निकोप वातावरणासाठी राष्ट्रीय क्रीडा आचारसंहिता

    दिनांक :03-Nov-2019
मिलिंद महाजन
 
भारतीय क्रिकेट नियामक मंडळासह (बीसीसीआय) सर्वच क्रीडा संघटनांसाठी लवकरच राष्ट्रीय क्रीडा आचारसंहिता लागू होणार आहे. 
 
 
सध्या प्रस्तावित राष्ट्रीय क्रीडा आचारसंहितेला अंतिम स्वरूप देण्याचे कार्य सुरु असून एकदा या आचारसंहितेला मंजुरी मिळाली की, त्याची अंमलबजावणी बीसीसीआयसह सर्वच क्रीडा संघटनांसाठी लागू होईल, अशी घोषणा अलिकडेच केंद्रीय क्रीडा व युवक कल्याम मंत्री किरेन रिजिजू यांनी केली आहे. काही सुधारणांसह आचारसंहिता येईल. थोडावेळ प्रतीक्षा करा. राष्ट्रीय क्रीडा आचारसंहिता लागू होईल, असे ते म्हणाले. या आचारसंहितेला अंतिम रूप केव्हापर्यंत मिळेल, याची कालमर्यादा क्रीडामंत्र्यांनी सांगितली नाही, मात्र अंतिम स्वरूप प्राप्त होताच त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. मी ठराविक वेळ सांगू शकत नाही, परंतु त्याकरिता दिल्ली उच्च न्यायालय माझ्या सचिवांना व इतर संस्थांना निर्देश देतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
जर राष्ट्रीय क्रीडा आचारसंहिता लागू झाली, तर बीसीसीआयला पुन्हा आपल्या घटनेत बदल करावा लागेल. कारण अलिकडेच न्या. आर.एस. लोढा समितीने केलेल्या शिफारशीनुसार बीसीसीआयने आपल्या घटनेत सुधारणा केली आहे. 2017 साली सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआय प्रशासकीय समिती नेमली होती. गत आठवड्यातच या समितीचा कार्यकाळ संपला आणि बीसीसीआयवर नवे अध्यक्ष म्हणून सौरव गांगुली निवडून आलेत. कुिंलग पिरियडमुळे गांगुलीचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ 10 महिन्यांचा राहणार आहे.
 
 
राष्ट्रीय क्रीडा आचारसंहिता लागू करण्यापूर्वी केंद्रीय क्रीडा मंत्री भारतीय ऑलिम्पिक संघटना व राष्ट्रीय क्रीडा महासंघासोबत बैठक घेण्यात आली. बैठकीत या संघटनांच्या पदाधिकार्‍यांचे राष्ट्रीय क्रीडा आचारसंहितेबाबतची मते जाणून घेतली. काही विचार व सूचना स्वीकारल्यानंतर सुधारित आचारसंहिता तयार होईल. सर्व पदाधिकार्‍यांनी क्रीडा मंत्रालय जे काही करेल, त्याला आमची मान्यता राहील, असे सर्वच क्रीडा संघटनांनी मान्य केले आहे.
 
 
या प्रक्रियेमुळे एक सुनिश्चित झाले की, निकोप, खेळकर क्रीडामय वातावरण निर्मिती होईल आणि कुठल्याही क्रीडा संघटनेत वाद-विवाद, केवळ एकाच व्यक्तीचे मक्तेदारी यापुढे राहणार नाही. त्यामुळे खेळाडू, प्रशिक्षक किंवा संघटकांवरसुद्धा कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, शिवाय संघटनेचे कार्य सुरळीतपणे आणि भ्रष्टाचार मुक्त राहील, असा विश्वास निर्माण झाला आहे.
 
7276377318