युतीचा रेशीमबंध सुटला!

    दिनांक :25-Nov-2019
|
दिल्ली दिनांक 
 
रवींद्र दाणी  
 
 
अमेरिका हे जगातील एक बलाढ्य राष्ट्र तर इस्रायल हे एक चिमुकले राष्ट्र! इस्रायल हा काही अमेरिकेचा ‘ट्रेड पार्टनर‘ नाही वा स्ट्रेटेजिक पार्टनर नाही. मात्र, तरीही अमेरिकेसाठी हा देश विशेष आहे. या दोन्ही देशांना बांधणारा दुवा आहे- ज्यु धर्म! अमेरिका-इस्रायल संबंधात चढ-उताराचे क्षण अनेकदा आले. अमेरिकेत रिपब्लिकन राष्ट्रपती असताना, अमेरिका-इस्रायल संबंधात उत्साह येतो. मात्र, डेमोक्रॅट सत्तेवर आल्यावर त्यात काहीसा थंडपणा येतो. मात्र, त्या संबंंधात कधी खंड पडत नाही. याचे कारण आहे- दोन्ही देशांना जोडणारा ज्यु समाजाचा रेशीमबंध! ज्यु धर्माचा हा धागा एवढा घट्ट आहे की अमेरिका-इस्रायल युती कधी तुटली नाही आणि तुटण्याची शक्यताही नाही.
 
 
 
 
  
भाजपा-शिवसेना संबंधही अशाच प्रकारचे राहिले होते. साधारणत: तीन दशकांपूर्वीची घटना. भाजपाने शिवसेनेशी युती करण्याचा निर्णय घेतला होता. गांधीवादी समाजवादात गुरफटलेल्या भाजपाने हिंदुत्वाची कास धरण्याचा निर्णय घेतला होता. हिमाचल प्रदेशातील पालनपूर बैठकीत पक्षाने, राम मंदिराचा मुद्दा हाती घेतला. त्यानंतर भाजपाने शिवसेनेशी युती करण्याचा निर्णय घेतला. भाजपाचे काही प्रमुख नेते या निर्णयाच्या विरोधात होते. संसदेच्या सेंट्रल हॉलला लागून असलेल्या वाचन कक्षात महाराष्ट्रातील काही पत्रकार उपस्थित होते. तेवढ्यात तेथे भाजपनेते लालकृष्ण अडवाणी आले. स्वाभाविकच पत्रकारांनी त्यांना या युतीबाबत विचारले. पेन्सीलीला टोक करावे तसे करून अडवाणी म्हणाले, इट वुईल शार्पन अवर हिंदुत्वा! यामुळे आमच्या हिंदुत्वाला धार येईल. त्यावेळी ना केंद्रात सत्ता दिसत होती, ना राज्यात सत्ता दिसत होती. पण, देशातील हिंदुत्ववादी शक्तींना एकत्र आणण्याचा निर्णय भाजपाने व अडवाणी यांनी फार दूरदृष्टीने घेतला होता. भाजपा-सेना युती काही सत्तावाटपाची युती नव्हती. कारण, या युतीचे अधिष्ठान सत्तेचे नव्हते, ते होते हिंदुत्वाचे.
प्रत्येक राजकीय पक्षाची एक संस्कृती असते. शिवसेनेचीही आपली कार्यपद्धती आहे, कार्यशैली आहे आणि ही कार्यशैली सांभाळीत भाजपा-सेना युती कायम राहिली. 1996 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ. शंकरदयाल शर्मा यांनी अचानक भाजपा नेते अटलबिहारी वाजपेयी यांना पंतप्रधान नियुक्त केले. त्यांना काही दिवसात लोकसभेत आपले बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला. त्यावेळी फक्त दोन पक्षांनी भाजपाला पािंठब्याचे पत्र दिले होते. शिवसेना व अकाली दल. कारण, या दोन्ही पक्षांशी भाजपाची युती, सत्तेसाठी नव्हती तर हिंदुत्वाच्या, राष्ट्रवादाच्या मुद्याशी होती. भाजपाने या दोन्ही पक्षांशी युती चांगल्याप्रकारे निभावली.
 
पंजाबातील कसोटी
2014 ची लोकसभा निवडणूक भाजपा, अकाली दल युतीची कसोटी पाहणारी होती. पंजाबात अकाली दलाचे सरकार होते. प्रकाशिंसग बादल मुख्यमंत्री होते. त्यांच्या सुनेचा भाऊ विक्रमजितिंसग मजीठिया याने राज्यात धुमाकूळ घातला होता. तेथे मजीठिया टॅक्स नावाचे प्रस्थ वाढले होते. राज्यात बादल कुटुंबाच्या विरोधात संताप होता. पण, भाजपाला याची फार कल्पना आली नाही. भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली निवडणूक लढविण्यासाठी दिल्लीसारखे सुपीक मैदान सोडून अमृतसरला गेले. तेथे ते लाखावर मतांनी पराभूत झाले. हा मजीठिया टॅक्सचा परिणाम होता. अकाली दलाचे पानिपत झाले. त्याचा फटका भाजपाला बसला, स्वत: अरुण जेटली यांना बसला. मात्र, भाजपाने एक फार चांगला निर्णय घेतला होता. तो होता, अकाली दलाशी युती कायम ठेवण्याचा. भाजपाच्या काही नेत्यांनी युती संपविण्याची कल्पना मांडली होती. पंजाबात पाय रोवण्याची हीच वेळ आहे, असे प्रतिपादन हे नेते करीत होते. मात्र, भाजपाने देशहित लक्षात घेत युती कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. कारण, अकाली दलाला एकटे सोडणे म्हणजे त्या पक्षाला पुन्हा भिंडरावालेच्या मार्गावर ढकलण्यासारखे होते. भाजपाने देशहित लक्षात ठेवून, युतीमुळे होणारे नुकसान पत्करले, पण युती संपविली नाही. युती टिकविण्यासाठी भाजपाने केलेला हा एक सर्वोच्च त्याग होता.
 
युतीचा नियम
युतीच्या राजकारणाचा एक वेगळा नियम आहे. युतीत मोठा पक्ष लहान असतो आणि लहान पक्ष मोठा असतो. पक्ष जेवढा लहान होत जातो, तेवढाच तो मोठा होत जातो. एक खासदार असलेल्या पक्षाने, वाजपेयी-अडवाणी यांच्या संयमाची परीक्षा घेतली होती. जयललिता यांच्या अण्णाद्रमुकने भाजपाला पािंठबा दिला होता. आपल्याला कार्मिक मंत्रालय मिळावे, अशी त्यांची अट होती. वाजपेयी-अडवाणी यांना या मागणीतील अर्थकारण लक्षात आले नाही. दोघांनीही होकार दिला आणि शपथविधी होताच, अण्णाद्रमुकचे मंत्री जगन्नाथन यांनी या मंत्रालयाअंतर्गत येणार्‍या बदल्या, नियुक्त्या यासाठी पैसे घेणे सुरू केले. प्रकरण अटलबिहारी वाजपेेयींपर्यंत गेले. वाजपेयी यांनी प्रमोद महाजन यांना यात लक्ष देण्यास सांगितले. महाजन यांनी जगन्नाथन यांना विचारले. डोळ्यात अश्रू आणत त्यांनी उत्तर दिले, मला दररोजचा हिशेब अम्माला द्यावा लागतो. मी कुठून पैसे आणावयाचे, हे तुम्हीच सांगा! मग, महाजन यांनी त्यांना, तुमचा दररोजचा कोटा किती, हे विचारले. जगन्नाथन यांनी आपला कोटा सांगितला. महाजन म्हणाले, तुम्ही बदल्या, नियुक्त्या यात पैसे घेऊ नका. तुमचा कोटा तुम्हाला कसा मिळेल याची व्यवस्था आम्ही करू. युतीचे राजकारण असे असते. युती चालविण्यात भाजपा पारंगत झाला असल्याचे प्रमाणपत्र भाजपाला मिळत होते. या सार्‍या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात घडलेला घटनाक्रम अनाकलनीय असा आहे.
 
नवी युती
महाराष्ट्रातील सत्ता मिळविण्यासाठी, भाजपा अजित पवार यांच्याशी सहकार्य करील, अशा अंदाज काही दिवसांपासून वर्तविला जात होता. अखेर शनिवारी भाजपा व अजित पवार यांच्या सरकारचा शपथविधी झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपा व अजित पवार यांची ही नवी युती करण्याशिवाय भाजपासोर पर्याय शिल्लक नव्हता. शिवसेनेने आपली भूमिका लवचिक ठेवली असती तर कदाचित ही स्थिती उद्भवली नसती.
 
काश्मीरचा धक्का
काश्मीरचे जनजीवन सामान्य होत आहे, असे वाटत असतानाचा पुन्हा एकदा काश्मीरचे जनजीवन ठप्प झाले. काश्मीर खोर्‍यातील शाळा-महाविद्यालये सुरू झाली होती. दुकाने उघडू लागली होती. रस्त्यांवरील वाहतूक सुरू झाली होती. काश्मीर खोर्‍यात दिसणारे हे चित्र सुखावणारे होते. स्वाभाविकच गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत काश्मीरमधील स्थिती पूर्ववत झाल्याचे निवेदन केले. याची प्रतिक्रिया लगेच काश्मीर खोर्‍यात दुसर्‍याच दिवशी उमटली व खोर्‍याने पुन्हा कडकडीत बंद पाळला. काश्मिरी जनतेचे हे वैशिष्ट्य आहे. स्थिती सामान्य झाली आहे, असे वाटत असतानाच, ते स्थिती सामान्य नसल्याचे दाखवून देतात. हे पुन्हा एकदा झाले.