'मर्दानी'साठी राणीने घेतले स्विमिंगचे धडे

    दिनांक :30-Nov-2019
|
मुंबई,
सध्या 'मर्दानी २' ये चित्रपटामुळे अभिनेत्री राणी मुखर्जी चर्चेत आहे. तिने चित्रपटासाठी अनेक साहसी दृश्ये केली आहेत. पण, मर्दानी २ मधील एका साहसी दृश्यामुळे राणीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 'मर्दानी-२'साठी तिला एक पाण्याखालचे दृश्य करायचे होते. या प्रसंगाशिवाय चित्रपट पूर्ण होणारच नव्हता. पण, राणीला असलेल्या पाण्याच्या भीतीमुळे ती हे दृश्य चित्रीत करण्यासाठी तयारच होत नव्हती. दिग्दर्शकांनी समजवल्यानंतर तिने भीतीवर मात करत हे चित्रीकरण पूर्ण केले.
 

 
'मर्दानी-२' मधील एका प्रसंगाचे चित्रीकरणासाठी राणीला ३० फुट खोल पाण्यात उतरून शूटिंग करायची होती. 'जेव्हा दिग्दर्शक गोपी यांनी पहिल्यांदा मला हे सांगितले तेव्हा मला खूप भीती वाटली. कारण पोहता येत नसल्यामुळे मला पाण्याची भीती वाटते. मी अनेकदा दिग्दर्शकांना तो प्रसंग काढून टाकण्याची विनवणी केली पण त्यांनी माझे काही एक ऐकले नाही. अखेर मीच पोहण्याचे योग्य ते प्रशिक्षण घेऊनच ते दृश्य चित्रीत केले. हा प्रसंग एका ३० फूट खोल जलतरण तलावामध्ये चित्रीत करण्यात आला आहे.' असे राणीने म्हटले आहे.
'मर्दानी'साठी राणीने खास मेहनतही घेतली आहे. 'मर्दानी २' चित्रपटाचे चित्रीकरण राजस्थानमध्ये झाले. या चित्रीकरणावेळी तिथे तापमान जवळपास ४३ डिग्री सेल्सियस होते. एवढ्या प्रखर ऊन्हात शूटिंग करताना सगळ्यांचीच दमछाक होते. पण, राणी मात्र कंटाळली नाही. एक दृश्य ती दोन ते तीन वेळा चित्रित करण्याची तिची तयारी तिनं दर्शवली होती. तिची ही मेहनत पाहून सगळेच चकीत झाले होते.