शेेतमाल मार्केटिंगचं तंत्र

    दिनांक :06-Nov-2019
पूर्वी शेतीसह कुठल्याही उद्योग-व्यवसायाचा पाया उत्पादन क्षमता हा होता. परंतु 1990 नंतर भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात प्रचंड वेगाने परिवर्तनाला सुरुवात झाली. पिटर ड्रंकर या व्यवस्थापनामधील गुरुने पूर्वीच सांगून ठेवलं आहे की, उद्योग-व्यवसायाचा पाया उत्पादन नसून मार्केटिंग हा आहे. शेतीबाबतही हे सूत्र लागू होतं. परंतु शेतकर्‍यांनी आजवर मार्केटिंगकडे बर्‍याच प्रमाणात दुर्लक्ष केलं. किंबहुना मार्केटिंगच्या बदलत्या तंत्राचा वेळच्या वेळी अभ्यास केला नाही. परिणामी त्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागले. मार्केटिंग हे सतत फिरत राहणारं चक्र आहे. मार्केट सर्व्हे, मार्केट प्रमोशन, विक्रीपूर्व सेवा, विक्रीनंतरची सेवा, त्यासंदर्भातील प्रशिक्षण हे यातील महत्त्वाचे भाग मानले जातात.
 
शेतीबाबत पिकांच्या काढणीपूर्व व्यवस्थापनाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. या परिस्थितीत शेतकर्‍यांनी मार्केटिंगच्या तंत्राचा अभ्यास करावा आणि शेतीकडे एक उद्योग-व्यवसाय म्हणून पहावं. तरच या क्षेत्रात आर्थिक स्थैर्य लाभण्यास मदत होईल. अर्थात बाजारपेठेच्या दृष्टीनेही शेती व्यवसायात काही महत्त्वपूर्ण अडचणी आहेत. शेतमजुरांची वानवा, मजूरीचे वाढते दर, नियोजनाकरता जाणवणारी पैशाची उणीव, कर्जावरील भरमसाठ व्याज दर, प्रक्रिया उद्योगांचं आणि जोडधंद्याचं अज्ञान तसंच वाहतूक आणि साठवणूक या क्षेत्रातील अडचणीही महत्त्वाच्या आहेत. त्याबरोबरच सातत्याने खंडीत होणारा वीज प्रवाह आणि चांगल्या रस्त्यांचा अभाव आदी समस्या उभ्या रहात आहेत. बाजार व्यवस्थेमध्ये मध्यस्थांची संख्या किती आहे, यावरच उत्पादकांच्या, ग्राहकांच्या किंमतीतील हिस्सा अवलंबून असतो, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. 

 
 
 
प्रचलीत कृषी माल व्यवस्थेमध्ये उत्पादकांपेक्षा व्यापार्‍यांना खूप फायदा होतो, असंच दिसून येतं. त्याच बरोबर या विक्री साखळीमध्ये उत्पादक शेतकरी, घाऊक मध्यस्थ, किरकोळ मध्यस्थ, किरकोळ व्यापार आणि अंतिम ग्राहक या प्रक्रियांचा समावेश होतो. या परिस्थितीत पैशाची निकड, नाशवंत माल, काढणीपश्चात तंत्रज्ञानाचा अभाव या तसंच इतर अडचणींमुळे शेतकरी बर्‍याच वेळा मिळेल त्या किंमतीस बाजार साखळीद्वारे कृषीमालाची विक्री करत असतो. माल उत्पादनाच्या वाढत्या खर्चाबरोबरच मध्यस्थांचा नफा आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे कृषी माल उत्पादकांची मोठी पिळवणूक होते. माल उत्पादीत झाल्यावर तीन ते चार दिवसांपासून ते 90 दिवसांपर्यंतच्या कालावधीत 80 टक्के माल बाजारपेठेत येतो. परंतु बाजारपेठेतील असुविधेमुळे 30 ते 40 टक्के कृषीमालाची नासाडी होते. एकंदर शेतीमाल विक्री व्यवस्थेतील मध्यस्थ, दलालांचे उच्चाटन ही या व्यवस्थेतील महत्त्वाची सुधारणा ठरणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून अलिकडे शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्रीची संकल्पना राबवली जात आहे. मोठ्या शहरांमधील ठराविक भागांमध्ये आठवड्यातील ठराविक दिवशी आठवडी बजार भरवले जात आहेत. त्या ठिकाणी शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी घेऊन येत आहेत. व्यापार्‍यांपेक्षा हा शेतमाल ग्राहकांना कमी किंमतीत उपलब्ध होत आहे, त्याच बरोबर शेतकर्‍यांनाही अपेक्षित नफा मिळवता येत आहे. मुख्यत्वे ताजा शेतमाल मिळाल्यानं ग्राहकवर्गाडून समाधान व्यक्त केलं जात आहे.
 
 
या पार्श्वभूमीवर जागतिकीकरणाच्या जमान्यात मॉल संस्कृती झपाट्याने वाढत आहे. ग्राहकांची खर्च करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. शिवाय त्यास सहजपणे कर्जाची उपलब्धता आणि कमी व्याज दराचं पाठबळ लाभत आहे. यामुळे मोठ्या शहरांमध्ये शॉपिंग सेंटरची उभारणी जोमानं होत आहे. असे शॉपिंग सेंटर्स ग्राहकांच्या आवडी-निवडी जपण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. मोठ्या मॉल्समध्ये करमणुकीची साधने, किरकोळ विक्रीच्या वस्तूंची मुबलक उपलब्धता, फुरसतीचा वेळ आणि निवांतपणा व्यतीत करण्याची साधने इत्यादींचा समावेश असतो. अशा मॉल्सचे जाळे हळुहळू संपूर्ण देशभर पसरत आहे. या क्षेत्रात बहुराष्ट्रीय कंपन्यांनीही पाय हळुहळू पसरायला सुरुवात केली आहे. हे लक्षात घेता भविष्यात या व्यवसायाची प्राप्ती अधिक वाढणार आहे. शेतकर्‍यांसाठी ही चांगली संधी आहे. या क्षेत्रातील विविध कंपन्यांनीही या संदर्भात शेतकर्‍यांना विश्वासात घ्यायला हवं. तसे प्रयत्न होत आहेत आणि त्याला शेतकर्‍यांचा चांगला प्रतिसादही लाभत आहे. मात्र, अशा शेतकर्‍यांची संख्या आणखी वाढण्याची आवश्यकता आहे. अलिकडे करार शेती, कंपनी शेती अशा संकल्पनाही राबवल्या जात असून त्यालाही शेतकरी उत्तम प्रतिसाद देत असल्याचं पहायला मिळतं. अशा काही संकल्पना राबवतानाही शेतकर्‍यांनी मार्केटिंगचं तंत्र आत्मसात करण्याची आवश्यकता आहे.