चाहत्यांच्या हृदयात माधुरीची 'ही' भूमिका आहे खास

    दिनांक :04-Nov-2019
बॉलिवूडमध्ये ‘धक धक’ गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या माधुरी दीक्षितच्या ९० च्या दशकातील ‘परिंदा’ चित्रपटाला रविवारी ३० वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने माधुरीने तिच्या टि्वटर हॅण्डलवर ‘परिंदा’ चित्रपटाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. माधुरी दीक्षितसाठी ‘परिंदा’ चित्रपट आजही खास आहे. त्यात तिने ‘पारो’ ही एका सशक्त स्त्रीची व्यक्तिरेखा साकारली होती. आजही माधुरी या चित्रपटाबरोबर भावनात्मक दृष्टया जोडलेली आहे.

 
 
‘पारो’च्या भूमिकेला आजही माधुरीच्या हृदयात विशेष स्थान आहे. माधुरीने तिच्या टि्वटर हॅण्डलवर या चित्रपटातील ती शाळेतील मुलांना शिकवत असल्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. परिंदा चित्रपटाला ३० वर्ष झाली पण आजही माझ्या ह्दयात पारोचे विशेष स्थान आहे. त्या दिवसांमध्ये एका सशक्ती स्त्री व्यक्तीरेखेची भूमिका साकारणे माझ्यासाठी आनंद देणारा अनुभव होता. अनिल कपूर, जॅकी श्रॉफ आणि विधू विनोद चोप्रांसोबत काम करायला मिळणे हा खरोखरच सुंदर अनुभव होता असे माधुरीने तिच्या टि्वटरवरील संदेशात म्हटले आहे.
‘परिंदा’ हा ९० च्या दशकातील गँगवॉरवर आधारीत चित्रपट होता. यामध्ये किशन (जॅकी श्रॉफ), करण (अनिल कपूर), पारो (माधुरी दीक्षित), अण्णा (नाना पाटकेर) यांच्या मुख्य भूमिका होत्या. किशन म्हणजे जॅकी श्रॉफ गुन्हेगारी विश्वात प्रवेश करतो. तो अण्णासाठी काम करायचा. किशन करणला (अनिल कपूर) गुन्हेगारी विश्वासपासून दूर ठेवतो. त्याला शिक्षणसाठी अमेरिकेत पाठवतो. करण भारतात परतल्यानंतर पुन्हा पारोच्या संपर्कात येतो.
या सर्व व्यक्तिरेखा लहानपणापासूनच परस्परांना ओळखत असतात. किशन करणला गुन्हेगारी विश्वापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो पण करण सुद्धा गुन्हेगारीकडे वळतो. एकूणच या चित्रपटाचे कथानक आणि सर्वांच्याच भूमिका लक्षवेधी ठरल्या होत्या. नाना पाटेकरने सुंदर खलनायक रंगवला होता. ३ नोव्हेंबर १९८९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.