अधू दृष्टीचा...?

    दिनांक :05-Nov-2019
एका अग्रलेखावरून एखादा माणूस इतका अस्वस्थ होईल की महाराष्ट्रातील आघाडीच्या वृत्तपत्रांची नावंही विस्मरणात जातील, असे आम्हाला कधीही वाटले नव्हते. वेताळाने प्रश्र्न विचारले आणि विक्रम त्यावर उत्तर देत राहिला. कारण, तो वचनांना जागणारा होता. आज महाराष्ट्राची जनता विक्रमाच्या रूपाने प्रश्र्न विचारतेय्‌ आणि त्याची उत्तरे देणं सोडून आपलं अज्ञान प्रगट करण्याचे काम कुणी करीत असेल तर ते खरंच दुर्दैवी आहे. आता यांच्या 175 आमदारांच्या पाठिंब्यावर खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रश्र्नचिन्ह उपस्थित केले आहे. ही संख्या यांनी कशी आणि कुठून आणली, असा प्रश्र्न त्यांनी दिल्लीत उपस्थित केला आहे. दिल्ली आणि बिहारच्या होऊ घातलेल्या आणि आगामी काळात होणार्‍या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुका लढवायच्या असल्याने काँग्रेस कदापिही पाठिंबा देणार नाही, हे ठावूक असतानाही पवार ‘10, जनपथ’च्या घिरट्या घालत राहतील. त्यांचा उद्देश स्पष्ट आहे. शिवसेनेला ताटळकत ठेवणे आणि त्यातून भाजपासोबत त्यांचा दुरावा आणखी वाढवत ठेवणे हे एखाद्या चाणाक्ष राजकारण्याच्या लक्षात येऊ शकते, तर ‘क्राईम रिपोर्टर’पासून ते संपादक झालेल्यांच्या लक्षात का येऊ नये? राजकीय नेत्याने जरी भावनिक विचार केला तरी संपादकाने तो तसा कधीच करायचा नसतो. संपादक हा एकप्रकारे लोकप्रतिनिधी आहे. तो त्याच्या वृत्तपत्राच्या वाचकसंख्येचे प्रतिनिधित्त्व करीत असतो. त्यांची जनभावना टिपणे आणि ती सत्ताधार्‍यांकडून पूर्ण करवून घेणे, हे संपादकांचे आद्यकर्तव्य असते आणि ते तसे असलेही पाहिजे. 

 
 
 
तरीही ‘यांचे’ अस्वस्थ होणे आम्ही समजू शकतो. त्यातून काही तरी उत्तर द्यायचे म्हणून एखाद्या वर्तमानपत्राचे नाव ठावूक नाही, असे म्हणणेही समजू शकतो. पण, असे उत्तर देताना आपण एका पक्षाचे प्रवक्ते आहोत, याचे भानही त्या व्यक्तीला राहू नये, असे कसे होऊ शकते? हा तर असा प्रकार झाला की, राज्यात नवीन सरकार बनविण्यासाठीचे प्रयत्न करायचे आणि नेमक्या कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, हेच ठावूक नसायचे. राज्यात भाजपा वगळता कोणत्याच समीकरणाची जुळवाजुळव होऊ शकत नाही, हे जर एखाद्या शेंबड्या पोराला समजत असेल, तर ते यांना का कळू नये? वेळ अजूनही गेली नाही. जनादेशाचा सन्मान करण्याची जबाबदारी जशी भाजपाची आहे, तशीच शिवसेनेची सुद्धा आहे. जनादेशाचा अर्थ हा या दोन्ही पक्षांनी समजून घेतला पाहिजे. आणि ज्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला पुढे आणलेे, त्यांचीच आयुष्याची कमाई मातीमोल करण्याची तयारी जर कुणी करीत असेल, तर महाराष्ट्रातील सामान्य शिवसैनिक हे कदापिही सहन करणार नाही.
 
 
राजकीय पक्षाचा प्रवक्ता म्हणून जर आपल्याला नागपूरचा 93 वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेला 'तरुण भारत' माहिती नसेल, तर आपल्याला प्रवक्ता म्हणून नेमणार्‍या नेत्याचा आपण अपमान करतोय्‌, याचे तरी किमान भान त्यांनी ठेवले पाहिजे. प्रत्येक वेळी पक्ष प्रमुखांना अडचणीत आणण्याचा चंगच त्यांनी बांधला आहे की काय, अशी शंका अधिक दृढ व्हावी, असेच त्यांचे वागणे दिसते आहे. तरुण भारत माहिती नसेल तर मग यांना ग. त्र्यं. माडखोलकर माहिती असण्याचा प्रश्र्नच निर्माण होत नाही. कालच्या अग्रलेखात आम्ही तीन प्रश्र्न उपस्थित केले होते. एक शिवसेनेच्या शेतकर्‍यांप्रतीच्या प्रेमाचा, दुसरा राम मंदिराचा आणि तिसरा मराठी बाण्याचा. आज चौथा प्रश्र्न उपस्थित करतोय, संयुक्त महाराष्ट्राप्रती असलेल्या त्यांच्या भूमिकेचा. ग. त्र्यं. माडखोलकर हे किमान त्या भूमिकेसाठी तरी धृतराष्ट्राला ठावूक असतील, असे आम्हाला कालपर्यंत वाटत होते. पण, सत्तेच्या हव्यासापोटी आता संयुक्त महाराष्ट्राच्या भावनेलाही तिलांजली द्यायला तुम्ही निघालात काय, असा प्रश्र्न आम्ही त्यांना थेट विचारत आहोत.
 
 
तरुण भारत माहिती नाही, असे सांगून एकप्रकारे आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे महाराष्ट्रासमोर प्रदर्शन करणार्‍या स्वयंघोषित अनुभवी पत्रकाराचे अभिनंदनच करावे लागेल. पण तभा म्हणजे तरुण भारत हे अवघ्या महाराष्ट्राला ठावूक आहे. राष्ट्रीय बाण्याच्या ‘तरुण भारता’चं स्थान कधीही ढळणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.
 
 
‘तरुण भारत’ काय आहे आणि काय नाही, हे सर्वांनाच ठावूक आहे. त्यामुळे धृतराष्ट्राकडून प्रमाणपत्राची तर आम्ही मुळीच अपेक्षा करीत नाही. प्रश्र्न साधे आणि सोपे असतात. त्याचे उत्तर देता आले नाही की, विषय फिरवायचे असतात, हे तुमच्याकडूनच शिकण्यासारखे आहे. तरुण भारतची भूमिका अतिशय सुस्पष्ट आहे. जे प्रश्र्न महाराष्ट्राच्या मनात आहेत, तेच आम्ही विचारले आहेत. शेतकरी संकटात असताना राज्याला स्थिर सरकार नको का? राम मंदिराचा निकाल येत असताना राज्याला स्थिर सरकार नको का? आणि या प्रश्र्नांची उत्तरं शिवसेनेला द्यावीच लागतील. ही उत्तरं देण्यात धृतराष्ट्र असमर्थ असतील, तर आता पक्षप्रमुखांना त्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. ही उत्तरं ‘तरुण भारत’ला नको आहेत. त्याची उत्तरं महाराष्ट्राच्या जनतेला हवी आहेत.
 
 
आज महाराष्ट्राला जागणार्‍या विक्रमाकडे संपूर्ण राज्य आतुरतेने पाहतेय. धृतराष्ट्राच्या मागे फरफटत न जाता आपल्या उत्तरदायित्त्वाचे निर्वहन अधिक महत्त्वाचे आहे आणि असलेही पाहिजे. अनेक दरबारींमुळे राज्यात समस्या निर्माण होतात. पण, राजाला हस्तक्षेप करावाच लागतो. दरबारी राज्य चालवित असेल तर राजाच्या क्षमतेवर प्रश्र्नचिन्ह निर्माण होतं आणि ते शिवसेना पक्षप्रमुख, उद्धवजींच्या बाबतीत झालेले शिवसैनिकांना कदापिही आवडणार नाही. आज प्रकर्षाने आठवण होतेय्‌ ती बाळासाहेबांची. स्व. बाळासाहेब असते तर त्यांनी कधीही असे होऊ दिले नसते. आम्ही ती सुद्धा शिवसेना पाहिलीय्‌, जेव्हा स्व. बाळासाहेब सांगत, तो अंतिम शब्द असे. चर्चेत कुणीही धृतराष्ट्र नसत. स्व. अटलजी, स्व. प्रमोदजी, स्व. गोपीनाथजी आणि बाळासाहेब यांचे घट्ट ऋणानुबंध होते. ते कधीही सत्तेसाठी नव्हते, तर हिंदुत्वाचे बंध होते. नाते विचारांचे असते, ते सत्तेचे कधीही नसते. नाते त्यागाचे असते, ते स्वार्थाचे कधीच नसते. नाते प्रेमाचे असते, ते द्वेषाचे कधीही नसते. हाच वारसा देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी पुढे चालवावा, हीच आज संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा, आकांक्षा आणि अपेक्षा आहे आणि म्हणून आम्ही ती प्रकर्षाने मांडत आहोत. राज्यातील जनतेला नुसत्या भाजपाचे सरकार नको आहे. त्यांना महायुतीचे सरकार हवे आहे. कारण, तोच त्यांनी निवडणुकीत दिलेला कौल आहे. या जनादेशाचा सन्मान करणे, ही या दोन्ही पक्षांची कथनी आणि करणी असली पाहिजे. कारण, हा केवळ जनादेशाचा नव्हे तर लोकशाहीचा सुद्धा सन्मान असणार आहे. असे झाले नाही, तर ‘विनाशकाले विपरित बुद्धी’चा दोष माथी मारून घेण्याच्या पलीकडे शिवसेनेकडे काहीही उरणार नाही.