खारवट पाण्याचा वापर

    दिनांक :06-Nov-2019
पिकाला पाणी दिल्यानंतर त्यातील सोडीयम माती कणांच्या पृष्ठभागावर शोषलं जातं. जास्त प्रमाणात सोडीयम जमा झाल्यास जमिनीतील सूक्ष्म भेगा बंद होतात आणि जमिनीत झिरपणारा प्रवाह बंद होतो. जमिनीतील हवेचं प्रमाण नगण्य होतं. माती अत्यंत चिकट बनते. अशी जमीन वाळल्यानंतर अतिशय टणक होते. त्यामुळे उभं पीक एकाएकी पिवळं पडून जळूा लागतं. अशा परिस्थितीत पाणी परिक्षणाद्वारे उपाययोजना करून उपलब्ध खारवट मचूळ पाण्याचा काळजीपूर्वक वापर शक्य आहे. 
 
 
 
खारवट पाणी पिकांना द्यावयाचं आहे, अशा जमिनीचे भौतिक, रासायनिक गुणधर्म, जमिनीची खोली, खनिजांचं प्रमाण, जमिनीचा आम्ल-विम्ल निर्देशांक, धन प्रभारीत आयनांची विनिमय क्षमता या बाबी विचारात घ्याव्या. खारवट पाण्याचा वापर करावयाचा, अशा जमिनीत चांगलं कुजलेलं शेणखत िंकवा कंपोस्ट खत 30 ते 40 टन प्रती हेक्टर टाकावं.
 
 
खारवट पाण्याचं सोडीयम अधिशोषीत गुणोत्तर 20 पेक्षा जास्त तसंच मॅग्नेशियम, कॅल्शियमचे गुणोत्तर तीन पेक्षा जास्त आणि सिलीकाचं प्रमाण जास्त असल्यास पावसाळ्याच्या हंगामात जमिनीत पाणी साठतं. अशा जमिनीत जिप्समचा वापर करून पिकांची संवेदनक्षमता वाढवता येते. अशा जमिनींमध्ये खारट पाण्याचा वापर करताना पिकांची योग्य निवड महत्त्वाची ठरते. त्यासाठी काही बाबी लक्षात घ्याव्या.
 
 
क्षारास प्रतिकार करणारी पिकं - ताग, धैंचा, शुगरबीट, खजूर, नारळ, कापूस इत्यादी.
मध्यम प्रतिकार करणारी पिकं - भात, गहू, ज्वारी, मका, बाजरी, ऊस, सूर्यफूल, अंजीर, डाळिंब, बोर, पपई, कोबी, कांदा. (ही पिके क्षारांना प्रतिकार करतात, पण उत्पादन सरासरीपेक्षा कमी येते.)
संवदेनशील पिकं - सफरचंद, बदाम, आंबा, संत्री, लिंबू, मोसंबी आदी. ही पिकं क्षारयुक्त पाण्यात अपेक्षित उत्पादन देत नाहीत. वारंवार सिंचनामुळे या पिकांची वाढ खुंटते आणि उत्पादन फारच कमी येतं.
ही सर्व महत्त्वपूर्ण माहिती लक्षात घेऊन शेतकर्‍यांनी वेळच्या वेळी पाणी परीक्षण करून घेतल्यास त्याच बरोबर परिक्षणानुसार पिकांची निवड, खत आणि पाणी व्यवस्थापन केल्यास उत्पादनाचे अपेक्षित उद्दीष्ट गाठता येणे शक्य होईल.