मुंबईकर गोपेंद्र बोहरा ओमानच्या राष्ट्रीय क्रिकेट संघात

    दिनांक :05-Nov-2019
मुंबई,
अथक मेहनत, जिद्द आणि क्रिकेटविषयी असणारं प्रेम या जोरावर डोंबिवलीच्या गोपेंद्र बोहरा या तरुणाने थेट सातासमुद्रापार झेप घेतली आहे. नोकरीनिमीत्ताने ओमानला गेलेल्या गोपेंद्र बोहराची ओमानच्या राष्ट्रीय क्रिकेट संघात निवड झालेली आहे. त्याच्या या कामगिरीमुळे सध्या डोंबिवलीत त्याच्या घरात आणि मित्र-परिवारामध्ये आनंदाचं वातावरण आहे.
 
 
 
गोपेंद्रला लहानपणापासून क्रिकेटची प्रचंड आवड होती. रुपारेल महाविद्यालयात शिक्षण घेत असताना गोपेंद्र शिवाजी पार्क परिसरात सतत गोलंदाजीचा सराव करायचा. त्याने कधीही सरावाचा कंटाळा केला नाही, त्याचंच फळ गोपेंद्रला मिळालं असल्याचं त्याचे मित्र सांगतात. डोंबिवलीत स्थानिक क्रिकेट सामन्यांमध्ये खेळत असतानाही गोपेंद्रने आपली चमक दाखवून दिली होती.
 
डोंबिवली बॉईज, JBCC, आर्णी व्हिक्टरी स्पोर्ट्स, जय XI अशा स्थानिक संघाचं गोपेंद्रने प्रतिनीधीत्व केलं होतं. केवळ मेहनतीच्या जोरावर गोपेंद्रने मिळवलेलं हे यश नक्कीच वाखणण्याजोगं आहे. त्यामुळे आगामी काळात डोंबिवलीचा गोपेंद्र ओमानच्या संघाकडून कसा खेळ करतो याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.