बहिणाबाई...

    दिनांक :29-Nov-2019
|
श्याम पेठकर
 
सहसा माणसं नुसतीच जगतात. त्यामुळे मरणानंतर त्यांचे काहीही उरत नाही. काही माणसं कविता जगून पाहतात. त्यांचं आपलं बरं असतं आयुष्य. मात्र, काही माणसांचं जगणंच कविता असते. त्यासाठीच ते जन्म घेतात. गालिब तसे होते. त्या आधी कबीर होते, तुकाराम होते...
 
 
अगदी अलीकडच्या काळात बहिणाबाई तशा होत्या. त्यांचा प्रत्येक श्वासच एक कविता होती. आपण ज्या नजरेने आयुष्य बघतो त्याच्या कितीतरी पलीकडची अन्‌ सामान्यांच्या अशक्य कोटीतली नजर बहिणाबाईंकडे होती... त्या नुसत्या कवयित्री नव्हत्या. आजच्या काळाच्या रूढार्थाने त्या कवयित्री अजीबातच नव्हत्या. त्या संत होत्या. फुलझाडांना फुलं येतात, त्यांना रूप, रंग आणि गंध असतो; पण झाडाला किंवा त्या फुलांनाही त्याचा काहीच अभिनिवेश नसतो. ती एक सहज नैसर्गिक घटना असते... बहिणाबाईंच्या कविता याही सहज नैसर्गिक घटनाच होत्या.
 
 
असे जगणे फकिरीचेच असते. त्याची मागणीच ती असते. त्यामुळे आयुष्यात आपण सामान्यत: ज्याला सुख किंवा दु:ख म्हणतो त्याच्या पलीकडे हे सारेच जात असते. बहिणाबाईंचे लौकिक आयुष्य खूप वेगळे होते. खूप संपन्नता- तितकीच गरिबी, खूप कौटुंबिक सुख आणि तितकीच ताटातूट, एकदम भरलेलं घर आणि एकदम रिकामं... अशी दोन टोकंच गाठल्या जात होती, तरी त्या स्थिर होत्या. याचे कारण त्या संतांच्या नजरेने आयुष्याकडे बघायच्या. कवितेच्या रूपातच आयुष्याशी बोलायच्या... त्यांची बोलभाषाच कविता होती. एकदा सोपान चौधरी- त्यांचे सुपुत्र- लहान असताना गणिताचा अभ्यास खूप कठीण वाटायचा. बहिणाबाई निरक्षर होत्या. शिकलेल्या नव्हत्या. तरीही त्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायच्या. त्यांना सोपानने विचारले, हे गणित इतकं कठीण काहून? तर त्या म्हणाल्या, तुम्ही अगणिताचं गणित नाही शिकत ना... देव देते ते अगणित असते. निसर्ग देते ते अगणित असते. मोजताच येत नाही. जमिनीवर गवत किती, झाडाला पाने किती... तुम्ही पेरता ते मोजून पेरता; पण पिकाला दाणे किती, हे मोजूच शकत नाही. तुम्ही अगणिताचं गणित शिकले तर काहीच कठीण नाही! 
 
 
 
निरक्षर असलेल्या बहिणाबाई आयुष्याचं असं अध्यात्म सहज सांगून जायच्या. त्या खानदेशातच एका मोठ्या शेतकरी कुटुंबात जन्माला आल्या. महाजन हे त्यांचे आडनाव. त्या अर्थानं त्यांच्याकडे महाजनकी होती.
 
 
बहिणा लहानपणापासूनच एकदम वेगळी होती. तिच्या सगळ्याच भावंडांत ती वेगळी होती. एकोणिसावे शतक सुरू होण्याच्या मार्गावर होते. त्या काळाची सामाजिक स्थिती हीच होती की, शेतकर्‍यांच्या किंवा बहुजन समाजातल्याच काय; पण अभिजनांतील मुलीही शिकत नव्हत्या. शेतकर्‍यांच्या मुलांना तर शिकून काय नोकर व्हायचं आहे का? असा सवाल केला जात होता. त्यामुळे बहिणाबाईंच्या शिक्षणाचा प्रश्नच नव्हता. तरीही त्या सुशिक्षित झाल्या त्या निसर्गाच्या शाळेत. त्या झाडांशी बोलायच्या. झाडांशी, पाटाच्या पाण्याशी, गोठ्यांतल्या जनावरांशी, रानातल्या पाखरांशी, उभ्या पिकांशीही... आणि नुसत्या त्या बोलत नव्हत्या तर त्यांच्यात संवाद होता होता. हा संवाद त्या सांगत. मनात मांडून ठेवत. त्यांना प्रश्न पडत ते मग त्या आपल्या वडिलांना विचारत. ते प्रश्न परंपरागत जगण्याच्या आपल्या डोेळेझाक जगण्याला हादरे देणारेच असायचे.
 
 
वयाच्या तेराव्या वर्षीच त्यांचे त्या काळानुसार लग्न झाले. चौधरींच्या घरच्या त्या सून झाल्या. तेही एक मोठे आस्कारलेले शेतकरी कुटुंब होते. त्यामुळे घरची कामे करायची आणि परंपरा, रूढींच्या पालन करायचे, इतकेच आयुष्य एरवी त्यांच्या वाट्याला आले असते. तसा त्यांना सासरी काहीच त्रास नव्हता. त्या आपल्या सासूचा उल्लेख माउली, असा करतात. देवी म्हणतात. सासूकडून तर त्यांना त्या काळात बाईनं कसं जगावं अन्‌ पुरुष वर्चस्वाच्या वेदना कशा कमी कराव्यात, हेच शिक्षण मिळालं. त्यांच्यातला सासू- सून संवादही फारच महत्त्वाचा आहे.
 
 
बहिणाबाईंना तीन अपत्यं झालीत. दोन मुलं आणि एक मुलगी. मुलगी मोठी आणि मग दोन मुलं. वयाच्या 33 व्या वर्षी त्या विधवा झाल्या, तेव्हा त्या तशा पूर्ण एकट्या होत्या. कारण, त्यांचे लग्न झाले अन्‌ सासरे गेल्यावर वाटण्या झाल्या. चौधरांच्या तीन भावांत वाटण्या झाल्या. त्यामुळे शेती विभागली. उत्पन्न कमी झाले. पतीच्या निधनानंतर तर फारच विपन्नावस्था आली. अगदी पती असतानाच त्यांच्यावर तलावाच्या खोदकामावर मजुरीला जाण्याची पाळी आली. जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा तलाव खोदण्याच्या कामात बहिणाबाईचे हात लागले आहेत.
 
 
ज्या हातांनी सकाळी फुलं तोडावीत अन्‌ पूजा करावी ते हात कुदळ-फावडे घेऊन मजुरी करत होते. अनवाणी पायाने जावे लागायचे. तरीही त्या दुपारी शिदोरी सोडली की आपल्या सहकार्‍यांशी गप्पा मारायच्या. नशिबाला दोष देत नव्हत्या. देवाला किंवा दैवाला दोष देत नव्हत्या. बहिणाबाईच्या घरी विष्णूची शंख, चक्र, पद्म आणि गदाधारी अशी अष्टभूजा असलेली मूर्ती होती. त्या रोज त्याची पूजा करायच्या. हात जोडायच्या. एकदा तिच्या जाऊने तिला विचारले की, इतके असे आयुष्य वाट्याला आले तरीही तू दैवाला दोष देत नाहीस? काय दिलं देवाने तुला? तरीही रोज तू त्याला हात जोडतेस... तर बहिणाबाई म्हणाल्या, त्यानं शेतजमीन दिली, मळा दिला, करायला धडधाकट शरीर दिलं... अखीन काय देणार तो? अन्‌ तो आपल्यासाठी काय कसे करेल? त्याचे आठ हात असले तरीही प्रत्येक हातात काहीना काही आहे सांभाळायला. ‘गुतले हायत ना हात त्याचे... आपले त मोकये हायत ना? देल्ले ना त्यानंच ते?’
 
 
आता आपला मोठा लेक मस्त धडधाकट आहे अन्‌ आता तो शेतीच्या कामाला येणार, असं वाटत असतानाच त्याला प्लेग झाला. त्यातून बहिणाबाईंनी त्याला मोठ्या कष्टाने अन्‌ खर्च करून वाचविले. मात्र, त्यात त्याच्या वाट्याला अपंगत्व आले. त्याचे हात-पाय दुबळे झाले. त्याला बसता येईना नीट. त्यामुळे शेतात काम करणं तर दूरची बात झाली. सोपान लहान होता आणि मुलीचं लग्न झालं होतं. त्यात खर्च झाला होता. सावकार तगादे लावत होता आणि शेती बटईला दिली असताना बटईवाला वाटा नीट देत नव्हता. एकदा त्यांना कुणीसं विचारलं की, विठोबाची भक्ती करते तर पंढरीला का नाही जात? तर ती म्हणाली, पांडुरंगाच्या रूपात सावकाराचंच दर्शन होते ना!
 
 
मुलीलाही सासरी खूप त्रास होता. तेव्हाच्या काळानुसार तिला समजवण्याच्या पलीकडे बहिणाबाई काही करूदेखील शकत नव्हत्या.
अशा स्थितीत त्यांनी शेती केली. मुलांना शिकविलं. सोपान तर शिक्षक झाला. चांगला कवी म्हणून त्याची ओळख होती. चांगले दिवस आले होते तर आता गात्रं थकली होती. डोळ्यांसमोर अंधार दाटून यायचा. सोपान जळगावला आला की बघायचा. त्याने मग डोळ्यांचे ऑपरेशन केले. बहिणाबाईंना पुन्हा नीट दिसू लागले. त्या म्हणाल्या, जलमाच्या वेळी जी नजर आली होती ती अभायाची होती, आता ही विज्ञानाची आहे...
 
 
दिसणे आणि दृष्टी असणे यांत फरक असतो. बहिणाबाईंना नुसतेच दिसत नव्हते तर त्यांना दृष्टीही होती, नजर होती. सामान्यांना जे दिसूच शकत नाही ते त्यांना दिसायचे. त्या एकट्यांच्या पाठीशी असायच्या. वेड्यांना आसरा द्यायच्या. त्यांच्या घराच्या परिसरात एक वेडी राहायची. मुलं तिची खोड काढायची. बहिणाबाई मात्र त्या वेडीला आधार होत्या. तिला जेवू घालायच्या. आंघोळ घालायच्या. एकदा सोपानने त्यांना विचारले, माय तू त्या वेड्यांना इतका का लळा लावते. उगाच गळ्यात पडतात ना ते... बहिणाबाई त्याला म्हणाल्या, त्यांना जे दिसतं ते आपल्याला नाही दिसतं अन्‌ त्यांच्याशी नीट संवाद साधला ना तर ते आपल्याला ते दाखवितात. त्यांची भाषा समजली पाहिजे आपल्याला... तुला उलटा पाऊस माहिती आहे का? सोपान म्हणाला, असे काही असते का? त्या खुळ्यांसोबत तुही खुळ्या कल्पनेत रमतेस... बहिणाबाई म्हणाल्या, मला त्या वेडीने उलटा पाऊस दाखविला.
 
 
असे म्हणत त्यांनी सोपानचा हात धरून त्याला सोबत नेले अन्‌ कारंजा दाखविला. म्हणाल्या, याला ती उलटा पाऊस म्हणते. जमिनीकडून अभायाकडे जाते, तो उलटा पाऊस ना!
 
 
त्या काळात तशी स्पृश्य-अस्पृश्यता होतीच अन्‌ गावगाड्यात तर होतीच. बहिणाबाई तर दलित- वंचितांना आपले बरोबरीचे सहचर मानायच्या. एकदा गावचा पुजारी पूजा करण्यासाठी देवळात जात असताना एका अस्पृश्याची सावली पडली त्याच्यावर म्हणा किंवा तो खूपच जवळून गेला, तर पुजारी त्याच्यावर खेकसला. पुन्हा जाऊन आंघोळ करावी लागेल म्हणाला. बहिणाबाई म्हणाल्या, तोही माणूसच आहे ना? तुम्हाला माणूस नाही चालत, बाईदेखील माणूसच आहे; पण तिचीही सावली कधीकधी नको असते... तर पुजारी म्हणाला, बहिणाबाई तुला कळत नाही, शास्त्र नाही कळत. अरे, आम्ही अभिजन भगवंताच्या मुखातून- मस्तकातून निर्माण झालो आहोत अन्‌ ही मंडळी पायातून. त्यामुळे ते खालचेच असतात.
 
 
बहिणाबाई म्हणाल्या, देवळात जाऊन तू पूजा करतोस देवाची अन्‌ मग डोकं कुठे ठेवतोस त्यांच्या? पुजारी म्हणाला, खुळी आहेस का तू? देवाच्या पायावरच डोके ठेवायचे ना! आशीर्वाद तिथूनच मिळतात... बहिणाबाई म्हणाल्या, अरेच्चा! मला वाटलं की भगवंताच्या तोंडावर डोकं ठेवलं पाहिजे. पवित्र तेच ना? अरे तुम्ही देवाच्या पायावर डोस्कं ठेवता काहून का तेच पवित्र असते. मग त्याच्या पायातून निघालेले अपवित्र कसे?
 
 
हेच प्रश्न ती विचारायची अन्‌ प्रश्न विचारणारे व्यवस्थेला नको असतात. म्हणून मग तिने कवितेतून ते सारेच प्रश्न विचारले. समाजधारणांना तडे देणारी उत्तरेही दिली अन्‌ कधी सुखद अचंबाही निर्माण केला. अरेच्चा! आपल्याला रोज दिसणार्‍या गोष्टीत हिला आयुष्याचं असं भव्य दर्शन होतं... सहज सोप्या भाषेत त्या खूप गूढ-गहन असे काही सांगून जायच्या. ‘मन एवढं एवढं अभायातबी मायेना’ असो की मग ‘बिना कपाशीनं उले त्याले बोंड म्हनू नही’ असो.
 
 
आपली आई चांगली कविता करते, हे सोपानला माहिती होते. तो व त्याचा मावस भाऊ या दोघांनी तिच्या कविता ती गायची तेव्हा लिहून काढल्या होत्या. तीही मुलांना सांगून एका वहीत लिहून ठेवायची. सोपानने त्यांच्या कविता अनेकांना दाखविल्या होत्या. काही प्रकाशकांनाही दाखविल्या होत्या. अहिराणी भाषेतल्या या कविता चांगल्या असल्या तरीही प्रमाणभाषेत त्याला काही अर्थ नाही, अशाच प्रतिक्रिया आल्या. त्यामुळे निराश झालेल्या सोपानदेव चौधरी यांनी त्या वह्या ठेवून दिल्या. एका कवी संमेलनात सोपानदेव होते आणि तिथे आचार्य अत्रेही आले होते. त्यांना सोपानच्या कविता आवडल्या. त्यांनी त्यांची आईदेखील कविता करते, असे सांगितले. त्या कविता त्यांनी थोडे अडखळतच दाखविल्या तर आचार्य अत्रे म्हणालेत की, आजवर का दडवून ठेवल्यात या? त्यांनीच मग त्या कविता प्रकाशकांना दिल्या आणि त्याचे पुस्तक झाले. अर्थात हे बहिणाबाई गेल्यावर झाले.
 
 
वाढत्या वयानुसार बहिणाबाई खंगत गेल्या. कष्टही खूप झाले होते. त्या जळगावला होत्या. सोपान त्यांना भेटायला गेला तर त्या मृत्युशय्येवरच होत्या. त्या म्हणाल्या, ‘‘तू येतस ते औषिधावानी असते... पन, यावेळी देवाचंच औषिध कारनी पडन!’’ असं का म्हणतेस, म्हणून सोपानला रडू आले. मात्र, बहिणाबाईंचा मृत्यू झाला. या माय-लेकराचा भावनिक अनुबंध अत्यंत वेगळाच होता!
 
 
तुमच्या-माझ्या आयुष्याचे सार्थक सांगणार्‍या कविता म्हणजे मायचं दूधच आहे. बहिणाईनं अक्षय दुधाचा तो घडाच आमच्यासाठी ठेवला अन्‌ 3 डिसेंबर 1951 ला निघून गेली.