जेठालालसाठी परत येणार दयाबेन!

    दिनांक :30-Nov-2019
|
मुंबई,
'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत दयाबेनची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी सप्टेंबर २०१७ पासून या मालिकेपासून दूर आहे. मॅटर्निटी लीववर गेल्यानंतर काही महिन्यांनी मालिकेत पुन्हा यायला नकार दिला. आतापर्यंत अनेकदा दिशा मालिकेत परतणार असल्याची बातमी समोर आली. पण, त्यात तथ्य नसल्याचे तिने वेळोवेळी स्पष्ट केले. आता पुन्हा एकदा दिशा मालिकेत परत येण्याची चर्चा सुरू झाली आहे.
 

 
असे म्हटले जाते की, दिशा एका भागासाठी मालिकेत परत येऊ शकते. या भागात दयाबेन पती जेठालालसोबत व्हिडिओ कॉलवर बोलताना दिसेल. येत्या भागात बागा, जेठालालला त्याच्या स्वप्नाबद्दल सांगतो. जेठालाल आजारी पडून अंथरुणाला खिळल्याचे स्वप्न बागाला पडतं. तसेच त्याचे स्वप्न नेहमीच खरे होतं असही तो जेठालाल सांगतो.
अशा परिस्थितीत जर दयाबेन त्याच्यासोबत असती तर बरं झालं असतं, असा विचार जेठालालच्या मनात येतो. जर बागाचे हे स्वप्न खरं होणार असेल तर प्रेक्षक दयाबेनला पुन्हा एकदा पाहू शकतात. तसेच चाहत्यांना बागाचे स्वप्न हे दयाबेनच्या कमबॅकची चाहूल असल्याचे वाटत आहे.