उ:शापाच्या प्रतीक्षेत शापित स्पेन!

    दिनांक :26-Nov-2019
|
आंतरराष्ट्रीय 
 
वसंत गणेश काणे 
 
10 नोव्हेंबर 2019 ला स्पेनमधील 14 वी निवडणूक पार पडली. तसे स्पेन हा देश आज वृत्तक्षेत्रात फारसा गाजताना दिसत नाही. पण त्याचे न गाजणे हेच तर एक महत्त्वाचे वृत्त नाहीना, असे म्हणण्याची वेळ आली आहे. तसे पाहिले तर एकेकाळी स्पॅनिश आर्माडाचा दरारा ब्रिटिश आरमाडापेक्षा जास्त होता. जगात ठिकठिकाणी त्यांच्या वसाहती होत्या. स्पॅनिश भाषा बोलणार्‍यांची संख्या जगात फार मोठी आहे. दोन मराठी भाषक मुलं जशी आपापसात हिंदीत बोलतात, त्याप्रमाणे अमेरिकेत अनेक ठिकाणी मुले स्पॅनिश भाषा वापरतात, अशी तिची विशेषता आहे. अमेरिकेतील मूळच्या रहिवाशांचा वंशविच्छेद करणार्‍यात स्पॅनिश लोक आघाडीवर होते, असे म्हटले जाते. तर आमची गाठ ज्या मूळ निवासींशी पडली होती, तेच स्वभावत: क्रूर व उग्र वृत्तीचे होते, अशी दुसरी बाजू मांडण्यात आली आहे. दुसर्‍या महायुद्धात स्पेन तटस्थ होता. इंग्लंड व फ्रान्स जर्मनीशी लढले व िंजकले पण तिघेही सारखेच घायाळ झाले होते. युद्धात स्पेन तटस्थ राहून नामानिराळा होता पण तरीही फारशी प्रगती करू शकला नाही. उलट घायाळ व पराभूत झालेला जर्मनी तरारून प्रगती करीत पुढे आलेला दिसतो आहे. स्पेनच्या या स्थितीला कारण स्पॅनिश वृत्ती आहे, असेही एक मत आहे. हे खरे असावे, असे वाटण्याचे एक कारण स्पेनमधील निवडणुकांमध्ये तर सापडत नाहीना, असा प्रश्न निर्माण होतो. ही स्पेनमधली गेल्या चार वर्षातली चौथी निवडणूक आहे. कोणत्याही पक्षाला लागोपाठ चौथ्यांदा स्पष्ट बहुमत मिळू शकलेले नाही. पक्षांची बजबजपुरी, विघटनवादी गट आणि अल्पमतवाल्यांना सापत्नभावाची वागणूक यामुळे स्पेनमधील समाजजीवन सतत अशांत असते, असे म्हटले जाते.
 

 
 
कॅटालोनियाचा सवता सुभा
कॅटालोनियामध्ये सतत उग्र प्रदर्शने, हिंसाचार व संप होतच असतात. कॅटालोनिया हा आर्थिकदृष्ट्या संपन्न प्रांत आहे. बार्सिलोना, गिरोना, लेडा आणि तारागोना या चार विभागांचा मिळून तयार होणार्‍या या कॅटालोनिया प्रांतात 16 टक्के लोकसंख्या असून सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 20 टक्के उत्पन्न कॅटालोनियातून मिळते. स्पेन व पोर्तुगाल मिळून आपल्या भारतासारखे एक द्विपकल्प (तीन बाजूंनी समुद्र व एका बाजूला जमीन) तयार झाले आहे. जमिनीकडून स्पेन हा देश कॅटालोनिया या सरहद्दीच्या प्रांताने युरोपला जोडलेला आहे. हे भौगोलिक वैशिष्ट्य महत्त्वाचे आहे. कारण की, त्यामुळे हा संपन्न भूभाग स्पेनपासून सहज वेगळा होऊ शकेल, असा आहे. हा भूभाग स्पेनच्या मध्यभागी असता तर हे शक्य झाले नसते. कुणी सांगावे, वेगळेपणाची भावनाही कॅटालोनियामध्ये निर्माण झाली नसती.
 
स्पेनमधील लोकशाही व्यवस्थेचे स्वरूप
स्पेनच्या संसदेत (मुद्दाम परिचित नावे घेतली आहेत) दोन सभागृहे आहेत.
(1) कॉंग्रेस ऑफ डेप्युटीजमध्ये 350 तर (2) सिनेटमध्ये 265 सदस्य संख्या आहे.
स्पेनमध्ये सामान्यत: दर चार वर्षांनी चार पातळींवर निवडणुका होतात. (1) देश, (2) प्रांत व (3) स्थानिक स्तरावर प्रतिनिधी निवडले जातात. तसेच (4) युरोपियन पार्लमेंटवर सुद्धा प्रतिनिधी निवडले जातात. प्रतिनिधी निवडण्याच्या पद्धतीला पार्टी लिस्ट प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन, असे नाव आहे. या पद्धतीनुसार पक्ष उमेदवारांची यादी जाहीर करतात. पक्षांना मिळालेल्या मतांच्या टक्केवारीच्या प्रमाणात जागा मिळतात व यादीतील क्रमानुसार तेवढे उमेदवार निवडून आल्याचे जाहीर केले जाते. फक्त सिनेटचे प्रतिनिधी मात्र भारताप्रमाणे ज्याला जास्त मते तो विजयी (50 टक्के िंकवा कितीही कमी मते असली तरी) या पद्धतीने निवडले जातात. स्पेनमध्ये राष्ट्रीय व प्रादेशिक पातळीवर बहुपक्षीय लोकशाही आहे.
 
1. पीपल्स पार्टी (पीपी) : हा उजवीकडे झुकलेला, सनातनी, कॅथोलिक धर्ममत मानणारा व आर्थिक उदारतावादी व युरोपियन एकतावादी पक्ष आहे. याला 21.00 टक्के मते व 89 जागा म्हणजे पूर्वीपेक्षा 23 जागा जास्त मिळाल्या आहेत.
 
2. स्पॅनिश सोशॅलिस्ट वर्कर्स पार्टी (पीएसओई) : हा डावीकडे झुकलेला, लोकशाहीवादी, कामगार चळवळीशी जवळीक साधून असलेला, संघराज्यवादी, युरोपियन एकतावादी पक्ष आहे. याला 28.00 टक्के मते व 120 जागा म्हणजे पूर्वीपेक्षा तीन जागा कमी मिळाल्या आहेत.
 
3. युनायटेड वी कॅन : हा डावीकडे झुकलेला, लोकशाही समाजवादी, संघराज्यवादी, सैनिकीकरण विरोधी, कामगार चळवळीशी जवळीक साधून असलेला, स्त्रीपुरुष समानता आणि आंतरराष्ट्रीयवादाचा पुरस्कर्ता व पर्यावरणवादी पक्ष आहे. याला 13 टक्के मते व 35 जागा म्हणजे पूर्वीपेक्षा सात जागा कमी मिळाल्या आहेत.
 
4. सिटिझन्स पार्टी : उजवीकडे झुकलेला, आर्थिक उदारमतवादी, विकेंद्रीकरणवादी पण स्वायत्तताविरोधी व युरोपियन एकतावादी पक्ष आहे. याला 7 टक्के मते व 10 जागा म्हणजे पूर्वीपेक्षा 47 जागा कमी मिळाल्या आहेत व या पक्षाचे पानिपत झाले आहे.
 
5. व्हॅाक्स पार्टी : अतिउजवा, उग्र स्पॅनिश राष्ट्रवादाचा पुरस्कर्ता, सनातनी, आर्थिक उदारतावादी, इस्लामी स्थलांतरितांना आसरा देण्यास विरोध असलेला व त्यांना इस्लामिक देशांनीच आसरा द्यावा, असे मानणारा, पण ख्रिश्चनांना मात्र आश्रय देण्याच्या बाजूचा असलेला पक्ष आहे. याला 15 टक्के मते व 52 जागा म्हणजे पूर्वीपेक्षा 28 जागा जास्त मिळाल्या आहेत व या पक्षाचे भाग्य फळफळले आहे.
 
6. रिपब्लिकन लेफ्ट ऑफ कॅटालोनिया : कॅटालोनिया येस (ईआरसी-कॅटसी) पार्टी -आत्यंतिक डावा पण राष्ट्रवादी, कॅटलन स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता, लोकशाही व संघराज्यवादी असा पक्ष आहे. याला 4 टक्के मते व 13 जागा म्हणजे पूर्वीपेक्षा 2 जागा कमी मिळाल्या आहेत.
 
7. टुगेदर फॉर कॅटालोनिया पार्टी : हा उजवा, कॅटलन स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता, उदारमतवादी पक्ष आहे. याला 2 टक्के मते व 8 जागा म्हणजे पूर्वीपेक्षा एक जागा जास्त मिळाली आहे.
 
8. एकता, प्रगती आणि लोकशाहीवादी पार्टी : हा प्रागतिक, सामाजिक उदारमतवादी, उजव्या व डाव्यात समतोल साधणारा व स्पेनच्या अखंडतेचा खंदा पुरस्करता असलेला आणि प्रादेशिक राष्ट्रवादाचा विरोधक असलेला पक्ष आहे. याला 1.2 टक्के मते व फक्त 1 जागा तीही यावेळी मिळाली आहे.
 
9. प्राणीक्रूरता विरोधी पार्टी (पीएसीएमए) : हा प्राण्यांच्या हक्कांचा पुरस्कार करणारा, प्राणिमित्र, पर्यावरणवादी व सामाजिक न्यायाचा पुरस्कार करणारा पक्ष आहे. याचा बुल फाईट्सना विरोध आहे. याला 1 टक्का मते व 0 जागा म्हणजे पूर्वीइतक्याच 0 जागा मिळाल्या आहेत. प्राण्यांचा कैवारी असलेल्या पक्षाची ही स्थिती पाहून मन विषण्ण होते.
 
तसेच पक्षांची उद्दिष्टे, त्यांना मिळालेली मतांची टक्केवारी आणि मिळालेल्या जागांचा तपशील बोलका व स्पेनच्या अंतरंगावर प्रकाश टाकणारा आहे.
 
या सर्वांची बेरीज होते 328 उरलेल्या 22 जागा इतर लहानमोठ्या पक्षात विखुरलेल्या स्वरुपात वाटल्या गेल्या असून बजबजपुरीत भर टाकणार्‍या आहेत.
 
पक्षांपेक्षा आवळ्यांची मोट बांधणे सोपे!
विद्यमान पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांच्या सोशालिस्ट पक्षाने सर्वाधिक 120 (पण पूर्वीपेक्षा 3 कमी) जागा िंजकल्या असल्या, तरी 350 जागांच्या कॉंग्रेस ऑफ डेप्युटीजमध्ये (विधिमंडळामध्ये) बहुमत सिद्ध करण्यासाठी या जागा खूपच अपुर्‍या आहेत. एप्रिल महिन्यात झालेल्या मागील निवडणुकांमध्येही बहुमत सिद्ध करण्यात अपयश आल्यामुळे सांचेझ यांनी देशात पुन्हा निवडणुका घेण्याचे जाहीर केले होते. त्यांनी पुन्हा प्रगतिशील सरकार स्थापन करण्याचे आश्वासन देशाला दिले आहे. तथापि, त्यांचा सहकारी पक्ष असलेल्या युनायटेड वी कॅन या टोकाच्या डाव्या पक्षाला 35 (पूर्वीपेक्षा 7 कमी) जागा मिळाल्या असल्याने या दोन्ही पक्षांनाही सरकार स्थापनेसाठी अन्य पक्षांची मदत लागणार आहे. त्याचप्रमाणे, पीपल्स पार्टीला 89 (पूर्वीपेक्षा 23 जास्त) जागा मिळून तो दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष ठरला असून वोक्स पार्टी या उजव्या पक्षाला 52 (पूर्वीपेक्षा 28 जास्त) मिळाल्या आहेत. सिटिझन्स पार्टीला 10 (पूर्वीपेक्षा 47 कमी) जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे यातले समविचारी व उरलेले अन्य पक्ष यांची मोट बांधण्याची जबाबदारी मावळते पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांच्यावर येऊन पडली आहे.
 
9422804430