दिल्लीच्या प्रदुषणावर अर्जुन रामपालची प्रतिक्रिया

    दिनांक :04-Nov-2019
दिल्ली शहर आणि राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रात हवेच्या प्रदूषणामुळे श्वास घेणेदेखील मुश्कील झाले आहे. येथे वायुप्रदूषणाची स्थिती इतकी खालावली की पर्यावरण प्रदूषण नियंत्रण प्राधिकारणाने संपूर्ण दिल्ली परिसरात आरोग्य आणीबाणी जाहीर करावी लागली. या वायुप्रदूषणाविरोधात बॉलिवूड अभिनेता अर्जून रामपाल याने आवाज उठवला आहे. त्याने “दिल्लीच्या हवेत आता श्वास घेणे शक्य नाही” असे म्हटले आहे.
 
 
 
अर्जून रामपाल आपल्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी शनिवारी दिल्ली येथे गेला होता. परंतु तेथे हवा प्रदूषणाची गंभीर समस्या उद्भवली आहे. “मी आत्ताच दिल्ली येथे पोहोचलो. या शहराने प्रदूषणाची कमाल पातळी गाठली आहे. येथे आता श्वास घेणे देखील शक्य नाही. जागं होण्यासाठी अजून कोणत्या अनर्थाची वाट पाहताय. आता काहीतरी ठोस पावले उचला आणि दिल्ली वाचवा.” अशा शब्दात अर्जून रामपाल याने ट्विट करुन दिल्लीतील प्रदूषणावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
 
 
हवेची गुणवत्ता सरासरी ०-५० इतकी असेल तर हवेची गुणवत्ता श्रेणी उत्तम मानली जाते. ५१-१०० ही श्रेणी समाधानकारक, १०१-२०० मध्यम, २०१-३०० घातक, ३०१-४०० अत्यंत घातक, ४०१-५०० अत्यंत गंभीर अशा श्रेणीमध्ये हवेतील प्रदूषणाची स्थिती मोजली जाते. शुक्रवारी दिल्लीत हवेची गुणवत्ता सरासरी ५०० हूनही अधिक म्हणजेच अत्यंत गंभीर या श्रेणीत होती. वायुप्रदूषणामुळे काळवंडलेल्या दिल्लीत काही फुटांपलीकडे दिसत नव्हते. दृश्यमानता कमी झाल्याने भर दुपारीदेखील वाहनाचालकांना दिवे लावून कार चालवाव्या लागत होत्या. सामान्य दिल्लीकरही मास्क लावून घराबाहेर पडलेले होते.