एका न पाहिलेल्या नाटकाबद्दल...

    दिनांक :06-Nov-2019
ते नाटक मी आता पाहिलेले नाही. आधी जेव्हा वसंत कानेटकरांचे हे नाटक श्रीराम लागू, शांता जोग, अशोक सराफ यांच्यासारख्या नटश्रेष्ठांच्या संचात आले होते तेव्हा आपल्या रसिकतेला नाटकांची चाहुल लागलेली नव्हती आणि तेव्हा ते वयही नव्हते. आता आले आहे हे नाटक ‘हिमालयाची सावली’ पुन्हा रंगमंचावर. ते अद्याप पाहिलेले नाही. तसे ते नाटक रंगमंचावर पाहिलेलेच नाही, असे नाही. वाचले तेव्हा वाचताना लेखकाच्या चित्रदर्शी प्रभावाने मनाच्या रंगमंचावर ते नाटक दिसले होते. तेव्हाही शेवटाकडे जाताना रडायला आले होते. नंतर कधी नरहर कुरंदकरांना ऐकले. सौंदर्यशास्त्राचे दर्शनच त्यांच्या वाणीतून झाले. ते सगळेच समजण्याचे वय नव्हते; पण झाडाला जसे खत मातीत पाझरून पुरत जाते तसे तेही होत गेले. त्यांचे सौंदर्यशास्त्र असेच मग भिनत गेले. त्याचमुळे हे नाटक वाचत असताना कुरंदकरांची प्रस्तावना दिसल्यावर तीही वाचली. खरेतर पुस्तक वाचण्यास सुरुवात करताना प्रस्तावनेपासून ते सुरू केले पाहिजे, असे आमच्या मराठीच्या अयाचित बाईंनी सांगितले होते. शिक्षकांनी असे मार्कांच्या पलिकडचे सांगितलेले मनावर घ्यायचे नसते, हे पिढीजात संस्कार असल्याने प्रस्तावना वाचलीच पाहिजे, असे कधी वाटले नव्हते. या पुस्तकाची प्रस्तावना कुरंदकरांची असल्याने ती वाचली. हे नाटक म्हणजे र. धो. कर्व्यांचा जीवनपट नाही, असे कुरंदकरांनीच सांगून टाकले आहे. नाटक बघताना ते जाणवतेदेखील. कर्व्यांच्या आयुष्यापासून प्रेरणा घेऊन हे नाटक लिहिले गेले आहे, हे मात्र खरे...
 
 
 
तर हे नाटक नंतर कधी राज्य नाट्य स्पर्धेत वाचले होते. त्या काळात राज्य नाट्य स्पर्धेत कानेटकर, कालेलकर यांचीच नाटके सादर व्हायची. व्यावसायिक झालेल्या नाटकांची नक्कल बहुतांश नाटकांत मारली जायची. ऑर्केस्ट्रॉ नावाच्या प्रकारात जसे, ‘सही सही मोहम्मद रफी’चे गाणे म्हटले जायचे तसे राज्य नाट्य स्पर्धेत एकदम लागूंपर्यंत पोहोचलात, अशी दाद दिली जायची... तर त्यावेळी हे नाटक रंगमंचावर पाहिले होते, मात्र त्याला काय पाहणे म्हणायचे?
आता हे नाटक अद्याप बघायचे आहे. बघायचेच आहे याला अनेक कारणे आहेत. एकतर हे नाटक अभिजात आहे. ते रंगमंचावर बघणे हा ठेवा असू शकतो. त्यात शरद पोंक्षेंसारख्या नटाचा हात धरून या नाटकाचा अवकाश फिरून येणे, हीदेखील मोठीच बाब आहे. त्यात या नाटकाचे दिग्दर्शक राजेश देशपांडे हे मित्र आहेत माझे. खरेतर राजेश देशपांडे म्हटले की मग गंगुबाई नॉनमॅट्रिकच आठवते. तो त्यांचा जॉनर आहे. त्यांनी केलेले चित्रपट असोत की मालिका, सारेच कसे विनोदी आहेत. त्यामुळे राजेश देशपांडे हे नाटक करताहेत म्हटल्यावर जरा गंमत वाटली होती. त्यांच्या कविता वाचल्यावर त्यांची मूळ प्रवृत्ती गंभीरच आहे, हे जाणवले होते. मध्यंतरी मुंबईत असताना नाटकाचा प्रयोग होता. आमचे बोलणेही झाले. अर्धा तास आधी या, पोंक्षेंशीदेखील बोलणे होईल, असे देशपांडे म्हणाले होते. मात्र, तेव्हा नाहीच जमले नाटकाला जाणे. मध्यंतरी पुण्याला प्रयोग असताना नाट्यशास्त्रांत बी. ए. करणार्‍या माझ्या लेकीने आवर्जून पाहिला प्रयोग. राजेशने तिला मुद्दाम बोलावून घेतले होते प्रयोगाला. तीही म्हणाली, बघाच हा प्रयोग!
 
हे नाटक बघायचेच आहे, या मागे हे एक कारण की, इतक्या वर्षांनंतर हे नाटक समकालीन वाटते का? ती पात्र आणि ते कथानक आपले वाटते का? कारण आता वास्तव बदलले आहे. समाजसेवा करणारे नाहीत, असे नाही. मात्र, आता सार्‍याच बाबत कसा प्रोफेशनलिझम्‌ आलेला आहे. त्यात वाईट असे काहीच नाही... तरीही समाजसेवेसाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवणारे अन्‌ नाटकातल्या नानांसारखे भाबडे समाजसेवक आता आहेत का? नसतील तर मग आताच्या पिढीला हे नाटक का बघावेसे वाटते आहे? कारण राजेश देशपांडे समाजमाध्यमांवर जे काय प्रमोशन करत आहेत त्यानुसार आणि तोंडातोंडी माध्यम नावाचा एक अजरामर प्रकार असतो त्याच्या सांगाव्यानुसार हे नाटक रसिकांना खेचून घेत आहे. काही दृकश्राव्य फिती आणि छायाचित्रांवरून नाटकाचे नेपथ्य अगदी त्या काळांत घेऊन जाणारे आहे. शरद पोंक्षे हे जीवघेण्या आजाराशी दोन हात करून रंगभूमीवर आलेले आहेत. त्यांच्याविषयीचा समाजांत वैचारिक भूमिका घेणारा नट म्हणून असलेला आदर आणि आता त्याला असलेली सहानुभूतीची किनार म्हणून लोक हे नाटक बघायला जातात का?
 
राजेशने मूळात हे नाटक का केले? जुनेच नाटक करायचे असते तर बरीच होती की... त्यांना वाटते की, हे नाटक मी जगलो आहो. हे नाटक माझ्या घरांतच घडले आहे. नाना आणि बयो आजही नाहीत का? राजेश सारखाच अनुभव आपलाही नाही का? आता प्रत्येकाच्याच घरी काही समाजसेवक नसतात वडील; पण त्या काळांत नीती-नेमाच्या प्रकांडांच्या सावल्यांनी प्राभावित असल्याने नेमस्त, भिडस्त आणि कडक-करड्या कुटुंब प्रमुखांचीच ती पिढी होती. यामुळे बापाची तत्त्व आणि लेकाची स्वप्न यांच्यात तीळतीळ तुटत जाणारी बयो जवळपास प्रत्येकच घरांत होती. प्रशांत असनारेच्या कवितेसारखी अवस्था... बाप म्हणाला, दिव्याची वात लहान कर, लेक म्हणाला दिव्याची वात मोठी कर... माय वात लहान- मोठी करत राहिली... रात्रभर जळत राहिली... अशी अवस्था असलेल्या बयो त्या काळांत घराघरांत होत्या. सरकारी इंजिनीअरिंग डिप्लोमा कॉलेजला ॲडमिशन मिळत नाही म्हणून मग बी. कॉम. करायला लाव त्याला... त्याला त्याच्या गुणवत्तेवर विनाशुल्क प्रवेश मिळत नाही, याचा अर्थ त्याची इंजिनीअर होण्याची लायकी नाही, असे वडील म्हणाले होते आणि ‘अहो साडेतीन हजारच भरायचे आहेत ना...’ म्हणत आई रात्रभर कुढत राहिली होती... हा स्वानुभव आहे. या नाटकातही हे असेच होते.
 
आताही अशा वेड्या समाजसेवकांची फकिर पिढी नाहीच असे नाही. मात्र, आधीच्यांच्या ठेचांनी ते शिकले आहेत. आपण सर्वार्थाने भक्कम राहिलो तर आपण अधिक समाजसेवा करू शकू, ही शिकवण त्यांना मिळाली आहे. समाजसेवकांनी दारिद्र्याला दागिना करूनच जगायचे असते, असे अजिबात नाही. हे आता समाजालाही पटले आहे. गाडगेबाबांच्या बायकोची जी परवड होत होती तीच नेमकी या नाटकांत बयोची होते. तरीही आता या नाटकांतल्या नानांसारखे फकिर समाजसेवक नाहीतच, असे नाही. नव्याने या नाटकाचा विचार करताना मला आमचा रामभाऊ इंगोले आठवला. वारांगनांची मुले सांभाळण्याचे व्रत गेली पन्नास वर्षे सांभाळणार्‍या रामभाऊने लग्न नाही केले, मात्र म्हणून काय त्याच्या आईची आणि इतर कुटुंबियांची फरफट नाही झाली असे नाही. त्याला काही देऊ केले तर तो म्हणतो की, आधी माझ्या आश्रमांत या आणि त्या मुलांशी घरच्या मुलांसारखे नाते जोडा नि मग मला तुमची मदत द्या... त्याच्या या तत्त्वामुळे त्याच्यासोबत काम करणार्‍या त्या बाईंची कुतरओढ होतच नाही असे नाही.
 
तसे हे नाटक नानांचे नाही. बयोचे आहे. नाना हे कारण आहे, बयो कार्यकारणभाव आहे. नानांचे पात्र आखीवच आहे. बयोच्या पात्राला प्रचंड वेगवेगळे पदर आहेत. श्रुजा प्रभुदेसाई यांनी ते तालेवारपणे पेलले आहेत. उदंड समाजसेवकच असलेल्या नानांसारख्यांनी लग्नच करू नये... गाडगेबाबांच्या बायकोने त्यांना एकदा विचारले होते, ‘‘तुमच्या घरचे म्हून सोडून द्या आम्हाले; पन तुमी म्हनता समाजच माहा संसार हाय, माहं कुटुंब हाय त त्या समाजात आमी नाही येत का? आमचं काही देनं नाही लागत का तुम्ही?’’ असे विचारत असताना गाडगेबाबांच्या रूपांतल्या माणसाच्या देवाबद्दल तिच्या मनांत पूज्य भावच होते. सरकारनी दिलेल्या गाडीतून आपल्या कुंताबाईला गाडगेबाबांनी उतरविल्यावर तिचा लेक अन्‌ जावई म्हणाले होते, ‘‘चाल त्या बैलबंडीत...’’ तेव्हा ती माउली म्हणाली होती, ‘‘तुमी जावाना... त्यायनं मले पैदल जाले सांगलं हाय त मी पैदलच जाईन ना. तुमाले नाही इज्जत त्यायची त मंग तुमच्या बैलबंडीत तरी मी कसी बसू?’’
या नाटकातली बयोदेखील तिच्या मुलाला अखेरच्या प्रसंगात असेच काही सुनावते आणि पक्षाघात झालेल्या नानांना घेऊन मुलाच्या बंगल्यातून बाहेर पडते तेव्हा दरवेळी त्या प्रसंगाचा साक्षी होताना अशा असंख्य बयो प्रेक्षकांच्या डोळ्यांत रडून जातात... म्हणून हे नाटक 40 वर्षांनंतरही आपले वाटते, आजचे वाटते. फकिरीचे पोत बदलले असतील; पण पोत तेच कायम आहेत. राजेश देशपांडेला हेच दिसले नाटक वाचताना आणि त्यांनी ते समर्थपणे रंगमंचावर साकारले आहे. पुन्हा एकदा हे नाटक बघताना पुन्हा पुन्हा आपल्या असंख्य अश्रूंचे संदर्भ लक्षात यायला लागतात. अश्रूंचे संदर्भ कळले नाहीत की आयुष्याचे हसे होते, आपल्या आयुष्यातल्या अनेक बयोंच्या अश्रूंचे संदर्भ कळावेत, यासाठी तरी हे नाटक बघायला हवे.