्राधान्य आहे. तो परिचित मार्ग मनसे आहे. कारण, हा पक्षच मुळात शिवसेनेतून बाहेर पडलेला गट आहे आणि त्याचेही नेतृत्व ठाकरेच करतो आहे. किंबहुना अनेक शिवसैनिकांना राज यांच्यात आपले लाडके साहेब दिसत असतात. त्यामुळे नाराज शिवसैनिकांसाठी ट्रान्झिट कॅम्प किंवा पर्याय म्हणून मनसे असू शकते. एकीकडे शिवसेनेमधली चलबिचल हळूहळू कानी येऊ लागलेली आहे आणि दुसरीकडे भाजपाने मनसेची मदत घेतलेली आहे. त्यात भविष्यात या दोन पक्षांमध्ये नवे काही समीकरण जुळण्याची शक्यताही आकारास येऊ शकते. अर्थात, तेही इतके सोपे काम नाही. कारण, लोकसभा व विधानसभेच्या काळात राज ठाकरे यांनी भाजपावर मुलूखमैदान तोफा डागलेल्या आहेत. त्यामुळेच भाजपाच्या गोटात लगोलग दाखल होणे त्यांच्यासाठीही सोपे राहिलेले नाही; पण ज्या गतीने युती मोडून शिवसेना सत्तेसाठी काँग्रेस गोटात जाऊ शकली, तसेच मनसेचे काम अवघड मानायचे कारण नाही. 
 
अर्थात, तत्काळ मनसे-भाजपा एकत्र येण्याची शक्यता नाही. पण, दरम्यानच्या काळात शिवसेनेतील कुरबुरी जशा वाढत जातील, तसा मनसेकडे शिवसैनिकांचा ओढा वाहू लागणे शक्य आहे. केंद्रातली सत्ता हातात असताना व राज्यातही आपले बळ वाढलेले असताना, भाजपा अशा घटनेला प्रोत्साहन देऊ शकते. तिला आज शिवसेनेने शत्रूच मानलेले आहे, तर शत्रुपक्ष खच्ची होण्याला भाजपाने हातभार लावला, तर कुणी भाजपाला दोषही देऊ शकणार नाही. पण, जे कोणी सेनेतले नाराज असतील, त्यांना मनसेकडे वळवण्यासाठी भाजपा आपली शक्ती लावू शकते. भविष्यात सेनेऐवजी नवा प्रादेशिक पक्ष म्हणून भाजपा मनसेला जवळ घेऊ शकेल. नाराज शिवसैनिक भाजपाकडे येण्यात अडचण असली, तर त्याला मनसेकडे वळवण्याची रणनीती भाजपाही खेळू शकते. 
 
शरद पवारांच्या नादी लागून तरी मनसेने काय मिळवले आहे? मग शिवसेनेतील नाराजी आपले हत्यार बनवून राज ठाकरे कामाला लागले, तर भाजपा त्याला अप्रत्यक्षपणे हातभार लावण्याची मोठी शक्यता आहे. त्याची सुरुवात नाशिक येथील महापौर निवडणुकीत झाली नसेल, असे कोणी म्हणू शकेल काय? एक निश्चित आहे. भाजपाच्या युतीत राहून जी मस्ती शिवसेना दाखवीत होती, ती नव्या समीकरणातले मित्रपक्ष अजीबात सहन करणार नाहीत. त्यातूनच शिवसेनेचा संवेदनशील उत्साही कार्यकर्ता अधिक दुखावला जाणार आहे आणि तोचतर मनसेच्या मेगाभरतीचा कच्चा माल असणार आहे. भाजपाने त्याला फक्त खतपाणी घालायचे आहे. कारण, भाजपाचे चाणक्य, राज ठाकरे यांची क्षमता ओळखण्याइतके हुशार नक्कीच आहेत. त्यांना भविष्यातला एक नवा प्रादेशिक पक्ष घडवण्यात जुन्या मित्रपक्षाला धडा शिकवण्याचा डावही खेळता येणार आहे. म्हणूनच एका बाजूला सत्तेचे जे समीकरण जुळवले जात आहे, तेव्हाच सहसा नजरेत न भरणारे दुसरे समीकरणही काळजीपूर्वक तपासले पाहिजे व हिशोबात घेतले पाहिजे.