चीन की चाय

    दिनांक :29-Nov-2019
|
फिरंगी तडका  
वैदेही राजे-जोशी 
 
नमस्कार मंडळी! फिरंगी तडकाच्या नव्या भागात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळी, सध्या थंडी पडायला सुरुवात झाली आहे आणि थंडी म्हटलं की आठवतो तो गरमागरम चहा! आपल्याकडे चहा आला तो दोनशे-तीनशे वर्षांपूर्वी! ब्रिटिशांनी त्यांच्याबरोबर चहा हे पेय आणले. परंतु, त्याआधी प्राचीन काळापासून आपल्या शेजारील देशात म्हणजेच चीनमध्ये चहाचे सेवन केले जाते. चहाचा शोध हा इसवी सन पूर्व काळात चीनमध्ये लागला. शांग राजवटीत युनान या प्रदेशात चहा हे औषधी पेय म्हणून चहाचा शोध लागला. चहा घेण्यासंदर्भातील सर्वात जुना रेकॉर्ड हा इसवी सन तिसर्‍या शतकातील आहे. एका औषधाच्या माहितीसंदर्भातल्या कागदपत्रांत हुआ ताओ याने चहाचा उल्लेख केलेला आढळून येतो. सोळाव्या शतकात लेबननमध्ये व्यापारी आणि पोर्तुगीज प्रिस्ट यांची चहाशी प्रथम ओळख झाली. सतराव्या शतकात ब्रिटनमध्ये चहा लोकप्रिय झाला. आपल्या देशात चहाची लागवड तसेच चहा घेणे हे ब्रिटिशांनी सुरू केले. त्या आधी चहावर फक्त चिनी लोकांची मक्तेदारी होती. ती मोडून काढण्यासाठी ब्रिटिशांनी भारतात चहाची लागवड सुरू केली. 

 
 
इसवी सन पूर्व 2737 मध्ये चीनमधील एक राजा शेन नून्ग याला सत्तेवरून पायउतार करून दुर्गम भागात, जंगलात एकान्तवासात पाठवण्यात आले. त्याच्याकडे काहीही उरले नसल्यामुळे एकदा तो एका झाडाखाली बसून गरम पाणी पीत होता तेव्हा त्यात त्या झाडाची काही पाने पडली. त्या पानांमुळे त्या पाण्याचा रंग बदलला आणि ते पाणी प्यायल्यानंतर राजाला एकदम तरतरीत झाल्यासारखे वाटले. तेव्हापासून त्याने त्या झाडाची पाने घालून गरम पाणी पिणे सुरू केले आणि त्या प्रदेशात त्या विशिष्ट झाडांचा शोध घेतला. हळूहळू त्याच्या असेही लक्षात आले की या झाडाची पाने घातलेले गरम पाणी प्यायल्याने पोटदुखी कमी होते. त्यानंतर त्याने या झाडाचा प्रचार देशभर केला आणि चीनमधून चहाची कीर्ती जगभर पसरली. चहाच्या शोधाबाबतीत अशा अनेक रंजक कथा सांगितल्या जातात.
 
 
तिसर्‍या शतकापर्यंत चहा फक्त चीनमध्येच लोकप्रिय होता. त्यानंतर आठव्या शतकात चहाची कीर्ती अनेक देशांत पोचली. सिल्क रोड मार्फत भारतात आलेला चहाचे हिमालयात वास्तव्य करणारे भटके लोकसुद्धा सेवन करू लागले होते. परंतु, हे लोण संपूर्ण भारतात ब्रिटिशांनी पोचवले. चीन ते युरोप या मोठ्या प्रवासादरम्यान चहाची क्वालिटी टिकून राहात नसे. ती तशीच टिकून राहावी म्हणून त्यावर मोठ्या प्रमाणावर संशोधन केले गेले आणि सुरुवातीला पिला जाणारा ग्रीन टी हा नंतर ब्लॅक टी झाला. ग्रीन टी, यलो टी, ब्लॅक टी हे सगळे प्रकार चहाच्या एकाच झाडापासून तयार होतात. फक्त त्यांवर वेगवेगळी प्रक्रिया केली जाते. चीनची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी ब्रिटिशांनी भारतात चहाची लागवड करण्याचे ठरवले. परंतु, यात यश मिळायला इंग्रजांना तब्बल एक दशकभर प्रयत्न करावे लागले. भरपूर संशोधन करावे लागले. त्यानंतर चहाच्या चिनरी या जातीची आसाम व दार्जिलिंगमध्ये यशस्वीपणे लागवड करण्यात आली.
 
 
सर्व प्रकारचे चहा हे चहाच्या कॅमेलिया सिनेन्सिस याच झाडापासून तयार केले जातात, फक्त त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात. जगात चहाचे हजारो प्रकार बघायला मिळतात. चहाची चव ही त्याचे उत्पादन कुठल्या हवामानात, कुठल्या मातीत झाले आहे तसेच कुठल्या वेळी चहाची पाने खुडली आहेत आणि त्यावर कुठली प्रक्रिया केली आहे यावर अवलंबून असते. प्रत्येक प्रकारच्या चहाची खासियत आणि चव अद्वितीय आहे. तर आज चहाच्या विविध प्रकारांबद्दल आपण जाणून घेऊ या.
 
 
व्हाईट टी -
व्हाईट टी हा चहाचा सर्वात शुद्ध प्रकार आहे. यावर अतिशय कमी प्रमाणात प्रक्रिया केलेली असते. याचा रंग आणि चव दोन्हीही सौम्य असतात. याची चव नैसर्गिक रीत्याच गोड आणि सुंदर असते.
 
 
ग्रीन टी -
आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असा हा चहाचा प्रकार हल्ली ट्रेिंडग आहे. जगात आणि त्यातल्या त्यात आशियाई लोकांतसुद्धा याच प्रकारचा चहा सर्वात लोकप्रिय आहे. काही ठिकाणी ग्रीन टीमध्ये विविध प्रकारची फुले किंवा फळे घालून सेण्टेट आणि फ्लेवर्ड ग्रीन टी बनवण्याची पद्धत आहे. साध्या ग्रीन टीला सौम्य चव असते.
वूलाँग टी -
हा चिनी चहा आहे. हा चहाचा हा प्रकार चीनमध्ये प्रसिद्ध आहे आणि अनेक चायनीज हॉटेल्समध्ये हा चहा मिळतो.
ब्लॅक टी -
आपण सगळे जो चहा पीत मोठे झालो आहोत तोच हा ब्लॅक टी. हा चहा स्ट्रॉंग चवीचा असतो. आपल्याला हाच कडक चहा आवडतो. कडाक्याची थंडी असो की मरणाचा उकाडा, दूध व साखर घालून केलेला गरमागरम चहा बहुसंख्य लोकांच्या आवडीचा आहे. काही लोक हाच ब्लॅक टी आईस टी म्हणूनसुद्धा आवडीने पितात.
हर्बल टी -
या चहामध्ये कॅमेलिया झाडाची पाने नसतात. या चहाचे तीन प्रकार आहेत. एक म्हणजे Rooibos tea दुसरा mate tea आणि तिसरा प्रकार म्हणजे हर्बल इन्फ्युजन्स होय. यातील हर्बल इन्फ्युजन्समध्ये शुद्ध औषधी वनस्पती, फुले व फळे असतात. हे चहाचे प्रकार गरम किंवा चिल्ड स्वरूपात प्यायले जातात. Rooibos Tea हा दक्षिण आफ्रिकन रेड बुशपासून तयार करतात. या चहाला रेड टी असे म्हणतात. हा चहा अतिशय चविष्ट लागतो आणि अनेक प्रकारच्या फ्लेवर्समध्ये मिळतो. हा चहा गरमागरम किंवा चिल्ड पिता येतो. तर Mate Tea हा कॉफीप्रेमींचा आवडता चहाचा प्रकार आहे. कारण या चहाची चव कॉफीसारखी असते. Mate हे अर्जेंटिनामध्ये उगवणारे एक जंगली झुडूप आहे. या झुडुपाच्या पानांपासून चविष्ट चहा तयार होतो.

ब्लूमिंग टी -
या चहाला फुलांचा चहा किंवा हस्तकला असलेला चहा असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण याचे झाड जेव्हा वाढते तेव्हा त्यांना खरंच फुले येतात. टी आर्टिस्ट हे चहाचे झाड स्वत: विविध प्रकारे बांधून ठेवतात आणि चहा करताना त्यात स्पेशल फ्लेवर किंवा सुगंध घालतात. तसेच डिझाईनसुद्धा तयार करतात. म्हणूनच या चहाला हस्तकला असलेला चहा असे म्हणतात. हे चहाचे झाड खूप सुंदर दिसते म्हणून लोक एकमेकांना रोमँटिक गिफ्ट म्हणूनसुद्धा देतात.
 
टी ब्लेण्डस -
टी ब्लेन्डस म्हणजे अनेक प्रकारचे चहा एकत्र करून एक उत्तम चवीचा प्रीमियम प्रकारचा चहा तयार करतात.
तर असे हे चहाचे विविध प्रकार आहेत. जगात पेयांमध्ये पाण्यानंतर चहाचा क्रमांक लागतो. जसे वाईन टेस्टिंग हे मोठे काम असते तसेच टी टेस्टिंग हेसुद्धा एक मोठे काम असते. चहाप्रेमी याकडे एक करीअर ऑप्शन म्हणून बघू शकतात. चहा हा योग्य प्रमाणात घेतला तर आरोग्यासाठी चांगलाच आहे. चहावर जितकी कमी प्रक्रिया केली असेल तितके त्यात अँटीऑक्सिडेंट्स जास्त असतात. म्हणूनच ब्लॅक टीपेक्षा ग्रीन टी पिणे आरोग्यासाठी चांगले आहे, असे म्हणतात.
तर मंडळी, आज आपण चहाच्या विविध प्रकारांबद्दल जाणून घेतले. भेटू पुढील भागात नव्या माहितीसह! तोवर खाते रहो और खिलाते रहो...