सुबोध पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर

    दिनांक :26-Nov-2019
|
नाटक, चित्रपट, मालिका अशा सर्व ठिकाणी वावर असलेला अभिनेता सुबोध भावे लवकरच एका नव्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी ‘तुला पाहते रे’ ही त्याची मालिका प्रचंड गाजली होती. अल्पावधीतच ही मालिका लोकप्रिय झाली होती. यानंतर सुबोध छोट्या पडद्यावर कधी येणार याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. प्रेक्षकांची ही प्रतीक्षा अखेर संपली असून सुबोध लवकरच सोनी मराठी वाहिनीवरील ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या कार्यक्रमात झळकणार आहे.
 
 
महाराष्ट्रावर प्रेम असणाऱ्या प्रत्येकाचा आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीविषयी जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकासाठीचा हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्राने आजवर जपलेल्या परंपरांचं, संस्कृतीचं आणि लोककलांचं सिंहावलोकन होणार आहे. पारंपरिक लोककलांनी नटलेला हा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राच्या विविध भागांमधील लोककला पुनरुज्जीवित करण्याचा एक प्रयत्न आहे. सुबोध भावे आतापर्यंत अनेक रूपात प्रेक्षकांसमोर आलेला आहे पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने तो संपूर्ण महाराष्ट्राला सूत्रसंचालकच्या भूमिकेत दिसणार आहे.
ज्या लोककलांनी महाराष्ट्र घडला, एक झाला अशा शाहीरी, लावणी, पोवाडा, तमाशा, भजन, कीर्तन, भारूड, गोंधळ, वासुदेवसारख्या विविध लोककलांचा आविष्कार या मंचावर पाहता येणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शकुताई नगरकर, शाहीर अमर शेखांची परंपरा चालवणारे निशांत शेखसारखे कलाकार या कार्यक्रमातून प्रेक्षकांना भेटणार आहेत. २ डिसेंबर पासून सोमवार आणि मंगळवार रात्री ९ वाजता सादर होणाऱ्या या कार्यक्रमाची सुरूवात महाराष्ट्र गीताने होणार असून पुढे आदर्श शिंदे, नंदेश उमप, कार्तिकी गायकवाड, प्रसनजीत कोसंबीसारखी मंडळी आपल्या लोककलांचा वारसा प्रेक्षकांसमोर सादर करणार आहेत.