अमरावतीत दुचाकीस्वार चोरट्यांचा हैदोस; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

    दिनांक :04-Nov-2019
अमरावती,
अमरावती शहरात भर दिवसा दोन तर रात्रीच्या सुमारास एक अशा एकूण तीन लुटमारीच्या घटना आज उघडकीस आल्या. तिनही घटनांमध्ये दुचाकीवरुन आलेल्या भामट्यांनी तीन लाख लंपास केले. या घटनांमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. 

 
 
पहिली घटना बडनेरा मार्गावर असलेल्या नेमाणी गोडावून जवळ रविवारी रात्री घडली. महेश बेलदाणी रा. सिंधी कॅम्प बडनेरा हे नेहमीप्रमाणे डेली कलेक्शनचे पैसे घेवून एमएच 27-2288 क्रमांकाच्या दुचाकीने बडनेराकडे जात होते. गोडावूनजवळ काळ्या रंगाच्या पल्सर गाडीवर तीन युवक पाठीमागुन आले. त्यापैकी एकाने बेलदाणी यांच्या डोक्यावर दगड मारला. त्यामुळे ते खाली पडले. खाली पडताच या तिनही भामट्यांनी त्यांच्या जवळील काळ्या रंगाची बॅग हिसकावून घेतली व पळ काढला. या बॅगमध्ये जवळपास दीड लाख रुपये होते. घटनेनंतर घाबरलेले बेलदाणी मार्गावून जाणार्‍या काही व्यक्तिंच्या मदतीने बडनेरा पोलिस ठाण्यात पोहोचले. त्यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे.
 
 
दुसरी घटना सोमवारी दुपारी शहरातल्या बस स्टॅन्ड मार्गावरील उस्मानिया मस्जीद समोर घडली. ऑटोत बसलेल्या दिव्यांग व्यक्तीचे एक लाख दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी पळविले. शामराव कुरवाडे (60) रा. हिवरखेड, मोर्शी असे पैसे लंपास झालेल्या व्यक्तिचे नाव आहे. त्यांचा एका अपघातात एक हात पूर्णत: निकामी झाला आहे. त्याच्याच नुकसान भरपाईपोटी त्यांना पाच लाख रूपये मिळाले होते. त्यापैकी एक लाख रूपये काढण्यासाठी ते राजापेठ परिसरातील बँकेत आले होते. एक लाख रूपये बॅगेत ठेवून ते सोमवारी दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास ऑटोत बसून मुख्य बस स्थानकाकडे निघाले. ऑटो उस्मानिया मस्जिदजवळ आला असता अज्ञात दुचाकीस्वारांनी ती बॅग हिसकावून पळ काढला. याप्रकरणी शहर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
 
 
तिसरी घटना सोमवारी दुपारीच मालवीय चौकात घडली. एस. के. टायर येथे कार्यरत असलेले राजेश कोरडे आपल्या एका सहकार्‍याला घेवून नागपूर नागरी सहकारी बँकेत पैसे भरण्यासाठी जात होते. दुचाकीवरुन बँकेकडे निघाले असतांना मार्गात येस बँकेसमोर दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी त्यांना धक्का दिला, त्यामुळे कोरडे व त्याचा सहकारी दुचाकीवरुन खाली पडले. त्यांच्याजवळ असलेली बॅग त्या अज्ञातांनी हिसकावुन पळ काढला. त्या बॅगमध्ये 50 हजार रुपये होते. घटना घडताच खळबळ उडालली. पोलिसांना माहिती देण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. तिनही घटनांमध्ये दुचाकीस्वारच लुटमार करणारे आहे, त्यामुळे घटलेल्या तिनही घटनांमध्ये सहभागी असणारे आरोपी एकच असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.