कसल्या विवेकाच्या बाता करताय्‌ फादर!

    दिनांक :07-Nov-2019
|
आगामी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद वाट्याला आल्यानंतर तरी फादरांच्या विचारांची व्याप्ती चाकोरीतून बाहेर पडत अधिक समृद्ध, विस्तीर्ण होईल असे वाटत होते खरे! पण प्रत्यक्षात, मुद्दा भारतीय समाजकारणाचा असो, की साहित्यवर्तुळाचा, त्यांना ‘चर्च’मधून बाहेर पडायचेच नाही, उलट जमलेच तर, या ना त्या माध्यमातून चर्चचे केंद्र अधिक मजबूत करण्याचा ध्यास उराशी बाळगायचा, अशा काहीशा विचित्र धोरण आणि आचरणाचे प्रकटीकरण सातत्याने होत असल्याने फादर दिब्रिटो यांची एकूणच मागणी, वैचारिक व्यासपीठावर दिशादर्शक ठरण्याऐवजी दिवसागणिक, अधिकाधिक वादग्रस्त ठरू पाहते आहे.
 
 
धर्मांतरबंदी कायद्याची मागणी करणे म्हणजे विवेकावर हल्ला असल्याचे विधान करून जे रान उठविण्याचा प्रयत्न फादरांनी नुकताच केलाय्‌, तो तर धर्मांतराचे बळी ठरलेल्या तमाम हिंदूंच्या जखमांवर ओढलेले ओरखडे ठरतो. या कायद्याला चालवलेल्या विरोधाच्या आडून त्यांच्या माध्यमातून जे धर्मांतरणाचे छुपे समर्थन होते, तेही कुठल्याच अर्थी समर्थनीय ठरू शकत नाही. या देशात धर्माच्या आचरणाचे स्वातंत्र्यही दस्तुरखुद्द राज्यघटनेने बहाल केले आहे. त्यात कुठलाही भेद नाही. स्वत:च्या धर्माचे पालन करण्यासोबतच हवा तो धर्म स्वीकारण्याची मुभाही घटनेनेच प्रदान केली आहे इथे प्रत्येकाला. मग, मिशनरीजच्या माध्यमातून सामाजिक कार्याच्या आडून चाललेल्या धर्मप्रसारणाच्या षडयंत्राचे लोकांना पटेल अन्‌ मानवेल असे तर्कसंगत कारण सांगता येईल फादरांना? महाराष्ट्रापासून तर छत्तीसगडपर्यंत अन्‌ ओडिशापासून तर झारखंडपर्यंतच्या आदिवासीबहुल भागातील खिस्तीकरणाचे, बड्या शहरातील झोपडपट्‌ट्यांमधील गोरगरीब, अल्पशिक्षितांच्या धर्मांतरणाच्या विशेष प्रयोजनाचे विश्लेषण करता येईल फादर दिब्रिटो यांना? 

 
 
  
एका जागतिक विश्लेषणातून 2050 सालच्या भारतातील धार्मिक लोकसंख्येची संभाव्य आकडेवारी अभ्यासाअंती जाहीर झाली आहे. त्यानुसार, पुढील तीन दशकांत भारतीय मुस्लिमांची संख्या 31 कोटींच्या घरात पोहोचलेली असेल; तर ख्रिश्चन धर्मीयांची संख्या सुमारे चार कोटींच्या घरात असेल. याचा अर्थ, स्वातंत्र्यसमयी केवळ 2.3 टक्क्यांएवढी असलेली ख्रिश्चन संख्या तब्बल 18 टक्क्यांनी वाढणार आहे या काळात. धर्मांतरणासोबतच, घरात जन्मणार्‍या मुलांच्या प्रमाणाबाहेरील प्रमाणामुळे मुस्लिम लोकसंख्येद्वारे गाठल्या जाणार्‍या या संभाव्य आकड्याला निदान सबळ आधार तरी आहे. पण, ख्रिस्ती वाढीव संख्येला कुठला आधार सांगता येईल फादर दिब्रिटो? धर्मांतरण! बस्स! हेच एक प्रमुख कारण आहे या वाढलेल्या लोकसंख्येमागे. भारतातील हिंदीभाषी प्रदेशातील वाढते इस्लामीकरण आणि पूर्वांचलापासून तर केरळपर्यंत आणि ओडिशापासून तर तेलंगणापर्यंत ख्रिस्तीकरण यामुळे या प्रदेशांचे धार्मिक आधारावरील कालपर्यंतचे संख्याबळ पुरते बदलण्याची परिस्थिती निर्माण झाली.
 
 
झारखंडसारख्या आदिवासीबहुल भागात ख्रिस्ती संख्या 1991 च्या 3.72 टक्क्यांवरून 2011मध्ये 4.30 टक्क्यांपर्यंत वाढलेली दिसते, याला कुठला आधार असतो दिब्रिटोसाहेब? हेच पूर्वांचलात, हेच तेलंगणात, तेच पश्चिम बंगालातील आदिवासी भागात अन्‌ तेच महाराष्ट्राच्या गर्द वनराईत. जरा कुठे गोरगरीब, अशिक्षित, आधारहीन लोक दिसले रे दिसले की, कधी रुग्णालयाच्या आडून तर कुठे एखाद्या सहायता केंद्राच्या आडून... मदतीचा हात पुढे करायचा. शिकार गळाला लागली की, लागलीच गळ्यात क्रॉस घालायचा समोरच्याच्या. साम, दाम, दंडाचे मार्ग अनुसरून चाललेले हे धर्मांतरण लपून कुठे राहिले आहे आज? गडचिरोली जिल्ह्यातल्या कित्येक दुर्गम गावांतील झोपड्यांमध्ये क्रॉस लटकवले गेले आहेत. हा प्रवास दवाखान्यातील रुग्णसेवेपासून, शाळांमधील अभ्यासक्रमांतून सुरू होतो आणि घराघरातल्या भिंतीवरची हिंदू देवी-देवतांची छायाचित्रे बाजूला काढून तिथे क्रॉस स्थिरावला की मगच दम घेतो. हा काय, कुणी अभ्यासपूर्ण भूमिकेतून घेतलेल्या निर्णयाचा परिपाक असतो? फादर म्हणताहेत, तसा स्वेच्छेने स्वीकारला गेलाय्‌ या परिसरात ख्रिस्ती धर्म? ज्याला दोन वेळच्या भोजनाची ददात असते, त्या वनवासी बांधवांच्या अजेंड्यावर धर्मपरिवर्तन प्रथम प्राधान्याचा विषय ठरू शकतो?
 
 
एकीकडे, धर्म कधी कुणावर लादला जात नसतो, असं म्हणायचं आणि लोकांनी आपला धर्म स्वीकारावा म्हणून वेगवेगळ्या क्लृप्त्या करायच्या, त्यांच्यात फूट पाडून झारखंडसारख्या ठिकाणी ‘सारनीझम’ नावाचा नवा पंथ जन्माला घालण्याचा उपद्व्याप करायचा, ही सारी थेरं काय केवळ महती सांगून स्वधर्मप्रसार करण्यासाठीची आहेत? कुठेच फसवणूक नाही यात? कुठेच जबरदस्ती नाही? कुठेच शोषण नाही की कुठेच पैशाचे आमिष नाही? ओडिशातल्या फुलबनी जिल्ह्यात 1991 ते 2011 या कालावधीत एकूण लोकसंख्येत 35 टक्क्यांनी वाढ झाली. यात ख्रिस्ती लोकसंख्येची वाढ 97 टक्क्यांची आहे. याच काळात छत्तीसगडच्या रायगढ जिल्ह्याची लोकसंख्या 33.15 टक्क्यांनी वाढली. यात ख्रिस्ती लोकसंख्येची वाढ 39 टक्क्यांची आहे.
 
 
झारखंडमधील परगणा जिल्ह्याचे उदाहरण तर जगावेगळे ठरावे असेच आहे. इथे या वीस वर्षांच्या काळात एकूण लोकसंख्या 35.20 टक्क्यांनी वाढली, तर ख्रिस्ती लोकसंख्येची वाढ अभूतपूर्व अशी 280.52 टक्क्यांची आहे. देता येईल काही स्पष्टीकरण दिब्रिटोसाहेब, विज्ञानालाही लाजविणार्‍या या आकडेवारीचे? धर्मांतरणाशिवायच घडला असेल हा चमत्कार? या देशातल्या काही विशिष्ट भागात, काही विशिष्ट लोकसमूहांचेच मतपरिवर्तन घडवून आणण्यात मिशनरीज्‌ना ‘यश’ लाभते, याचाही काही संदर्भ देता येईल कुणाला? भारतीय राज्यघटनेने प्रदान केलेले कुठल्याही धर्माचा स्वीकार करण्याचे स्वातंत्र्य म्हणजे काय, अशी लबाडी करून धर्मविस्तार करण्यासाठी दिलेला परवाना आहे? मनाला पटेल अशी कारणमीमांसा करता येईल त्याची कुणाला? असल्या लांड्या लबाड्या करून, गैरफायदा घेऊन धर्मांतरण करण्यास बंदी घालणारा कायदा अस्तित्वात येऊ घातला, तर पोटशूळ उठतोय्‌ फादर दिब्रिटो यांना? कुठल्या विवेकाच्या बाता करताहेत ते? भोळ्या-भाबड्या वनवासींची फसगत करून, एखाद्या सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून त्याच्यावर उपकार केल्याचा गवगवा करत त्यास धर्मांतरणास बाध्य करणे म्हणजे सारासार विवेक? आणि तसे करण्यास कुणी आडकाठी केली तर तो म्हणे विवेकावर केलेला हल्ला? व्वा रे वा! हे करताहेत विवेकाच्या गप्पा.
 
 
साहित्य संमेलनाचे अखिल भारतीय अध्यक्षपद पदरी पडलं तरी चर्चच्या पलीकडे विचार करत नाहीत फादर, इथले कायदेही त्यांना त्यांच्या सोयीचे हवे आहेत. त्याला बाधा आणलीच कुणी तर अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे तुणतुणे वाजविण्याचा सराव आहेच त्यांना. चारचौघांत बोलताना तुकारामांची गाथा, कुराण, बायबल, सारे एकाच पंक्तीत मांडायचे. सार्‍यांची शिकवण एकच असल्याचे उच्चरवात सांगायचे व टाळ्या मिळवायच्या. स्वत: मात्र फक्त बायबलच उचलायचे. विवेकाच्या, सच्छीलतेच्या बाता करून त्याचे शिताफीने समर्थनही करायचे... हे फसवे डाव आता इतरेजनांच्या ध्यानात येऊ लागले आहेत. म्हणूनच धर्मांतरणाच्या क्लृप्त्या आताशा प्रभावीतही होऊ लागल्या आहेत. फादर दिब्रिटो यांना होऊ लागलेले विवेकाचे स्मरण, हा त्याचाही स्वाभाविक परिणाम आहेच...!