शिरना नाल्यात अडकली पट्टेदार वाघीण

    दिनांक :06-Nov-2019
|
भद्रावती, 
तालुक्यातील चारगाव वेकोलि खाण परिसरातील पुलाखाली असलेल्या शिरना नाल्यात एक पट्टेदार वाघीण जखमी अवस्थेत दोन खडकाच्यामध्ये अडकलेल्या स्थितीत आढळून आली. ही घटना बुधवार, 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या वाघिणीने पुलावरून उडी घेतल्याने ती जखमी झाल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला असून, वृत्तलिहेस्तोवर ‘रेस्क्यू ऑपेरशन’ राबवून वाघिणीला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. 
 
 
 
चारगाव हा परिसर वेकोलि कोळसा खाणीचा असून, उत्खननातून निघालेल्या मातीमुळे या परिसरात मोठमोठे ढिगारे तयार झाले आहेत. तसेच येथे घनदाट वृक्षाच्छादन असल्यामुळे या परिसरात वन्यजीवांचा संचार असतो. तसेच या परिसरात वर्धा ही मोठी नदी आहे. तर, शिरना हा छोटासा नाला आहे. त्यामुळे वन्यजिवांना पिण्यासाठी सहज पाणी उपलब्ध होते. या पूलावरून वेकोलि कर्मचारी नेहमीच ये-जा करतात. बुधवारी सकाळच्या सुमारास कर्तव्यावर जाणार्‍या वेकोलि कर्मचार्‍यांना पुलाखालून आवाज आला. त्यामुळे त्यांनी बघितले असता पुलाखाली असलेल्या शिरना नाल्यात एक दोन ते अडीच वर्षे वयाची पट्टेदार वाघीण जखमी अवस्थेत दोन खडकाच्यामध्ये अडकलेल्या स्थितीत त्यांच्या निदर्शनास आली.
 
 
कर्मचार्‍यांनी याबाबतची माहिती माजरी पोलिस व भद्रावती वनविभागाला दिली. माहिती कळताच माजरी पोलिस ठाण्याचे ठाणेदार सदाशिव ढाकणे आपल्या कर्मचार्‍यासह व वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती महेशकर आपल्या कर्मचार्‍यासह घटनास्थळी दाखल झाले. चंद्रपूरवरून बचाव चमुलाही पाचारण करण्यात आले. त्यांनी प्रथम वाघीणीला बघण्यासाठी गोळा झालेल्या जमावाला बाजूला केले. त्यानंतर वाघीण हालचाल करते की नाही, हे तपासण्यासाठी दोन सुतळी बॉम्ब फोडण्यात आले. परंतु, वाघीण जास्त जखमी असल्याने तिने हालचाल केली नाही. रात्रीच्या सुमारास वाघिणीने पुलावरून उडी घेतली असावी, मात्र पुलाची उंची जास्त असल्यामुळे ती खडकाळ जागेवर पडून तिच्या पायाला व कमरेला दुखापत झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी नागपूर येथे फोन करून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर वाघिणीला बाहेर काढण्यासाठी ‘रेस्क्यु ऑपरेशन’ राबविण्यात आले. चंद्रपूरचे क्षेत्रीय वनाधिकारी सोनकुसरे हेसुध्दा घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, दुपारी 2 वाजताच्या सुमारास वाघीण स्वत:हून नाल्याच्या बाहेर निघाली असता, वनविभागाच्या चमूने क्रेनला पिंजरा बांधून तिला त्यात अडकविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती पिंजर्‍याला हुलकावणी देवून पुन्हा नाल्यात गेली. ‘रेस्क्यू‘ चमूद्वारे वाघिणीला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते.