मानव आणि पर्यावरण

    दिनांक :07-Nov-2019
|
अंजली आवारी
 
मानवी आयुष्य जगताना उपयोगी वस्तू निसर्ग मोठ्या तत्परतेने प्रदान करीत असतो. पण जेव्हा त्याची परतफेड करायची संधी येते, तेव्हा मात्र मनुष्य एक पाऊल मागे सरकतो. निसर्ग मानवाचा पालनकर्ता आहे. तो ज्याप्रमाणे आपली काळजी घेतो, त्याचप्रमाणे आपल्या हातून जर चुका झाल्या तर नैसर्गिक संकटांच्या माध्यमातून तो आपले कानही पिळतो. दुष्काळ, भूकंप, त्सुनामी, पूर अशा विविध संकटांच्या माध्यमातून तो धोक्याच्या घंटेचा नादही करीत असतो. सध्या मनुष्यप्राणी उन्मत्त हत्तीसारखा वागतोय्‌. निसर्गाच्या घंटेचा अखेरचा नाद ऐकू येईल, तोपर्यंत फार वेळ झालेली असेल. 

 
 
 
वेगाने होणारे औद्योगिकीकरण, विकास या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. परंतु होत असलेल्या निसर्गाच्या र्‍हासाकडे कुणाचेच लक्ष नाही. चैनीच्या वस्तूंचा वापर करीत असताना प्रदूषण तर होत नाही ना, याचा विचारही कुणी मनात आणत नाही. त्याचाच परिणाम म्हणजे पृथ्वीच्या तापमानात होणारी वाढ. या वाढीमुळे बर्फ वितळल्याने पृथ्वी जलमय देखील होऊ शकते. ही धोक्याची घंटा पर्यावरणावरील अनेक अहवाल देत आहेत. पण त्याचा विचार न करता आपण सुसाट धावत सुटलोय्‌. याचे परिणामही आपणासच भोगावे लागतील हे नक्की.
 
 
इथे मुद्दा हा नाही की, पर्यावरणाचे संरक्षण कसे करायचे. पर्यावरण संरक्षणाचे उपाय सर्वांनाच ठावूक आहेत. पण सुरुवात कोण करेल, हा खरा प्रश्न आहे. कधी कधी असाही विचार केला जातो की, माझ्या एकट्याच्या करण्यानेच काय होणार आहे? पण, जर आपण सुरुवातच केली नाही तर कसे होणार? एकेका थेंबाला साठवूनच तर तळ्याची निर्मिती होत असते ना!
 
 
पर्यावरणाचे महत्त्व आपण सर्वच जाणतो. पण इथे गरज आहे ते महत्त्व समजून कार्य करण्याची. आपल्या प्रत्येक कृतीतून पर्यावरण संरक्षणाचा विचार केला तर नक्कीच र्‍हास थांबू शकतो. तसेही जर पृथ्वीचे अस्तित्वच नष्ट होणार असेल तर कितीही विकास करून काय उपयोग? त्यापेक्षा पृथ्वीच्या संरक्षणार्थ काही उपाय करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे.
 
 
म्हणूनच मित्रांनो, माझी आपणा सर्वांना कळकळीची विनंती आहे की, आपण सर्वांनी खारूताईच्या वाट्याने का होईना पर्यावरण संरक्षणासाठी आपले योगदान द्यावे.
 
 8600291527