तांबडं फुटलं, पण उजाडलं नाही...!

    दिनांक :29-Nov-2019
|
अरुंधती वैद्य
 
 
तो तिला किती कळला? या प्रश्नाचा विचार करताना, भूतकाळ अपरिहार्यपणे समोर येतो. अगदी प्रारंभी त्याच्या जन्माचं रहस्य त्याला अज्ञात असताना तिच्या पोटात ते दडले होते. त्यामुळे त्याच्यासाठी ती देवता होती. काळाच्या ओघात त्याला त्याच्या जन्माचे रहस्य कळले आणि त्याची तिच्याकडे बघण्याची दृष्टी बदलली. मातृत्व हे तिचं मर्मस्थळ आहे, हे त्यानं ओळखलं आणि मोठ्या चलाखीनं त्यानं तिला मातृत्वाच्या चौकटीत अडकवून टाकले. त्यासोबतच रूढी, परंपरा, समाज, कुटुंब यांच्या जोखडात त्याला हवे तसे तो तिला अडकवत गेला. ती देवतेची दासी झाली. केवळ उपभोगाची, विनिमयाची एक वस्तू झाली. तिचं अस्तित्वच उरलं नाही. 

 
 
 
त्याचा अहंकार सुखावणारी, त्याचं पौरुष गोंजारणारी ही व्यवस्था त्याला आवडली. तो सत्ताधारी बनला आणि वर्षानुवर्षे ही व्यवस्था कायम ठेवण्यात तो यशस्वी झाला.
 
 
दुसरीकडे, मातृत्वाच्या सोनसाखळीत अलगद अडकून पडलेली ती व्यवस्थेविरुद्ध ब्र काढण्याची हिंमत गमावून बसली. तिचं बलस्थान तिची मर्यादा ठरली. त्याचा अहंकार जोपासत तो म्हणतो तेच सत्य आहे, असे मानू लागली. अधूनमधून एखादी गार्गी, एखादी मैत्रेयी, द्रौपदी, कैकेयी, लोपामुद्रा, शारदांबा त्याला पराभूत करत होती, पण ते अपवाद होते.
 
 
काळ पुढे सरकत होता. तिला तिच्या बंदिवासाची, पराधीनतेची जाणीव होत होती. चौकटीतून बाहेर पडण्यासाठी ती संघर्ष करत होती. मुक्तीसाठी रूढी, परंपरांच्या दगडांवर डोकं आपटत होती; कधी संघर्ष तर कधी शरणागती सुरू होती.
 
 
तिच्या या संघर्षात कधीकधी हळव्या मनाचा ‘तो’ही सहभागी होत होता. त्याच्या सुजाण मनाला, तिच्याशिवाय समाजाचा विकास नाही हे कळले. तिची अगतिकता, तिची पराधीनतेतून आलेली वेदना त्यानं जाणली. ती अबला का आहे, हे त्याला कळलं आणि तिच्या मुक्तीसाठी, तिच्या आणि समाजाच्या सौख्यासाठी तो कधी कृष्ण बनला. नरकासुराच्या बंदिवासातल्या सोळाशे स्त्रियांची सुटका करून त्यांच्याशी विवाह करून त्यांना सन्मान दिला. कधी द्रौपदीला वस्त्रं पांघरून तिची लाज राखली. कधी रामदास होऊन तिला समाजानं नाकारलेलं निर्णयस्वातंत्र्य मिळवून दिलं, तिला मठाधिपती केले, उभं राहून कीर्तन करण्याचा अधिकार दिला.
 
 
कधी छत्रपती शिवाजी होऊन, परस्त्री आपल्या उपभोगासाठीच असते, असे मानणार्‍या नराधमांना, परस्त्री मग ती कोणत्याही धर्माची असो, मातेसमान असते, हे आपल्या वागण्यानं दाखवून दिलं. कधी जोतिबा फुले बनून तिला ज्ञानाचा मार्ग मोकळा करून दिला, तिच्या हातातली पाळण्याची दोरी सैल केली, तिला अबलेची सबला केली.
 
 
प्रसिद्धीच्या, मानमरातबाच्या मागे न लागता, तुला पटलेले, उमगलेले सत्य तू निर्भीडपणे लोकांसमोर मांड. तुला पाहिजे तेवढं वाचन कर. पैशांची चिंता करू नको. तुला आयुष्यभर पुरेल एवढं धन मी तुझ्यासाठी ठेवले आहे, असे आपल्या मुलीला- दुर्गा भागवतांना- सांगून नारायण भागवतांनी नकळतपणे समाजासमोर अनेक आदर्श ठेवले.
 
 
पत्नी शिकली तर पतीचा मृत्यू होतो, असा समज पोसणार्‍या काळात, किंबहुना ज्ञानसंपन्न स्त्री आपल्या आज्ञेत राहणार नाही, या भयानं स्त्रीला ज्ञानाचे मार्ग बंद केले होते, अशा काळात अट्टहासानं गोपाळ जोशी नावाच्या एका विक्षिप्त समजल्या गेलेल्या माणसानं, आपल्या पत्नीला उच्च शिक्षणासाठी हजारो मैल दूर पाठवले.
 
 
जोतिबा फुले, न्यायमूर्ती रानडे, महात्मा गांधी, विवेकानंद, बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक ज्ञात-अज्ञात पुरुषांनी तिच्यासाठी केलेले कार्य त्यांचे मनातले स्थान उंचावते. मनाला आश्वस्त करते.
 
 
या सगळ्यांच्या रुपानी तो कळला, असे वाटत असतानाच, भूतकाळातली त्याची दुसरी रूपं समोर येतात. मनाला अस्वस्थ करतात. तो कळला असे कसे म्हणावे, असा प्रश्न मनात उभा राहतो.
 
 
भर दरबारात एका रजस्वला स्त्रीला तिच्या केसांना धरून फरफटत आणणारा दुःशासन आठवतो, त्या प्रसंगांचा सूत्रधार असलेला दुर्योधन आठवतो. स्त्रियांना ज्ञानाचा मार्ग मोकळा करणार्‍या जोतिबांवर दगडांचा, शेणाचा मारा करणारा ‘तो’च तर होता. आणि एकटा नव्हता, तर अनेक होते. सगळ्यांच्या विरोधाला न जुमानता, हट्टानं आपल्या पत्नीला सज्ञान सुजाण करताना आपली नवरेशाही गाजवणारे, आपल्या मृत्युपश्चात त्यांना संपत्तीचा काहीही वाटा न देणारे न्यायमूर्ती रानडे आठवतात. आपल्या मुलीच्या ज्ञानसाधनेत व्यत्यय येऊ म्हणून तिच्यासाठी धनाची सोय करून ठेवणारा नारायण नावाचा बाप आठवतानाच दुसरीकडे, पोटच्या पोरीवर वर्षानुवर्षे बलात्कार करणारे नराधम बापही आठवतात. पत्नीने उच्च शिक्षण घ्यावे म्हणून आग्रही असणारे गोपाळराव, पुढे संशयापायी सुप्त मत्सरापोटी पत्नीचा मानसिक छळ करताना दिसतात. एखादा पुरुष सत्तेच्या सर्वोच्च स्थानी विराजमान असताना, विलासाच्या सर्व संधी उपलब्ध असूनही परस्त्री मातेसमान मानत असतो आणि त्याचवेळी सत्तेने उन्मत्त झालेले अनेक पुरुष परस्त्रीचा उपभोग घेणे आपला हक्क समजतात.
 
 
तब्बल सोळाशे स्त्रियांना आपल्या उपभोगासाठी बंदिवासात ठेवून आपल्या आसुरी वृत्तीचे दर्शन घडवणारा, मानवतेवरचा कलंक असणारा नरकासुर आठवतो.
 
 
वयानी, ज्ञानानी, पराक्रमानी, अनुभवानी, नात्यानी ज्येष्ठ असूनही भर दरबारात राजस्नुषेची होणारी विटंबना थांबवू न शकलेले, लाचार, अगतिक झालेले पीतामह भीष्म, राजगुरू असलेले द्रोणाचार्य आठवतात.
 
 
हा सगळा भूतकाळ आहे म्हणावे, तर तो समाजाच्या मनात ठाण मांडून बसला आहे. त्याच्याच सावलीत वर्तमान जगतो आहे. तिच्याशी असेच वागायचे असते, हा भाव मनाच्या तळाशी कुठेतरी जाऊन बसला आहे. हा भाव शिलीभूत करण्यात तिचाही हातभार लागत असतो, हे सत्य आहे.
 
 
त्याची ही परस्परविरोधी रूपे डोक्यात विचारांचा गुंता निर्माण करतात. तो कळला म्हणून हातात धरायला जावे, तर त्याचे अगदी विरुद्ध रूप नजरेसमोर येते आणि तो पार्‍यासारखा हातातून निसटून जातो.
 
 
आज काळ निश्चितच बदलला आहे. समानतेचे वारे वाहते आहे. स्वयंपाकघरात पाऊल न टाकणारा तो बायकोला मदत करताना दिसतो, मुलांच्या आजारपणात त्यांची नॅपी बदलतो, बायकोच्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगताना त्याला संकोच वाटत नाही. त्यानं तिला समजून घ्यायला नक्कीच एक पाऊल पुढे टाकले आहे. भोवतालच्या काळोखाची काजळी कमी झाली आहे. तांबडं तर फुटलं आहे, पण त्यानं पुढे टाकलेलं पाऊल तिला एक माणूस म्हणून समजून घेऊ शकेल...? उजाडल्याचा आभास तर ठरणार नाही...?