'त्या'नंतरच काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करेल : पृथ्वीराज चव्हाण

    दिनांक :07-Nov-2019
|
कराड,
भाजपा आणि शिवसेनेला जनतेने बहुमत दिले आहे. ते जबाबदार पक्ष असून त्यांनी जबाबदारीने वागावे, असा सल्ला देत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यपाल तसेच शिवसेना-भाजपच्या भूमिकेनंतर काँग्रेस पुढील दिशा ठरवणार असल्याचे स्पष्ट केले. स्व. यशवंतराव मोहिते यांच्या जन्मशताब्दी कार्यगौरव सोहळ्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

 
 
राज्य आणि शेतकरी अडचणीत आहे. मात्र शिवसेना आणि भाजपा मुख्यमंत्री कोणाचा यातच अडकले आहेत. त्यांना जनतेने सत्ता स्थापनेचा कौल दिला आहे. त्यामुळे त्यांनी जबाबदारीने वागावे. उद्यापर्यंत सरकार स्थापन झाले नाही, तर राष्ट्रपती राजवट लागणार असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले.
 
राज्यातील सत्ता स्थापनेचा अभूतपूर्व प्रसंग निर्माण झाला आहे. स्पष्ट जनादेश मिळूनही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या महायुतीकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. दोन्ही पक्ष मुख्यमंत्रिपदावरून अडून बसल्याने परिस्थिती अधिक गंभीर होत चालली आहे.
 
शिवसेना सत्तेचे समान वाटप आणि मुख्यमंत्रिपद कार्यकाळही निम्मा निम्मा अशा समीकरणावर कायम आहे. दुसरीकडे मुख्यमंत्रिपद सोडून कोणत्याही फॉर्म्युलावर चर्चेला तयार असल्याचे म्हटले आहे.