अरे बापरे! पाकिस्तानात टोमॅटो 400 रुपये किलो

    दिनांक :25-Nov-2019
|
•विजय सरोदे
 
पाकिस्तानातील महागाई कमी होण्याचे नावच घेत नाही. कराची या सर्वात मोठ्या शहरात सध्या टमाच्या भाव तब्बल 400 रुपये प्रति किलोग्रॅम एवढा आकाशाला भिडलेला आहे! याचे कारण, म्हणजे- भारतातून होणार्‍या आयातीवर या शेजारी ( की अरि!) देशाने घातलेली बंदी होय. भारताने काश्मिरसाठीचे 370 कलम रद्द केल्यानंतर हा अंतर्गत संघर्षामुळे हैराण झालेला देश अक्षरश: पिसाळल्यासारखा वागू लागलेला आहे. आधीच या देशाची अर्थव्यवस्था दिवाळखोरीमुळे नाजूक झालेली असताना त्याने आपल्या पायावर धोंडा पाडूनच घेण्याचेच ठरविले आहे की काय? असे वाटू लागले आहे. त्याची धोरणे इतकी विचित्र झाली आहेत, की- आपण काय करतो आहोत, हेच त्याच्या ध्यानात येत नाही. 

 
 
पाकिस्तानने इराणमधून 4 हजार 500 टन टमाटे आयात करण्याची ऑर्डर दिलेली आहे. पण अजूनही त्याच्या या शेजारच्या देशातून पुरेसा टमाटेही आलेले नाहीत. जेमतेम हजार टनांपर्यंत टमाटे आलेले असल्याने त्यांच्या निर्माण झालेल्या तीव्र टंचाई व वाढत्या मागणीमुळे बाजारावरील दबाव व टमाट्याचे भाव अभूतपूर्व वेगाने वाढू लागले आहेत.
 
 
हे भाव गेल्या आठवड्यातील 300 रुपयांवरून बुधवारी 400 रुपयावर गेले, तेव्हा कराचीकरांना धक्काच बसला! देशातील टमाट्याच्या उत्पादनात झालेली मोठी घट हे या महागाईचे कारण असले, तरी व्यापार्‍यांकडूनन केली जाणारी साठेबाजीही दुर्लक्षित करता येत नाही. सध्या इराण व स्वात येथील टमाटे विक्रीसाठी कराचीत येत असतात. पण तिथेच टमाट्यांची टंचाई असल्याने त्याचे भाव सतत चढते राहू लागले आहेत.
 
 
या महिन्याच्या प्रारंभी टमाट्यांची अधिकृत किरकोळ किंमत 117 रु. प्रतिकिलो एवढी झाली होती. पण तेवढ्यावरच ती न थांबता वाढतच राहिली आहे. याला जबाबदार मध्यवर्ती सरकार असून त्याने टमाट्यांची देशातील आयात सर्वांना खुली नसून काही ठराविक लोकांपुरतीच मर्यादित ठेवलेली आहे. त्यामुळे जे काही थोडेफार टमाटे या देशात आले ते हातोहात खपत आहेत. त्यामुळेच त्यांचा भाव एवढा वाढू लागलेला आहे.
 
 
याआधी भारतातून आयातीमुळे टमाट्याचे भाव काहीसे स्थिर राहिले होते. पण सरकारची अकाली धोरणे आणि मुसळधार पावसाने त्यांच्या उत्पादनावर झालेला विपरीत परिणाम यामुळे हे भाव आता पाचशे रुपयांपर्यंतही जाऊ शकतात असे तेथील ठोक व्यापार्‍यांचे म्हणणे आहे.
भारतातही या बाबतीत काही आलबेल असल्याची स्थिती नाही. देशात टमाट्यांच्या किमतींनी शंभरी गाठली होती. सध्या कांद्याचेही भाव चढे आहेत. अशातच डाळींच्या वाढत्या किमतींनीही सरकारपुढे डोकेदुखी उभी केली आहे.
 
 
उडीद डाळीच्या किमतीने शतक पूर्ण केले असून तुरीची डाळही 98 रुपये प्रतिकिलो तर मुगाची डाळही 95 रुपये प्रतिकिलो आणि मसूर डाळीची किंमत 72 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे सामान्य लोकांपुढे अडचणींना तोंड देण्याची वेळ आली आहे.
 
 
यामुळे जागे झालेले सरकार आता कृतिशील झाले असून सचिवांच्या एका समितीने देशातील डाळींचा पुरवठा वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. तर दुसरीकडे, सरकारने आयात वाढविण्याची तयारीही दर्शविली आहे. त्यामुळे नाफेडतर्फे तूर, उडीद व मूग डाळीचा राखीव साठा (बफर स्टॉक) करण्यात येणार आहे.
 
 
(लेखक जळगाव तरुण भारतचे अर्थविषयक स्तंभलेखक आहेत.)