शाहरुखच्या 'बॉब बिस्वास'मध्ये अभिषेक बच्चन

    दिनांक :25-Nov-2019
|
मुंबई,
मोठा ब्रेक घेतल्यानंतर अभिनेता अभिषेक बच्चन एका भन्नाट चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी अभिषेक आणि शाहरुख खान एकत्र आले आहेत. दोघांची जोडी प्रत्यक्ष मोठ्या पडद्यावर झळकणार नसली तरी नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. 'बॉब बिस्वास' या चित्रपटात अभिषेक मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

 
'नोमोशकर, एक मिनट'... हे ऐकल्यानंतर आजही एक चेहरा समोर येतो. तो म्हणजे २०१२मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कहानी' चित्रपटातील 'बॉब बिस्वास' याचा. सुजॉय घोषचा 'कहानी' हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. ही गुढकथा प्रेक्षकांना एका जागी खिळवून ठेवण्यात यशस्वी झाली होती. या चित्रपटातील सर्व पात्रं आजही प्रेक्षकांच्या समोर आहेत. त्यापैकी एक म्हणजे 'बॉब बिस्वास'. या काल्पनीक पात्राला प्रेक्षकांनी इतकं डोक्यावर घेतलं की या पात्राची सोशल मीडियावर देखील बरीच चर्चा झाली. याच काल्पनीक पात्रावर दिग्दर्शक सुजॉय घोष चित्रपटाची निर्मित करत असून अभिषेक 'बॉब बिस्वास'च्या भूमिकेत दिसणार आहे.
 
 
कहानी मधील 'बॉब बिस्वास' ही भूमिका अभिनेता सास्वत चॅटर्जीनं साकारली होती. एलआयसी एजंटच्या रुपातला एक भयानक सायको किलर त्यानं उत्तम प्रकारे साकारला होता. त्याच्या अभिनयाचं प्रेक्षक आणि समिक्षकांकडून देखील कौतुक करण्यात आलं होतं. ट्विट करत शाहरुखनं या चित्रपटाची घोषणा केली आहे. अभिषेकनं देखील या चित्रपटासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे.
सुजय घोषची 'बाउंड स्क्रिप्ट प्रोडक्शन' आणि शाहरुखची रेड चिलीज एन्टरटेनमेंट या दोन कंपन्या एकत्र येऊन या चित्रपाटाची निर्मिती करणार आहेत. तर दिग्दर्शकाच्या खुर्चीत अन्नपूर्णा घोष असणार आहे. या चित्रपटाचं शुटिंग पुढच्या वर्षी म्हणजेच २०२० मध्ये सुरू होणार असून प्रदर्शनाची तारीख अद्यापही सांगण्यात आली नाहीए.