आगामी चित्रपटाची ऐश्वर्याला उत्सुकता

    दिनांक :04-Nov-2019
 
 
 
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सध्या काय करतेय, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. खरं तर ‘जज्बा’ आणि ‘फन्ने खान’ हे चित्रपट केल्यानंतर ऐश्वर्या राय लगेचच पुढच्या चित्रपटांना सुरुवात करणार, असं बोललं जात होतं. मात्र, ऐश्वर्यानं हे चित्रपट होल्डवर ठेवल्याचं, तर काही चित्रपटांतून अंग काढून घेतल्याची चर्चा आहे. नुकताच तिनं तिचा वाढदिवस साजरा केला. इटली इथं एका कार्यक्रमाला गेलेल्या ऐश्वर्यानं वाढदिवशी पालकांना धन्यवाद देणारी पोस्ट केली, मात्र तिनं चित्रपटांबद्दल चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देणं टाळलं. काहीच दिवसांपूर्वी ऐश्वर्यानं मणिरत्नम् यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ हा चित्रपट स्वीकारला. त्याची अधिकृत घोषणाही करण्यात आली. या चित्रपटात ती नकारात्मक भूमिकेत दिसणार असल्याचं बोललं जातंय. या चित्रपटाचं कामही सुरू झालं आहे. मध्य प्रदेशात त्याचा बहुतांश भाग चित्रित होणार आहे. ऐतिहासिक चित्रपट असल्यानं ऐश्वर्याच्या पेहराव आणि लूकवर सध्या टीम काही संशोधन करतेय. ऐश्वर्या लवकरच या चित्रपटाच्या सेटवर दाखल होणार आहे. दुसरीकडे ती आणि तिचा पती अभिषेक बच्चन हे दोघंही अनुराग कश्यपच्या आगामी चित्रपटात दिसणार अशी बातमी आली. आता या दोघांनीही हा चित्रपट सोडल्याची चर्चा आहे. त्याचं कारण मात्र कळलेलं नाही. दिग्दर्शकद्वयी अब्बास-मस्तान हे ‘रात और दिन’ या गाजलेल्या चित्रपटाचा रिमेक करणार होते. त्यातही ऐश्वर्याची वर्णी लागल्याचं बोललं जात होतं. प्रत्यक्षात हा चित्रपटही डब्यात गेल्याचं समजतंय. त्यामुळे ऐश्वर्याच्या चाहत्यांना आता मणिरत्नम् यांच्याच चित्रपटातून तिचं मोठ्या दर्शन घडणार असं दिसतंय.