स्वामिनिष्ठेचे ओंगळवाणे प्रदर्शन...

    दिनांक :30-Nov-2019
|
फक्त जिभेलाच हाड असलेल्या संजय राऊत यांनी सांगितले होते की, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आम्ही कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत सरकार स्थापन करीत आहोत. गुरुवारी संध्याकाळी केशरी रंगाची उधळण करत अस्ताला जाणार्‍या सूर्याच्या साक्षीने मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदाचा जो शपथविधी सोहळा झाला, त्यात जे लाचारीचे प्रदर्शन झाले, त्यालाच महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणायचा का? याचे उत्तर आता शोधले पाहिजे. हा स्वाभिमान असेल तर मग गपचिपच राहायला हवे. या शपथविधी कार्यक्रमात स्वाभिमान तर नावालाही नव्हता. होते ते फक्त आपल्या स्वामिनिष्ठेचे किळसवाणे आणि बटबटीत प्रदर्शन. शपथविधी हा एक शासकीय कार्यक्रम असतो आणि तो तशाच पद्धतीने व्हायला हवा. तुम्हाला प्रसिद्धीसाठी जी काही थेरं करायचीय्‌ ती नंतर िंकवा आधी करा ना! शासकीय कार्यक्रमाची मर्यादाभंग का करता? असा प्रश्न नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारायला हवा. तसेही ठाकरे हे नाटकीच समजले जातात. केव्हा, कुठे आणि कुठले नाटक करायचे, हे त्यांना चांगले ठावुक आहे. आता हेच बघा ना! उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यास तिथे आले होते. तो शासकीय कार्यक्रम होता. शिवसेनेचा दसरा मेळावा नव्हता. आल्या आल्या तुम्ही व्यासपीठावरून समोरच्या जनतेला माथा टेकवून नमस्कार केला. कुणालाच आक्षेप नाही. परंतु, माननीय राज्यपालांनी शपथेची सुरवात करून दिल्यावर, विधिसंमत शपथ घेण्यास सुरवात करायला हवी होती. परंतु, उद्धव ठाकरे मायनाच वाचत बसले. कुणाच्याही श्रद्धेवर कुणीही टीका करू नये. हा एक सभ्य संकेत आहे. परंतु, कुणीही, कुठेही आपल्या श्रद्धेचे असले बटबटीत प्रदर्शनही करू नये ना! प्रत्येकालाच आपल्या आईवडिलांबाबत, आपल्या आदर्शांबाबत कृतज्ञता वाटत असते. आयुष्याच्या प्रवासात अनेकांचे सहकार्य आपल्याला मिळत असते. त्यांच्याप्रती असलेला कृतज्ञतेचा भाव मनात जागृत ठेवावा लागतो. त्याचे योग्य वेळी प्रदर्शनही करण्यास हरकत नाही. परंतु, एखाद्या कार्यक्रमाचा एखादा विशिष्ट विधिसंमत शिष्टाचार असेल, तर तिथे मात्र आपल्या भावभावनांचे प्रदर्शन करणे अशिष्टच समजले पाहिजे. कदाचित, आपण कर्तृत्वशून्य असतानाही कुणाच्या तरी कृपेने हा मान-सन्मान आपल्याला मिळाला, या कृतज्ञभावनेच्या अतिरेकाने त्यांना हे असले प्रदर्शन करण्याचे धाडस झाले असावे. नक्की काय ते सिद्धिविनायकास िंकवा कार्ल्याच्या एकवीरा देवीसच ठाऊक! आता खुद्द मुख्यमंत्र्यांनीच शपथेआधी एवढा लांबलचक मायना वाचल्यावर, मागाहून येणारे सहकारी कशाला मागे राहतील? त्यांनीही आपापले मायने वाचले. काहींनी तर शरद पवारांना, सोनिया व राहुल गांधींना वंदन करून नंतर शपथ वाचली. हा काय प्रकार आहे? उद्या एखादा आपल्या अख्ख्या पूर्वजांची यादीच घेऊन आला तर?
 
 
 
दुसरे म्हणजे एकतर ईश्वराला साक्षी ठेवून शपथ घेतात िंकवा संविधानाला साक्षी ठेवून. असे असताना कुणी त्यात बदल करून आपल्याला वाटेल त्याला साक्ष ठेवून शपथ घेणार असेल, तर ती शपथ अवैध ठरवली पाहिजे. ज्या संविधानाने शपथविधीचे प्रारूप तयार केले आहे, जे आतापर्यंत इतकी वर्षे अखंड चालत आले आहे, त्यात इथे येणारा प्रत्येक जण आपापल्या मनमर्जीप्रमाणे बदल करत होता. आता कुणाला त्या संविधानाची, त्यातील अनुसूची 3 व अनुच्छेद 75 चा भाग 4 याचे उल्लंघन झाल्याची खंत वाटत नसणार. कारण, यांच्या कपाळावर सेक्युलरचा शिक्का लागला आहे ना! संविधानाचे दाखले फक्त भाजपा व रा. स्व. संघावरच उधळण्यासाठी असतात का? एवढा गंभीर प्रकार होऊनही, शारदीय चांदण्यात आयुष्यभर सुस्नात होत असलेल्या एकाही मराठी पत्रकार मुखंडांना खटकले नाही? राज्यपाल महोदयांनी या शपथविधीच्या पोरखेळाविरुद्ध सक्त नाराजी व्यक्त केली असल्याची बातमी आहे. यापुढच्या शपथविधीत असली थेरं चालणार नसल्याची ताकीदही दिल्याचे समजते. परंतु, असली समज ज्यांना मनाची आणि जनाची थोडीफार आहे, त्यांनाच समजेल ना? सत्तेसाठी कंबरेचे डोक्याला गुंडाळणार्‍यांना त्याचे काय?
 
 
 
शिवाजी पार्कवर हा सर्व रंगीत खडातमाशा झाल्यावर वाटले की, सत्तेच्या पायर्‍या चढून िंसहासनावर बसल्यानंतर तरी हा उन्माद आणि नाटकीपणाचा कावीळ उतरला असेल. पण तसे झाले नाही. कदाचित यापुढेही तसे होईल, याची शाश्वती नाही. शपथविधीनंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली. त्यात मंत्री नसलेलेही सहभागी झाले होते म्हणतात. एवढाच पारदर्शी कारभार करायचा शौक असेल, तर राज्यपाल व्यासपीठावरून निघून गेल्यावर त्या शिवाजी पार्क मैदानावरच मंत्रिमंडळाची बैठक घ्यायची होती! एकदम पारदर्शक आणि लाचारांच्या साक्षीने! उद्धव ठाकरे, तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाला आहात. रंगशारदा सभागृहात वडिलांच्या कृपेने शिवसेनेचे पक्षप्रमुख नाही! त्यामुळे राज्य शासन म्हणजे शिवसेना नाही की मातोश्रीच्या दालन क्रमांक चारमध्ये बसून तुम्ही मनमानी करावी. तसेही तुम्हाला 288 मतदारसंघांपैकी 232 मतदारसंघांनी झिडकारले आहे आणि भाजपाचा टेकू नसता, तर या झिडकारणार्‍या मतदारसंघात 20-25ची आणखी भर पडली असती. त्यामुळे जो काही राजशिष्टाचार आहे, ज्या विधिसंमत प्रथा आहेत, त्यांचा मान तुम्ही राखलाच पाहिजे. तसेही तुम्ही तुमची गोडसेभक्ती, िंहदू राष्ट्रप्रेम, अयोध्येच्या वार्‍या... सारं काही गुंडाळून ठेवलेच आहे, त्यात आता पक्षप्रमुखपदाचा ताठाही बाजूला ठेवा, अशी विनंती आहे.
 
 
 
मंत्रिमंडळाची बैठक झाली. शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन, शेतकरीप्रेमाचे नाटक करणार्‍या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकर्‍यांसंबंधी काही आश्वासक निर्णय होईल, अशी सर्वांना आशा होती. पण, तिथे त्या बैठकीत झाले भलतेच. या तिघाडीच्या मंत्रिमंडळाला लपतछपत बहुमत कसे प्राप्त करून घ्यायचे, याचीच खलबते तिथे झाली म्हणतात. मग एक महिना काय, खलबत्त्यात नुसता काथ्याकूटच होत होता का?
 
 
इकडे सरकारचा शपथविधी झाला. भाजपाने देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षनेता म्हणूनही निवडले. तरीही या सत्तारूढ पक्षांचे आमदार कैदेतच? शपथविधी कार्यक्रमात या आमदारांना हॉटेलमधून मर्सिडिज लक़्झरी बसेसमधून आणले आणि कार्यक्रम संपताच पुन्हा त्यांची हॉटेलमध्ये रवानगी करण्यात आली. हे म्हणजे कोर्टात तारखेवर कैद्यांना आणतात तसेच झाले! एवढे सर्व उरकल्यावरही या तिघाडीला कशाची भीती वाटत आहे? परत काही दगाफटका तर होणार नाही ना, याची? मग एवढे जर ठिकठिकाणी लाल दिवे लुकलुकत असतील, तर कशाला सरकार बनविण्याच्या भानगडीत पडली ही मंडळी? सरकार स्थापन होईपर्यंत वाटू शकते आमदारफुटीची भीती. पण, नंतर तरी या आमदारांना मोकळे सोडायला नको का? आणि या आमदारांचेही आश्चर्यच वाटते. त्यांनाही दावणीला बांधून ठेवणे आवडत असावे. एकाही आमदाराचा स्वाभिमान जागृत नसेल का? जाऊ द्या. कशाला कुणाच्या पाठीच्या कण्याची गोष्ट करायची? उगाचच मनाला लावून घेतील बिचारे. तर, असा हा एवंगुणविशिष्ट शपथविधी समारंभ पार पडला आहे. स्वाभिमानाच्या गप्पा हाकत, लाचारीचे इतके ओंगळवाणे प्रदर्शन करत पार पडलेला हा शपथविधी कार्यक्रम महाराष्ट्राच्या इतिहासात कोरला (कुठल्या अक्षरांनी ते संजय राऊतांना विचारावे लागेल) जाईल, हे मात्र नक्की!