जिव्हाळ्याचा माणूस ‘पोस्टमन’

    दिनांक :07-Nov-2019
|
सर्वेश फडणवीस
 
नुकतीच दिवाळी आटोपली. नातलग, मित्रमंडळी, गप्पा, भेटी-गाठी, फराळ हाच दिवाळीचा खरा आनंद. अशाच एका ठिकाणी गप्पांच्या ओघात पोस्टमनचा विषय निघाला. आज पोस्टमन बर्‍याच भागात कालबाह्य झाला तरी आधीच्या पिढीतील अनेकांचा तो जिव्हाळ्याचा माणूसच होता. घरातील प्रत्येक मंगल कार्याप्रसंगी त्याला भेटवस्तू दिली जायची. पण आज हा जिव्हाळ्याचा पोस्टमन दिसेनासा होत आहे.

 
 
ब्रिटिश काळापासून चालत आलेले टपाल खाते आज एका वेगळ्याच उंचीवर पोहोचलेले आहे. आजच्या एसएमएस, व्हॉट्‌सअॅप, ई-मेलच्या जमान्यातही टपाल यंत्रणा अन्‌ पोस्टमनकाका नागरिकांच्या मनात घर करू आहे. टपाल खात्याची नियमितता, अचूक कार्यप्रणाली विश्वासास पात्र आहे. पोस्टमन ऊन पावसाची तमा न बाळगता आपल्याला आपल्या प्रियजनांनी पाठवलेले साधे पत्र असो वा स्पीडपोस्ट वा रजिस्टर पार्सल प्रामाणिकपणे पोहोचवितो. म्हणूनच तो जिव्हाळ्याचा असतो.
 
 
देशात 1 एप्रिल 1854 रोजी टपाल सेवेला सुरुवात झाली. तेव्हापासून देशाच्या कानाकोपर्‍यात संदेशाचे वहन करण्यात टपाल खात्याची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. स्मार्ट मोबाईल, इंटरनेट अशा वेगवान संदेशवहनाच्या काळातही टपाल खात्याने महत्त्व टिकवून ठेवले आहे. टपाल खात्यानेही आपल्या सेवेत आमूलाग्र बदल केले असून, पद्धतीदेखील बदलल्या आहेत.
 
 
अगदी दहा-पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत शहरी भागातही पोस्टमनकाकांचा प्रत्येक घराशी जिव्हाळ्याचा संबंध असायचा. एखाद्या व्यक्तीने आपल्या आप्ताचा पत्ता काहीसा अपुरा दिला, तरी ते पत्र संबंधितापर्यंत पोहोचेल, इतका पोस्टमनकाकांबद्दल विश्वास होता. तो आजही टिकून आहे. पण आज तोच पोस्टमनकाका काही भागांत दिसेनासा झाला आहे. दिवाळी जवळपास आली की अनेक जण आवर्जून पोस्टमनची वाट बघत असतात. आप्तस्वकीयांनी पाठविलेली पत्रे, भेटवस्तू, मनिऑर्डर आणणारा पोस्टमनकाकाच तर असतो.
 
 
डिजिटल इंडियात दिवाळीला पत्राद्वारे घरपोच शुभेच्छा मिळाल्या की जिव्हाळा आणखी वाढतो. कारण आजही शुभेच्छापत्रे स्वअक्षरात पाठविणारी अवलिया माणसे अनेक आहेत. दिवाळीला येणारा फराळही आता व्हॉट्सअॅपवर येतोय्‌ आणि माणूस माणूसपण संपवतोय. पत्र, पोस्टमन इतिहासजमा होईल की काय असे वाटते आहे. हे सगळे नव्या पिढीला देताना आपल्याला आनंद आणि अभिमान वाटला पाहिजे आणि ती नैतिक जबाबदारी आपलीच आहे.
 
 
 
8668541181