स्वच्छ-सुंदर-प्रदूषणमुक्त डलहौसी..!

    दिनांक :05-Nov-2019
पल्लवी जठार-खताळ
 
 
हिमाचल या राज्याला देवभूमी असेच संबोधले जाते. येथील अनेक सुंदर सुंदर ठिकाणे पर्यटकांसाठी आनंदाचा आगळा ठेवा घेऊन सज्ज झालेली आहेतच. त्यातीलच एक आहे डलहौसी. स्वच्छ-सुंदर-प्रदूषणमुक्त हवा. बर्फाच्छादित डोंगररांगा, स्वच्छ पाण्याचे अनेक झरे, चोहीकडे नजर जाईल तेथपर्यंत पसरलेले हिरवे गालिचे, हिमनद्यांनी परिपूर्ण असे हे स्थळ आवर्जून एकदा तरी पाहावे असेच आहे. 

 
 
 
समुद्रसपाटीपासून 2700 मीटर उंचीवरचे हे स्थळ, 1854 साली भारतात असलेल्या लॉर्ड डलहौसी यांच्यामुळे प्रसिद्ध झाले. पाच पहाडांवर बसलेले हे गाव सेंट अॅन्ड्र्यू, सेंट पेट्रिक, सेंट फ्रान्सिस, सेंट जॉन अशा अनेक चर्चेसमुळेही प्रसिद्ध आहे. राजा भुरी याने 1908 साली दान केलेले संग्रहालय हे याचे आणखी एक वैशिष्ट्य. येथील चित्रे आवर्जून न्याहाळावीत अशीच. राजा उमेदसिंह यांनी बांधलेला रंगमहाल हा मुघल आणि ब्रिटिश वास्तुकलेचा मेळ असलेला सुंदर महाल म्हणजे वास्तुकलेचा उत्तम नमुनाच आहे. येथील भिंती पंजाबी शैलीतील चित्रांनी सजविल्या गेल्या आहेत. त्यात कृष्णजीवन रेखाटले गेले आहे.
 
 
येथील सर्वात जुन्या माऊंट व्ह्यू हॉटेलला भेट देणेही गरजेचेच, बरं का. हे हॉटेल 119 वर्षे जुने आहे. 1895 साली बांधले गेलेले हे हॉटेल तेव्हापासून ते आजतागायत एकाच कुटुंबाकडे आहे आणि आजही ते उत्तम स्थितीत सांभाळले गेले आहे. डलहौसीपासून जवळच असलेल्या खज्जियार या ठिकाणी बशीच्या आकाराचे सुंदर तळे पाहायला मिळते. खज्जिआरला जाणारा रस्ता वळणावळणाचा आणि बर्फाच्छादित डोंगरातून जाणारा अतिशय मनोहर असा आहे. खुद्द खज्जियारमध्ये मात्र चोहोबाजूंनी हिरवळीने मढलेले डोंगर आणि मधोमध हे तळे निसर्गसौदर्याची निराळीच अनुभूती डोळ्यांना देते.
 
 
मार्च ते जून हा येथला खरा पर्यटन मोसम असला, तरी पर्यटक ऐन थंडीत येथे जाण्यास अधिक पसंती देताना दिसतात. त्यामुळे बर्फवृष्टीचा आनंद उपभोगता येतो. पठाणकोटपासून विमानसेवा, रस्तामार्गेही डलहौसीला जाता येते.