संतप्त नगरसेवकांकडून टेबल-खुर्च्यांची तोडफोड

    दिनांक :03-Nov-2019
*उज्ज्वल कंट्रक्शन कंपनीवर धडक
*शुद्ध पाणी पुरवठा करण्याची मागणी
चंद्रपूर, 
नियमित दूषित पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप करीत संतप्त नगरसेवकांसह जटपुरा गेट प्रभागातील काही नागरिकांनी उज्ज्वल कंट्रक्शन कंपनी कार्यालयावर धडक दिली. कार्यालयात उपस्थित कर्मचार्‍यांना जाब विचारून त्यांनी कार्यालयातील टेबल-खुर्च्यांची तोडफोड केली. त्यामुळे येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
 
 
 
महानगराला खासगी कंत्राटदार उज्ज्वल कंट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. पण, या कंपनीकडून कधी अनियमित, तर कधी दूषित पाणी पुरवठा केला जात असून, जटपुरा गेट प्रभागात मागील अनेक दिवसांपासूल अशुद्ध पाणी पुरवठा केला जात असल्याचा आरोप आहे. प्रभागातील नगरसेवक छबू वैरागडे व राहुल घोटेकर यांनी महापौर व स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांच्यासह पाणी पुरवठा करणार्‍या कंत्राटदाराचे उंबरठे झिजवले. पण, त्यांच्या पदरी निराशा आली. दरम्यान, शनिवारी शेकडो संतप्त नागरिकांसह नगरसेवकांनी पाणी पुरवठा करणार्‍या कंपनीचे कार्यालय गाठून रोष व्यक्त केला. नियमित पाणी व शुद्ध पाणी न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा नगरसेवकांनी दिला आहे.