गोविंदा आणि जॅकी श्रॉफ यांना न्यायालयाने ठोठावला दंड

    दिनांक :25-Nov-2019
|
उत्तरप्रदेशमधील मुझफ्फरनगर येथील ग्राहक न्यायालयाने प्रसिद्ध अभिनेता गोविंदा आणि जॅकी श्रॉफ यांना वेदनाक्षमक तेलाच्या खोट्या जाहिरातीसाठी २० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच हे तेल तयार करणाऱ्या कंपनीलाही दंड ठोठावण्यात आला आहे. पाच वर्षांपूर्वी एका व्यक्तिने हर्बल तेल उत्पादक कंपनी आणि त्या तेलाचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर गोविंदा व जॅकी यांच्याविरोधात खटला दाखल केला होता. या खटल्यावर निर्णय देताना न्यायालयाने त्यांना दंड ठोठावला आहे.
 
 
 
नेमकं प्रकरण काय होतं?
२०१२ साली अभिनव अग्रवाल यांनी वृत्तपत्रात आलेली एक जाहिरात पाहून आपले ७० वर्षीय पिता बृजभूषण अग्रवाल यांच्यासाठी हर्बल तेल खरेदी केले होते. गुडघेदुखीसाठी खरेदी केलेल्या या तेलाची किंमत ३,६०० रुपये इतकी होती. “या तेलाचा नियमित वापर केल्यास केवळ १५ दिवसांत शरीरातील सर्व वेदना पळून जातील आणि जर वेदना कमी झाल्या नाहीत, तर १५ दिवसांत तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील,” असा दावा या तेलाच्या जाहिरातीत गोविंदा आणि जॅकी श्रॉफ यांनी केला होता. कंपनीने जाहिरातीत छातीठोकपणे केलेला हा दावा खोटा निघाला. बृजभूषण यांची गुडघेदुखी १५ दिवसांनंतरही कमी झाली नाही. त्यामुळे अभिनव यांनी याबाबत कंपनीकडे तक्रार करुन आपले पैसे परत करण्याची विनंती केली. परंतु कंपनीने पैसे परत करण्यास नकार दिला. अशी माहिती NDTV इंडिया या वेबसाईटने दिली आहे.
त्यानंतर अभिनव यांनी ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत या प्रकरणी न्यायालयाकडे दाद मागितली. हे संपूर्ण प्रकरण गेली पाच वर्षे न्यायालयात सुरु होते. अखेर न्यायालयाने सबळ पुराव्याच्या आधारावर अभिनय यांच्या बाजूने निर्णय देत तेल कंपनी, गोविंदा, जॅकी श्रॉफ, टेलीमार्ट शॉपिंग नेटवर्क प्राइवेट लिमिटेड कंपनी या चौघांनाही दोषी ठरवले व त्यांना २० हजार रुपयांचा दंड ठोठावला. आता हे दौघेजण मिळून अभिनव यांना २० हजार रुपये परत करणार आहेत.
 
''गोविंदा आणि जॅकी श्रॉफ यांच्यावर विश्वास ठेऊन मी हर्बल तेल विकत घेतले होते. परंतु कंपनीने केलेला दावा खोटा निघाला. तसेच त्यांनी जाहिरातीत सांगितल्याप्रमाणे पैसे देखील परत करण्यास नकार दिला. त्यामुळे मी न्यायालयाकडे दाद मागितली होती.” – अभिनव अग्रवाल