फलाहाराचे फायदे

    दिनांक :29-Nov-2019
|
निरनिराळ्या प्रकारची फळे खाल्ल्याने ती खाणार्‌यांचे आरोग्य सुधारते आणि त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते कारण फळे ही जीवनसत्त्वे, पोषणमूल्ये, फायबर आणि ॲण्टी ऑक्सिडंट्‌स यांचे साठे असतात. मात्र प्रत्येक फळाचे एक वेगळे वैशिष्ट्य असते. ते समजून घेऊन आरोग्यासाठी प्राधान्याने कोणती फळे खावीत, हे ठरवता आले पाहिजे. सफरचंद हे त्यातील सर्वाधिक फलदायी फळ असून त्याच्या बाबतीत सांगितली जाणारी, ॲपल अ डे, डॉक्टर अवे हे उक्ती खरीच आहे. कारण सफरचंद हे कर्करोग प्रतिबंधक मानले जाते. सफरचंदामध्ये उपलब्ध असलेले फ्लेवोनाईट्‌स हे आपले अस्थमा, मधुमेह यापासून संरक्षण करत असते. शिवाय सफरचंद खाल्ल्याने बुद्धीचाही विकास होतो. 
 
 
 
संत्रा हे सुद्धा सर्वाधिक लोकप्रिय मानले जाणारे फळ आहे आणि ते सर्वाधिक पोषक आहे. संत्रामधून क जीवनसत्त्व, पोटॅशियम आणि ब जीवनसत्त्व विपुल प्रमाणात मिळत असते. थायमाईन आणि फोलेट या दोन द्रव्यांचा रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास चांगलाच उपयोग होत असतो. संत्र्यामध्ये सिट्रीक ॲसिड असते. आपण खात असलेल्या अन्नातील लोहाचे योग्य त्या प्रमाणात शोषण करून ते आपल्या रक्त वाहिन्यांमध्ये मिसळवण्यास सिट्रिक ॲसिड उपयोगी पडत असते आणि त्यामुळे अशक्तपणा कमी होण्यास मदत होते. केळी हे फळ तर फळांचा राजा म्हणवले जाते, कारण त्यातून पोटॅशियम, स्टार्च आणि पेक्टिम्‌ हे उपलब्ध होते. कार्बोहायड्रेट्‌स मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे केळी खाणार्‍यांची कार्यशक्ती चांगली राहते. केळीतील स्टार्चच्या प्रमाणामुळे ब्लडशुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
 
 
पायनॅपल म्हणजेच अननस हेसुद्धा बहुगुणी फळ आहे. ते दाह प्रतिबंधक मानले जाते. हे फळ खाल्ल्याने हृदयविकाराची शक्यता कमी होते. संधिवात असणाणार्‍यांनी हे फळ खावे कारण संधितावावर ते गुणकारी आहे. पायनॅपल हे क जीवनसत्त्वांनी युक्त आहे आणि त्यातील ब्रोमेलेनमुळे सर्दी आणि पडसे कमी होते. हे फळ मँगनीजयुक्त असल्यामुळे त्याच्या सेवनाने हाडे मजबूत होतात. पायनॅपलचा एक कपभर ज्यूस प्यायल्याने मँगनीज मोठ्या प्रमाणावर मिळते. शिवाय पायनॅपल हे मुखरोगावरही उपयुक्त आहे. अशाच रितीने किवी आणि चेरी ही दोन फळेही अनेक पोषण द्रव्यांनी युक्त असून त्यांच्या सेवनाने अनेक लाभ होत असतात.