सामाजिक एकतेतून सण, उत्सव, साजरे करा-डॉ. दिलीप पाटील भुजबळ

    दिनांक :06-Nov-2019
|
चिखली,
भारतात लोकशाही व्यवस्था नांदत असल्याने सर्वोच्च न्यायालय हे अंतिम न्यायासन असून सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अयोध्या प्रकरणाचा निर्णयाचा आदर राखणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. एखाद्या प्रकरणी निकाल लागल्यानंतर प्रत्येकाने आपल्या भावना व्यक्त करातांना इतरांच्या भावनांना ठेस पोहचणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी केले आगामी ईद, गुरुनानक जयंती निमीत्ताने स्थानिक चिखली पोलीस स्टेशन च्या वतीने आज बुधवारी पोलीस स्टेशनच्या नुतन वास्तुमध्ये शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक संदिप पखाले, डीवायएसपी रमेश बरकते, तहसिलदार डॉ. अजितकुमार येळे, मुख्याधिकारी अभिजीत वायकोस, चिखलीचे पोलीस निरीक्षक गुलाबराव वाघ आदि मान्यंवर उपस्थित होते.
 
 
पुढे बोलताना ते म्हणाले शांततेतच गावाचा विकास दडला आहे. उपद्रव माजवणाऱ्या लोकांची कोणतीही गय केली जाणार नाही. कायद्याचे व सुव्यवस्था चे भान ठेवून आगामी काळात साजरी होणारी ईद , गुरुनानक जयंती ही सामाजिक एकतेतून पार पडेल असा विश्वास असल्याचे ते म्हणाले .
 
 
याप्रसंगी तालुका संघचालक अरविंद असोलकर, जेष्ठ भाजपा नेते रामदास देव्हडे, भाजपा नगरसेवक पंडीतराव देशमुख, न.प. विरोधी पक्षनेते शे. रफीक, नगर संपर्क प्रमुख सुनिल लाहोटी, नुर इस्लाम मदरशाचे इमाम असद उल्ला शहा यांनी आपले विचार प्रकट केले. यावेळी सर्व मान्यवरांनी अयोध्या प्रकरणाचा निकाल कोणत्याही बाजुने लागला तरी चिखलीच्या शांततामय व गौरवशाली परंपरेचा वातावरणावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही व ईद आणि गुरुनानक जयंती सामाजिक ऐक्यातून पार पडेल याची ग्वाही दिली. यानंतर तहसिलदार डॉ. अजितकुमार येळे , मुख्याधिकारी अभिजीत वायकोस, यांनी सुद्धा आपले मत व्यक्त केले .
 
 
एकंदरीत नेहमीच शहरातील रस्ते, रत्यांवरील खड्डे , विज, पाणीपुरवठा , वाहतुक व्यवस्था इत्यादि विषयांवर गाजणाऱ्या शांतता समितीच्या बैठकीत यावेळी मात्र या बैठकीवर अयोध्या प्रकरणाचे सावट दिसून आले. तर बैठकीत रस्त्यावरील खड्डे सोडून इतर स्थानिक प्रश्नावर चर्चा झाली नाही.