वजन कमी करणारी पेये

    दिनांक :29-Nov-2019
|
नवी दिल्ली,
माणसाचे वजन वाढणे सोपे, परंतु ते कमी करणे फार अवघड असते. म्हणूनच वजन वाढवण्यासाठी काय करावे, हे कोणाला सांगावे लागत नाही. न सांगताच काही वाईट सवयींमुळे नकळतपणे वजन भराभर वाढत जाते. ते कमी करताना मात्र मोठे प्रयास करावे लागतात. त्यासाठी अनेक सूचना केल्या जातात. अनेक पथ्ये पाळण्याचे सल्ले दिले जातात. रात्रीचे जेवण कमी करावे. विशेषतः झोपण्यापूर्वी निदान दोन-तीन तास आधी जेवण करावे, असे सांगितलेले असते. रात्रीच्या जेवणात आणि झोपण्याच्या वेळेत किमान एक तासाचे अंतर असावे. ही तर सूचना सर्वात महत्त्वाची आहे. ती सांगायला सोपी परंतु आचरणात आणायला अवघड आहे. कारण झोपण्याच्या फार आधी जेवण केले, की- मध्यरात्री भूक लागते. 
 
 
 
 
ही भूक लागली की झोप शांत होत नाही आणि मध्येच उठून काहीतरी खाल्ल्याशिवाय झोपही येत नाही. त्यावर उपाय म्हणून काही लोक झोपताना एखादे पेय घेतात. काही समस्यांवर उपाय म्हणून हे पेय घेतले गेले, तरी त्याचे काही दुष्परिणाम टाळता येत नाहीत. विशेषतः एखादे पेय घ्यायला जाऊन ते अतीशय गोड असेल तर त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच आहारतज्ज्ञांनी रात्रीच्या जेवणाच्या ऐवजी म्हणून कोणते पेय घ्यावे याचा सल्ला दिलेला आहे.
 
 
ती पेये खालीलप्रमाणे : पहिले पेय म्हणजे दूध. रात्री किंवा मध्यरात्रीच भूक लागू नये म्हणून दूध घेणे सर्वात उत्तम. ट्रिप्टोफॅन आणि कॅल्शियम यांचे प्रमाण चांगले असल्यामुळे दूध गुणकारी ठरते. दूध घेऊन झोपल्याने वजन कमी व्हायलाही मदत होते.
 
 
आयुर्वेदामध्ये दुधाचे खूप महत्त्व सांगितले आहे. आयुर्वेद असे सांगतो, की- सकाळी उठल्यानंतर पाणी प्या. दुपारी ताक प्या आणि रात्री झोपताना दूध प्या. रात्रीच्या दुधाच्या सेवनाने मलावरोध कमी होतो. अर्थात सर्वांना दूध आवडेलच असे नाही आणि ते मानवेल असेही नाही. काही लोकांना दुधामुळे जुलाबसुद्धा होतात. अशा लोकांनी रात्री झोपताना सोया मिल्क प्यावे. सोया मिल्कमध्ये चांगली झोप लागण्यास उपयुक्त ठरणारे अमायनो ॲसिड्‌स असतात. शिवाय सोया मिल्कमध्ये कमी उष्मांक असतात. रात्री पिण्यास उपयुक्त असणारे तिसरे पेय म्हणजे द्राक्षाचा रस याच्यामुळे वजनही कमी होते. झोपण्यापूर्वी एक छोटा ग्लासभरून द्राक्षाचा शुद्ध रस प्राशन केला, की झोपही छान लागते आणि शरीरातली चरबी कमी होते. त्याशिवाय अन्यही काही पेये आहेत मात्र ती आपल्याकडे उपलब्ध नसतात.