इजिप्तमध्ये चित्रित झालेला पहिला कोकणी चित्रपट

    दिनांक :05-Nov-2019
कोकणी भाषेतील ‘जाना माना’, ‘आ वै जा सा’ हे यशस्वी चित्रपट देणारे डॉक्टर रमेश कामथ यांचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘अप्सरा धारा’ असे असून हा पहिला कोकणी चित्रपट आहे ज्याचे चित्रीकरण परदेशात झाले आहे. त्यामुळे चित्रपट सध्या चर्चेत आहे.
 
 
 
‘अप्सरा धारा’ या चित्रपटाचे चित्रीकरण इजिप्तमध्ये झाले आहे. तसेच चित्रपटात मंगलोर येथील सार्थक शेणॉय आणि स्वाती भट हे बाल कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात बंगलोरचे सुप्रसिद्ध व्यावसायिक उद्योजक डॉक्टर दयानंद पै ‘दयानंद’ ही एक खास भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटात काही थ्रीडी दृश्ये देखील चित्रीत करण्यात आली आहे. ‘यशाला कधीच शॉर्टकट नसतो’, असा संदेश अधोरेखित करणारा हा चित्रपट मुलांसाठी आणि पालकांसाठी प्रेरणादायी चित्रपट ठरणार आहे.
बहुभाषिक चित्रपट कलावंत गोपीनाथ भट हे या चित्रपटात ग्राम प्रमुखाची भूमिका साकाराणार असून सुप्रसिद्ध नाट्यकलावंत पी रोहिदास नायक हे आदर्श शिक्षक ‘पिंटो’ ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत. दगडाचे सोन्यात रूपांतर करणाऱ्या परिकथेचा रहस्यमय घटक सुद्धा या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाची कोलकता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ‘बाल चित्रपट ‘विभागासाठी निवड करण्यात आली आहे. हा चित्रपट बालदिनाच्या निमित्ताने १४ नोव्हेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.