गोष्टी तशा छोट्याच; पण...

    दिनांक :26-Nov-2019
|
कधीकधी असं होतं ना, की डोस्क खराबं होतं. काही केल्या पेच सुटत नाही. बरं, त्यात आपलं काहीच नसतं. या अवस्थेला आजच्या लोकभाषेत, ‘लेना ना देना, फिरभी...’ असे म्हणतात. तशी लोकभाषेत त्यासाठी एक म्हण आहे, ‘घेनं ना देनं, फुक्कट कंदी लावनं...’ तर हे असं होतं कधीकधी सार्वजनिक जीवनात. राज्यातल्या राजकीय घडामोडींमुळे एक प्राध्यापक हृदयविकाराचा झटका आल्याने गंभीर झाल्याची परवा बातमी होती. जे व्हायचे ते होणारच असते. आपण त्यात काहीच करू शकत नाही अन्‌ जे होतेय्‌ ते आपण केल्याने होतही नसते, तरीही फुक्कट कंदी लावतो आपण. तर अशा वेळी काय करावे? तर छान छान गोष्टी ऐकाव्यात. गोविंदाचे सिनेमे पाहावेत. म्हणजे पंचतारांकित हॉटेलच्या परिसरात नायक त्याचा ढाबा टाकतो अन्‌ मग हॉटेलमालकाच्या पोरीशीच जुळवतो, असली कथानके अन्‌ तरीही फुल्ल एण्टरटेन्मेंट... नाहीच काही, तर डोक्याला ताणच बसणार नाही अन्‌ काही विचारच करायचा नाही, अशी मेंदूला सवय लावायची असेल तर दक्षिणी सिनेमे बघावेत. तारतम्य नावाचा काही प्रकारच ठेवायचा नाही. नायक मेलाय्‌ अन्‌ त्याची चिताही जळाली आहे, असे असताना स्मशानभूमीतच खलनायक नायिकेला ओढतो स्वत:कडे अन्‌ गडगडाटी हास्य करत म्हणतो, ‘‘अब तुम्हे कौन बचाने आएगा? बुला उसको...’’ अन्‌ ती मग नायकाच्या नावाने साद घालते. तो चक्क मेलेला आहे, चिता जळते आहे त्याची अन्‌ ही हाका मारते. हाक ढगापर्यंत जाते अन्‌ चितेतला नायक बोटे हलवितो. थोड्याच वेळात तो उठतो, जळती लाकडे घेऊन खलनायकाला तुंबळ तुंबतो. आपल्याच चितेवर त्याला जाळतो अन्‌ दी एण्ड!
 

 
 
तर असली कथानके असलेले चित्रपट बघावेत. डिंबग केलेले असतात ते. डोकं काही आऊट होेत नाही. मजा येते. शांत झोप लागते... नाहीच तर लहाणपणी वाचायचो ती पुस्तके वाचावीत. (म्हणजे आताची प्रौढ पिढी त्यांच्या बालपणात वाचन करायची, या गैरसमजातून हे सांगतो आहोत आम्ही.) त्यात मग गुलबकावली, बिरबलाच्या चतुर कथा, िंसहासनबत्तिशी, अलिबाबा आणि चाळीस चोर... अशी कितीतरी पुस्तके आहेत. त्यात पंचतंत्राच्या कथांचे पुस्तक तर छानच. म्हणजे त्यातल्या कथाही छोट्या छोट्याच अन्‌ मजा देणार्‍या. म्हणजे छोट रीचार्ज, फुल टॉक टाईम! तर पंचतंत्रातल्या अशाच काही गोष्टी सांगूनच टाकाव्यात असे वाटले. आता या स्तंभात अशा काही गोष्टी सांगाव्यात काय, त्याचे काही संकेत आहेत का? असले प्रश्नही विचारायचे नाहीत. मुळात मनातच आणायचे नाहीत... तर कथा एक-
 
 
बगळा-बगळीची कथा. एका जंगलात खूपसारे पशू-पक्षी राहायचे. त्यात बगळेही होते. त्यात एक छानपैकी बगळी होती. तिच्या स्वप्नातला एक राजकुमार वाटावा इतका छान बगळाही होता. बगळ्यालाही ती आवडायची. त्यांचा तसा घरोबा होता. लहानपणी ते खेळले-बागडले होते एकत्र. मोठेपणी ही मैत्री छान रंग घेईल, असे सार्‍यांनाच वाटायचे. आता त्याचे आई-वडील राहिले नव्हते. बगळा आपल्या घरट्यात अन्‌ बगळी तिच्या. बगळीला वाटे, जाऊन म्हणावे की, येऊ या एकत्र. मग ती बगळ्याला म्हणायची, आज भेटू या िंपपळाच्या झाडावर सांजेला. ते भेटायचे. बगळीला वाटायचे की, पुरुष म्हणून बगळ्याने आधी गोष्ट काढावी. पुढाकार घ्यावा. बगळ्याला वाटायचे की, स्त्रीचा अधिकार आधी. हिने आधी विचारले तर मार्गच मोकळा. हो! आपण विचारायचे आणि हिने नाही म्हणायचे... सोबत नांदलो असलो, आपल्याच वाडवडिलांनी बगळीचा परिवार फुलविला असला, तरीही उघडपणे तसे काहीही नव्हते. बरे, बगळीची काही तत्त्वं, स्वभाव त्याला आवडत नव्हता. असेच बगळीचेही होते... असेच दिवस जात राहिले. हे भेटायचे मुद्दाम अन्‌ बोलायचे काहीच नाही. मग दोघांचे इगो आड आले. आमचे घराणे वेगळ्या विचारांचे, तुमचे वेगळे. त्यात बगळीचा घरोबा आधी दुसर्‍यांशीच होता. त्यामुळे शुभ्र बगळा काही मानेना. नुसत्याच भेटी अन्‌ ठरत काहीच नव्हते. आतातर दोघेही हट्‌टालाच पेटले की, पुढाकार यानेच घ्यावा. अभिमानाचा विषय झाला. एक दिवस पारधी आला अन्‌ दोघांनाही पकडून घेऊन गेला...!
 
 
दुसरी गोष्ट- तशी ही बर्‍यापैकी ऐकली असावी लोकांनी. वाचलीही असावी. कदाचित आधीच्या गोष्टीतला बगळा असावा. त्याची एका कोल्ह्याशी दोस्ती झाली. कोल्हा आपला धूर्त असतोच ना. तो एकटा होता. आता धूर्त प्राणी एकटेच असतात. त्यांच्यावर कुणी विश्वास टाकत नाहीत. टाकणार कसा? कायम त्यांनी कपट आणि चलाखीच केलेली असते. आताही त्याने बगळ्याला त्याच्या जमातीपासून तोडले अगदी पद्धतशीर अन्‌ त्याच्याशी दोस्ती केली. माझ्यासोबत राहिलास तर तुलाच पक्ष्यांंचा राजा करतो माझ्या बुद्धिचातुर्याने, असे कोल्हा म्हणाला. बगळ्याने त्याच्यावर विश्वास ठेवला. बगळा अन्‌ कोल्ह्याच्या बैठका व्हायला लागल्या. आजच्या भाषेत ते रोजच बसत. बिल सगळे बगळाच द्यायचा. एक दिवस कोल्ह्याने मग बगळ्याला त्याच्याकडे जेवायला बोलावले. बगळा मोठ्या आनंदाने गेला. कोल्ह्याने खास आंब्याचा रस केला होता. त्याचा मस्तपैकी सुवास दरवळत होता. कोल्ह्याने थाळीत रस वाढून आणला. कोल्हा चटाचटा चाटून रस खात होता अन्‌ बगळ्याला थाळीत असल्याने, त्याच्या लांब, निमुळत्या चोचीने तो खाता िंकवा पिता येत नव्हता. कोल्ह्याचा खाऊन झाल्यावर बगळ्याच्या समोरची थाळी भरलेलीच दिसली त्याला. तुला आवडत नाही का रस? असे म्हणत कोल्ह्याने बगळ्याचा रसही चाटून खाल्ला... मग बगळ्यानेही डोके चालविले अन्‌ कोल्ह्याला जेवायला बोलावले आपल्या घरी. त्यानेही रस केला अन्‌ तो सुरईत ठेवला. कोल्ह्याला सुरई दिली...
 
 
 
तिसरी गोष्ट- आता ही गोष्ट थोडी बदलली आहे असे वाटू शकते, पण तसे नाही. खरी कथा हीच आहे. नंतर ती प्रक्षिप्त झालेली आहे. आमच्या मर्मज्ञ वाचकांना अस्सल कथा ऐकवावी म्हणून हा प्रपंच... तर, एकदा एका िंसहाने वेगळाच निर्णय घेतला. एकतर तो थकलाही होता आणि नुसत्याच चर्चांच्या गुर्‍हाळाने कंटाळलाही होता. त्याने मग आपल्या जंगल राज्याचा विस्तार आणि विकास करण्यासाठी बाजूच्या वनांतल्या िंसहाशी मैत्री करायचे ठरविले. तो िंसहदेखील तयार झाला. मात्र, हे या वनातल्या प्राण्यांना पटत नव्हते. त्यामुळे सिंह नाराज झाला अन्‌ आपल्या गुहेत जाऊन बसला. काहीच दिवसांत बाजूच्या वनातला िंसह इकडे येणार होता आणि ही दोन वने एक होणार होती. आता प्रत्यक्ष दादामहाराज िंसहच नाराज आहे, हे पाहून वनातल्या माध्यमांनी बातमी केली की िंसह आजारी आहे. बरे, या िंसहाला भेटायला कुणीच जात नव्हते. सारे जंगल एका बाजूला अन्‌ हा िंसह एकटा, असे वातावरण तयार झाले. त्या िंसहाचे काही खास दोस्त आधीच बाजूच्या वनात स्थानांतरित झाले होते. त्यांनी मग इकडच्या प्राण्यांशी संपर्क साधला. त्यांचे जुने स्नेहसंबंध होतेच. दादामहाराज िंसहाला भेटून तर घ्या, नाराज असेल िंकवा आजारी असेल, असे म्हणत एका एका प्राण्याला गुहेत पाठविणे सुरू केले. दादामहाराजांना समजवायला जातो, असे सांगत एक एक प्राणी गुहेत जाऊ लागला अन्‌ मग तो काही माघारी परत येतच नव्हता. आला तरीही त्याला दादामहाराज िंसहाचे पटलेले असायचे. ही नवी युती आपल्या सर्व प्राणिमात्रांच्या किती फायद्याची आहे, हे तो आत गेलेला प्राणी बाहेर येऊन इतर प्राण्यांना सांगायचा समजावून... अखेर दादामहाराजांचे सारेच वनचर नव्या युतीला तयार झाले. वनाचा विस्तार झाला. विकासही झाला!
 
(टीप : या कहाण्यांचा वर्तमान स्थितीशी संबंध जोडण्याचा खोडसाळपणा कुणी करू नये... अन्‌ केलाच, तर ती चूक आहे असे अजीबात नाही! कारण, गोष्टी तशा छोट्याच आहेत, पण डोंगराएवढ्या आहेत.)