खाजगी क्षेत्रातील कामगारांचा पगार वाढणार!

    दिनांक :07-Nov-2019
|
मुंबई,
खाजगी क्षेत्रात काम करणार्‍यांसाठी एक आनंदवार्ता आहे. या क्षेत्रात काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा पगार सरासरी दहा टक्क्याने वाढणार असल्याचे एका अहवालातून स्पष्ट झाले आहे.
 
 
 
विलिस टॉवर वॉटसनच्या ‘सॅलरी बजेट प्लॅिंनग’मध्ये हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या अहवालानुसार, वर्षभरात कर्मचार्‍यांच्या वेतनात 9.9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पुढच्या वर्षी ही वाढ सरासरी 10 टक्क्यांपर्यंत होण्याची शक्यता आहे. इंडोनियातील कर्मचार्‍यांचा पगार आठ टक्क्यांने, चीनमधील कामगारांचा 6.5 टक्क्यांनी, फिलिपाईन्समध्ये सहा टक्क्यांनी, हॉंगकॉंग आणि िंसगापूरमध्ये प्रत्येकी चार टक्के पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. आशिया खंडात भारतातील खाजगी क्षेत्रातील कामगारांची पगार वाढ सातत्याने वाढत आहे. तरीही भारतीय कंपन्या सतर्कता बाळगत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत पुढील वर्षी वेतन वृद्धीत या कंपन्यांकडून मोठा बदल केला जाणार नाही, असे विलियस टॉवर्स वॉटसन इंडियाचे प्रमुख राजूल माथूर यांनी सांगितले.
  
या अहवालानुसार, कार्यकारी स्तरावर 2020 मध्ये वेतनात सरासरी 10.1 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी ही वाढ 9.6 टक्के होती. व्यवस्थापकीय स्तरावर अधिकार्‍यांचा पगार 10.4 टक्क्याने वाढण्याची शक्यता असून, 2019 मध्ये ही वाढ 10.1 टक्के एवढी होती, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.