बर्थडे सेलिब्रेशनसाठी अनुष्का आणि विराट भूतानमध्ये

    दिनांक :05-Nov-2019
नवी दिल्ली,
विराट कोहलीचा ३१ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी अनुष्का शर्मा आणि विराट भूतानला पोहचले आहेत. हे दोघही भूतानमध्ये ट्रेकिंगचा आणि निसर्गाचा आनंद घेत आहेत. येथील दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, या स्टार कपलला मनाला भिडणारा अनुभव आला. या संपूर्ण अनुभवाची कहाणी अनुष्का शर्माने सोशल मीडियावर शेअर केली आहे. अनुष्काने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती आणि विराट एका कुटुंबासमवेत बसून हसताना दिसत आहेत. फोटोचे कॅप्शन लिहिताना, अनुष्काने संपूर्ण कहाणी सांगितली आहे.
 
 
'आज ८.५ किलोमीटर ट्रेकिंग केल्यानतंर आम्ही एका छोट्याशा गावाजवळ पोहचलो. या गावात आम्हाला चार महिन्यांपूर्वी जन्मलेल्या वासराला पाहण्याची आणि त्याला खायला देण्याची संधी मिळाली. तेव्हा घराच्या मालकाने आम्हाला विचारले की, तुम्ही कंटाळले आहात, तुम्हाला एक कप चहा पिणे आवडेल का?. या निमंत्रणावरून आम्ही त्यांच्या सुंदर घरात गेलो आणि प्रेमळ कुटुंबाला भेटलो. त्याना आम्ही कोण आहोत याबद्दल काहीच कल्पना नव्हती. असे असूनही, त्यानी आम्हाला प्रेम आणि आपुलकी दिली. आम्ही या कुटूंबासमवेत थोडा वेळ घालवला आणि चहा पिताना गप्पा मारल्या. आम्ही दोन लोक ट्रेकिंगकरून थकलो आहोत, एवढेच त्यांना आमच्याबाबत माहिती होती', असे अनुष्काने लिहिले आहे.
 
 
अनुष्काने पुढे लिहिले की, 'जे कोणी मला किंवा विराटला जवळून जाणतात त्यांना हे माहrत असेल की, मला आणि विराटला साध्या-सोप्या पद्धतीने जगायला खूप आवडतं. आम्हाला फार आनंद वाटला की, ते लोक दोन अनोळखी व्यक्तींसोबत किती प्रेमळपणे वागले आणि त्यांना आमच्याकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा नव्हती. या कुटुंबासोबतचा अनुभव आमच्या कायम अंतःकरणाजवळ राहील."