गोंदियातून तीन संशयीत नक्षली ताब्यात!

    दिनांक :03-Nov-2019
गोंदिया,
गोंदियातील सालेकसा पोलिस ठाणेतंर्गत येत असलेल्या परिसरातून तीन संशयीत नक्षलवांद्यांना सालेकसा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी चौकशी सुरू असल्याची माहिती सालेकसा पोलिसांनी दिली.
 
गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुका हा नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील तालुका म्हणून ओळखला जातो. विशेषतः छत्तीसगड राज्याची सीमा लागून असल्यामुळे या भागात वेळोवेळी नक्षल्यांचा हालचाली असल्याचे दिसून येते. मागील महिन्यात १७ ऑक्टोंबर रोजी देवरी तालुक्यातील डोंगरगाव येथे मडावी नामक व्यक्तीच्या घरातून स्फोटके , २१ जीवंत डिटोनेटर मिळून आले होते. तसेच चार दिवसानंतर विधानसभा मतदानाच्या पूर्वसंध्येला पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून काही नक्षलवाद्यांनी मुरकुटडोह या जंगल परिसरात भालचंद्र धुर्वे (वय ५० वर्ष, रा.मुरकुटडोह) याची गोळ्या झाडून हत्या केली होती. या प्रकरणी सालेकसा पोलिस ठाणेअंतर्गत १० नक्षलवाद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आज ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीत नक्षलींवर त्या दृष्टीकोनातून पाहिले जात आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.