देवदत्त नागे बनला 'देवगण' नागे

    दिनांक :27-Nov-2019
|
मुंबई,
'जय मल्हार' मालिकेमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर चढलेला अभिनेता देवदत्त नागे आता 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' या ऐतिहासिक चित्रपटात दिसणार आहे. तो या चित्रपटात सूर्याजी मालुसरे यांची भूमिका साकारत आहे. या निमित्ताने त्याला बॉलीवूड सुपरस्टार अजय देवगणसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. या चित्रपटात त्याच्यासह अनेक मराठी कलाकार वेगवेगळ्या भूमिका करताना दिसणार असून देवदत्तने शुटिंगदरम्यानचे अनेक किस्से शेअर केले आहेत.
 
शुटिंगदरम्यानचा असाच एक किस्सा देवदत्तने शेअर केला आहे. त्यात त्याने सांगितले आहे की त्याला चित्रपटाच्या सेटवर 'देवगण नागे' असे नाव पडले होते, कारण सपोर्ट स्टाफने त्याच्या नावासह स्वभावही अजयशी मिळता जुळता असल्याने असे नाव ठेवल्याचे त्याने गमतीने सांगितले. 

 
अजय देवगण या चित्रपटात तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारत असून देवदत्त हा सूर्याजी मालुसरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. अजय आणि देवदत्त या दोघांचे स्वभाव, आवडीनिवडी यात बरेच साम्य असल्याचे सेटवर पाहायला मिळत होते. त्यामुळं सेटवर देवदत्तला चक्क 'देवगण नागे' असे नाव पडले होते. 'आम्ही दोघेही दिसायला रावडी आहोत. त्यामुळे सेटवर आम्ही दोघे भाऊच असल्यासारखे वाटत होते', असे देवदत्तने सांगितले.