कंगनाकडून राम मंदिरावरील 'अपराजित अयोध्या' चित्रपटाची घोषणा

    दिनांक :25-Nov-2019
|
मुंबई,
बॉलीवुड अभिनेत्री कंगना राणावतने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. कंगनाचा हा चित्रपट अयोध्येतील राम मंदिरावर आधारीत आहे. 'अपराजित अयोध्या' असे या चित्रपटाचे नाव असून कंगना स्वतः या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. राम मंदिर हा विषय देशातील संवेदनशील समजला जातो. नुकताच राम मंदिराच्या बाजुने सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे.
 
 
 
या चित्रपटाची स्क्रिप्ट केवी विजेंद्र प्रसाद लिहित आहे. याअगोदर प्रसाद यांनी ब्लॉकबस्टर चित्रपट बाहुबलीची स्क्रिप्ट लिहिली आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राम मंदिराचा मुद्दा हा दशकांतील सर्वात मोठा मुद्दा आहे, त्यामुळे  यावर चित्रपट निर्मितीचा निर्णय घेतल्याचे कंगणाने सांगितले.
 
 
माझा जन्म 80 च्या दशकात झाला आहे, ज्या काळात मी नेहमी अयोध्येच्या नावाने जमिनीचे तुकडे झाल्याचे मला ऐकायला मिळायचे. परिणामी, रामाबद्दल नकारात्मक गोष्टी माझ्या कानावर पडल्या आहेत. श्रीराम हे बलिदानाचे प्रतिक आहे, ते एका जमिनीच्या तुकड्यावरुन वादग्रस्त ठरले. या वादाने संपूर्ण देशाचे राजकारणासोबत समाजकारणही बदलले. मात्र, एका निर्णयाने हा वाद आता संपला आहे. 'अपराजित अयोध्या' हा चित्रपट नास्तिकाचा आस्तिक होण्यापर्यंतचा प्रवास आहे. एकप्रकारे हा माझा वैयक्तीक प्रवासच असल्याचे कंगना म्हणाली. त्यामुळेच हा विषय माझ्या पहिल्या निर्मितीसाठी योग्य असल्याचे तिने सांगितले. कंगना या चित्रपटाद्वारे निर्मितीक्षेत्रात पदार्पण करणार आहे.