तभा इफेक्ट - ‘त्या’ रस्त्यावर नालीचे बांधकाम तत्काळ सुरू

    दिनांक :03-Nov-2019
भंडारा,
‘रस्त्यावरून वाहणा-या सांडपाण्यामुळे ये-जा करणा-यांना मनःस्ताप’ या मथळ्याखाली 1 नोव्हेंबर रोजी तरुण भारतने प्रकाशित केली होती. स्थानिक नगरसेवक व नगरपालिका प्रशासनाने बातमीची दखल घेत तातडीने नालीचे खोदकाम सुरू करण्यात आले. नाली बांधकामामुळे वर्षानुवर्षापासून रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी बंद होणार असल्याने परिसरातील नागरिकांकडून तरुण भारत भंडाराचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.
 

 
 
नूतन महाराष्ट्र शाळेसमोरून राजीव गांधी चौकाकडे जाण्याकरिता बीएसएनएल कार्यालयाच्या मागच्या बाजूने हा रस्ता आहे. या मार्गावर शिकवणी वर्ग, दवाखाने, मदरसा असल्याने पहाटेपासूनच वर्दळ असते. या रस्त्यावर वर्षानुवर्षापासून सांडपाणी वाहत होते. विद्यार्थी व नागरिकांकरिता अत्यंत वर्दळीच्या असलेल्या रस्त्यावर वर्षभर सांडपाण्याचे डबके राहत असल्याने येथून ये-जा करणा-यांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागत होता. काही दिवसापुर्वी याच रस्त्यावर नाली तयार करण्यात आली, परंतू तेही अर्धवट असल्याने या रस्त्यावरील सुरवातीच्या काही घरातील सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहत होते. याबाबतची माहिती काही विद्यार्थ्यांनी तरुण भारतला दिली होती. माहितीच्या आधारे प्रत्यक्ष पाहणी करून 1 नोव्हेंबर रोजी बातमी प्रकाशित करण्यात आली. सदर बातमीची दखल स्थानिक नगरसेवक व नगरपालिका प्रशासनाने घेऊन तत्काळ नालीच्या बांधकामाला सुरूवात केली. तातडीने जेसीबीच्या सहायाने नालीचे खोदकाम करून बांधकाम साहित्यही आणण्यात आले आहे. यामुळे वर्षानुवर्षापासून असलेल्या सांडपाणी निच-याच्या समस्येपासून मुक्तता मिळणार असल्याने परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांकडून तरुण भारतचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.