अभिनेत्री विद्या बालनकडे आहेत तब्बल आठशे साड्या

    दिनांक :05-Nov-2019
मुंबई,
'परिणीता'मधील तिचा निरागसपणा असो किंवा 'कहानी'मधील निर्भीडपणा...अभिनेत्री विद्या बालनचं कौतुक नेहमीच होतं. तिच्या सौंदर्याची जितकी चर्चा होते तितकीच चर्चा होते ती विद्याच्या कपड्यांची... तिचे ड्रेसेस, फॅशनेबल साड्या नेहमी चर्चेत असतात. साडीचं वेड असणाऱ्या विद्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या तब्बल आठशे साड्या आहेत असा खुलासा अलीकडेच करण्यात आला आहे.

बॉलिवूडच्या पार्टीसाठी जायचं असो किंवा पुरस्कार सोहळ्यासाठी अभिनेत्री विद्या बालन नेहमीच सुंदर साड्यांमध्ये हजेरी लावताना दिसते. साडीमध्ये तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं असं तिचे चाहते नेहमीच म्हणतात. विद्याचं हे साडी प्रेम पाहून अलीकडेच एका मुलाखतीत तिच्याकडे नेमक्या किती साड्या आहे असा प्रश्न तिला विचारण्यात आल्या. त्यावेळी वेगवेगळ्या प्रकारच्या तब्बल आठशे साड्या तिच्या कपाटात असल्याचं विद्यानं सांगितलं. शिवाय, त्यात भर पडत असतेच असंही ती म्हणाली. कुठल्याही कार्यक्रमाला जाताना ती लक्षपूर्वक साडीची निवड करत असते. साडीमध्ये ती ज्या कार्यक्रमांना जाते, तिथे तिचे त्या लूकमधले फोटोही चर्चेत असतात.
'ई-टाइम्स' दिलेल्या एका मुलाखतीतही विद्या तिच्या साडी प्रेमाविषयी भरभरून बोलली होती. 'माझा जन्मच साडी नेसण्यासाठी झाला आहे' असं ती म्हणाली होती. 'मी आयुष्यभर साडी नेसून फिरू शकते, मी साडी नेसून जगू शकते. माझा जन्मच त्यासाठी झाल आहे असं मला वाटतं. त्यामुळे मला जेव्हा संधी मिळेल त्यावेळी मी साडी नेसते.' असं विद्या म्हणाली होती.
दरम्यान, विद्याचा 'मिशन मंगल' सुपरहिट ठरला. ‘मिशन मंगल’ या चित्रपटात शास्त्रज्ञाची भूमिका साकारल्यानंतर विद्या सध्या शकुंतला देवी यांच्यावर आधारित चरित्रपटात काम करतेय. त्यानंतर ती आता एका अॅक्शन कॉमेडीपटात झळकणार आहे. दिग्दर्शक आनंद एल. राय हे ‘झिरो’ चित्रपटाच्या अपयशानंतर आता अॅक्शन कॉमेडी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या चित्रपटासाठी त्यांना विद्या बालन आणि कतरिना कैफ ही जोडी हवी आहे. मात्र, या चित्रपटाची निर्मिती ते करत असून दिग्दर्शनाची सूत्र अनिरूद्ध गणपती यांच्याकडे सोपवली जाणार असल्याची चर्चा आहे.