याचसाठी केला होता सारा अट्‌टहास...

    दिनांक :27-Nov-2019
|
महाराष्ट्रातील तमाम जनतेला आश्चर्याचा धक्का देत, भाजपा-राष्ट्रवादीच्या सहकार्यातून स्थापन झालेले सरकार, अजित पवारांनी माघार घेतल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत कोसळले. खरंतर शिवसेनेने सोबत येण्यास नकार दिल्यानंतर, पुरेसे संख्याबळ नसल्याने आपण सरकार स्थापन करू शकणार नाही, असा निरोप भाजपा नेत्यांनी राज्यपालांना अधिकृत रीत्या दिला होता. परंतु, नंतरच्या काळात अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचे पत्र सादर केल्याने, संख्याबळाचे गणित जुळले. बहुमताचा आकडाही त्यातून गाठता येणार असल्याने सरकार स्थापनेचा अडसर दूर झाला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. पण, ज्या संख्याबळाचा दावा केला, तो नंतरच्या काळात बहुमत सिद्ध करण्याच्या टप्प्यापर्यंत कायम राखण्यात मोठ्या पवारांच्या तुलनेत छोटे पवार कमी पडले, त्याचा फटका साहजिकच भाजपालाही सहन करावा लागला. मुख्यमंत्र्यांनी आता परवाच शपथ घेतली होती अन्‌ आज त्यांना राजीनामाही द्यावा लागला. अजित पवारांचा अंदाज चुकला, शरद पवारांचा राजकारणी गेम त्यांच्यावर हावी झाला, भाजपाला त्यांच्या साथीने जाण्यात जरा घाईच झाली...
 
अशा विविध मुद्यांची चर्चा आणि विश्लेषण होईलच कालौघात, पण निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरच्या सुमारे महिनाभराच्या काळात राज्याच्या राजकीय पटलावरचा जो खेळ इथली जनता बघत आहे, तो मात्र अनपेक्षित आहे आणि धक्कादायकही! ज्यांना बहुमत आहे ते सरकार स्थापन करू शकत नाहीत, 54 सदस्य असलेला राजकीय पक्ष 105 संख्याबळ लाभलेल्या भाजपाला मुख्यमंत्रिपदाची मागणी करतो, आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा जनादेश असल्याचे छातीठोकपणे सांगणारे नेते अचानक सरकार स्थापन करण्यास सरसावतात, नगरपालिकेची निवडणूक शोभावी अशा तर्‍हेने आमदार कुठल्याशा हॉटेलमध्ये ‘जमा’ करून ठेवण्याची लाजिरवाणी परिस्थितीही या काळात अनुभवास आली. सुमारे तीन लाख लोकांचे प्रतिनिधित्व करणारा आमदार, पक्षनेतृत्वाने भरवसा ठेवण्याच्याही लायकीचा राहिला नसल्याची स्थिती लज्जास्पदच! पण, तो तमाशाही बिनदिक्कतपणे चालला. 

 
 
सोनियांच्या नावाने शपथ घेण्याचा शिवसैनिकांवर ओढवलेला प्रसंग फार अभिमान बाळगावा असा नव्हता. तसा तर, खुद्द त्या पक्षाच्या सदस्यांनाही शोभणारा नव्हताच तो. पण, जे चाललं आहे, ते गुमान बघण्यापलीकडे हातात फारसे काही नसल्याने, माध्यमजगत आणि राजकारण्यांनी मांडलेला तमाशा हताशपणे बघत राहिली मराठमोळी जनता. महिनाभरापूर्वी निवडणुकीचे निकाल लागले. आणाभाका घेऊन निवडणुकीला सामोरे गेलेल्या भाजपा-सेनेच्या पदरात बहुमताचे दान टाकले मतदारांनी. भर पावसात सभा घेऊन मनं जिंकण्याचा, लोकभावनेला हात घालण्याचा एक प्रयत्न बर्‍यापैकी फळला. पण, कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या वाट्याला विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली. तोच जनादेश असल्याचे त्या पक्षाचे नेते जाहीरपणे मान्य करीत होते. असे करून ते वस्तुस्थिती स्वीकारीत होते की शिवसेनेची ‘बार्गेिंनग पॉवर’ वाढवीत होते, हे नंतरच्या घटनाक्रमातून स्पष्ट झाले आहेच.
 
 गेलेवेळी नेमकी याच्या विरुद्ध भूमिका पवारसाहेबांनी घेतली होती. कोणी नसेल, तर राष्ट्रवादी सोबत करेल, असे जाहीर करून भाजपासोबतच्या सौदेबाजीची शिवसेनेची ताकद कमी करण्यात ‘मोलाची’ भूमिका बजावणार्‍या साहेबांनी यंदा पहिल्या दिवसापासूनच आम्ही विरोधी पक्ष म्हणून भूमिका पार पाडणार असल्याचे जाहीर करत, यावेळची आपली तर्‍हा गेल्यावेळेपेक्षा वेगळी असेल, हे जाहीर केले. त्यांच्या या भूमिकेनंतर शिवसेनेला आपल्या संख्याबळाची ताकद लक्षात आली. उजवी काय किंवा डावी काय, कुठलीच आघाडी आपल्याला सोबत घेतल्याशिवाय सरकार स्थापन करू शकत नसल्याचे चित्र स्पष्ट झाल्यानंतरचे त्यांचे वागणे दिवसागणिक बदलत गेले. हिंदुत्व आदी मुद्दे बाजूला ठेवून त्या पक्षाने कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरठाव करण्याचा निर्णय घेतला. त्या दोन्ही पक्षांनी इतिहास विसरून शिवसेनेला पवित्र करून घेतले आणि असंगाशी संग करीत त्या तिघांचाही राजकीय प्रवास सुरू झाला. आता उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. हो! संजय राऊत बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत होतेच की मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार म्हणून! लोकांना उगाच वाटलं हा सारा आटापिटा एकनाथ शिंदेंसारख्या एखाद्या खंद्या शिवसैनिकाला त्या पदावर बसविण्यासाठीच चालला आहे म्हणून! पण, उद्धवांनी बाळासाहेबांना स्वत: मुख्यमंत्री बनेन असा शब्द दिला होता, हे आता सिद्ध होतेय्‌. कालपर्यंत सत्तेच्या पदापासून जाणीवपूर्वक दूर राहात ‘किंगमेकर’ची भूमिका बजावणार्‍या मातोश्रीतील सदस्याच्या गळ्यात पहिल्यांदाच सत्तेच्या पदाची माळ पडणार आहे.
 
 यातून मातोश्रीचा इतिहास बदलणार आहेच, पण महाराष्ट्राच्याही पदरात यातून चांगलेच काही पडेल, अशी आशा करू या! उद्धव ठाकरेंना त्यांच्या पुढील कारकीर्दीसाठी मनापासून, भरभरून शुभेच्छा देण्याचा योग त्या निमित्ताने जुळून आला आहे. कालपर्यंत सत्तेच्या पदांपासून दूर राहिलेल्या ठाकरे कुटुंबीयांपैकी कुणाला त्या पदापर्यंत नेऊन ठेवणे, ही शिवसेनेतली अंतर्गत अपरिहार्यता होती की तोही बड्या पवारांचा गेमच होता, हे स्पष्ट होईलच येत्या काळात. पण, राजकारणाची एक भलतीच अजब तर्‍हा मागील कालावधीत शिवसेनेने सिद्ध केलीय्‌, ती मात्र डोके चक्रावून टाकणारी आहे. सरकार स्थापनेसाठी अजित पवारांना सोबत घेण्याची, त्यांच्यावर विश्वास ठेवून शरद पवारांची ताकद ‘नजरअंदाज’ करण्याची भाजपाची राजकीय पद्धत जितकी अनाकलनीय, शिवसेनेची तिरकस राजकीय चालही तितकीच अजब! राजकारण सत्तेसाठीच करायचे असते, सत्ता मिळवण्यासाठी काही तडजोडी कराव्या लागतात, कधी कधी विचार-नीतिमत्तेला तिलांजली द्यावी लागते म्हणतात... पण हे अपवादात्मक परिस्थितीतच योग्य ठरते.
 
उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना काय स्वत: मुख्यमंत्रिपदावर बसेन, असा शब्द दिला होता? बाळासाहेबांना जाऊन आता जवळपास आठ वर्षे होतील. मग त्यांचे स्मरण नेमके आताच का व्हावे सेनेला? तेही संख्याबळ बाजूने नसताना? आता भाजपा, सेनेला मुख्यमंत्रिपद देत नाहीय्‌ म्हटल्यावर ते देण्याची खेळी कॉंग्रेस-राष्ट्रवादीने खेळणे स्वाभाविक होते. भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्याचा त्यांचा डाव त्यातून आयताच साधला जाणार होता. पण, शिवसेनेचे कुठे ते उद्दिष्ट होते? ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा ध्यास बाळगून सारा थयथयाट चालला असल्याचे गुपित सेनेने तरी कुठे जाहीर होऊ दिले होते! अर्थात राजकारणात जर, तरला फार अर्थ नसतो. इथे ज्याची लाठी त्याचीच म्हैस असते. सारा लवाजमा सत्तेभोवती फिरत असतो. जो पदावर आहे त्याला कुर्निसात करीत असतो. मागील कालावधीतील नाट्यमय घडामोडींची संहिता नेमकी कोणी लिहिली होती अन्‌ कुणाच्या दिग्दर्शनात त्याची तालीम पार पडली, हा प्रश्न अलहिदा! कुणाच्यातरी तालावर नाचण्याचे भविष्यात कोणते परिणाम शिवसेनेला भोगावे लागतील, हे तर येणारा काळच सांगेल.
 
 
अनुभवी शरद पवारांच्या राजकारणाचे पत्तेही कालौघात उघड होतील. अजित पवारांच्या खेळीमागील गुपितही स्पष्ट होईलच कधीतरी. पण, सध्याचे वास्तव हेच आहे की, राज्याचा सत्ताशकट हाकण्याची संधी शिवसेनेला मिळते आहे. कालपर्यंत ज्यांच्याशी कायम संघर्ष केला, त्या काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेऊन सरकार चालविण्याचे कसब सिद्ध करावे लागणार आहे. या राज्याला आज एका जबाबदार सरकारची गरज आहे. ते स्थापन होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. बहुमताच्या आकड्यांची चिंता नाही. मुख्यमंत्रिपद मातोश्रीच्या दाराशी चालून आले आहे. याचसाठी हा अट्‌टहास केला असल्याने... ‘हा’ क्षण गोड व्हावा, ही अपेक्षा.