तस्कर महिलांनी गिळल्या एक किलो सोन्याच्या कॅप्सूल

    दिनांक :07-Nov-2019
|
चेन्नई,
महिला तस्करांच्या पोटातील सोने परत मिळवण्यासाठी तस्करांच्या टोळीने या महिलांचेच अपहरण केल्याची घटना चेन्नईमधील एका रुग्णालयाच्या परिसरात घडली. या तस्कर महिलांनी 30 कॅप्सूल गिळल्या होत्या. प्रत्येक कॅप्सूलमध्ये सोने भरले होते व त्याचे एकूण वजन एक किलोहून अधिक होते.
 
 
 
सीमा शुल्क विभागाचे अधिकारी त्यांना रुग्णालयात घेऊन जात होते. त्याचवेळी रुग्णालयाच्या आवारात तस्करांच्या टोळीने त्यांचे अपहरण केले. या दोन्ही तस्कर महिला बुधवारी पुन्हा पोलिसांसमोर हजर झाल्या. एका टोळीने त्यांचे अपहरण केले होते. त्यांना एका खाजगी रुग्णालयात नेले. आमच्या पोटातून सोने काढून घेतल्याचा दावा या महिला तस्करांनी केला. पल्लवरम पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून टोळीचा शोध सुरू केला आहे. तसेच सीमा शुल्क विभागाचे अधिकारी या महिलांची चौकशी करत आहेत. अपहरणकर्त्यांची माहिती त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
 
 
या प्रकरणी सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, महिला तस्करांना रुग्णालयात घेऊन जात होतो. त्याचवेळी काही जणांनी त्यांचे अपहरण केले. घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदवला आहे. सीमा शुल्क अधिकारी या महिलांना रुग्णालयात घेऊन जाताना या फुटेजमध्ये दिसत आहेत. एक कार रुग्णालयाच्या आवारात शिरताना व त्यात या महिला बसलेल्या दिसत आहेत. आम्ही कारचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अपहरणकर्त्यांनी कार वेगाने पळवली, असे अधिकार्‍यांनी सांगितले.
 
 
फुगलेले पोट बघून आला होता संशय
टेरेसा आणि फातिमा अशी या दोन्ही तस्कर महिलांची नावे आहेत. त्या मंगळवारी कोलंबोहून आल्या होत्या. त्यांचे फुगलेले पोट बघून सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांना संशय आला. त्यांनी या महिलांना विमानतळावरच रोखले. त्यांच्या पोटात सोने असल्याचे तपासणीत समोर आले. आम्ही सोने असलेल्या कॅप्सूल गिळल्या आहेत, अशी कबुलीही या महिलांनी दिली होती.